STORYMIRROR

Ravindra Sonawane

Others

4  

Ravindra Sonawane

Others

*निसर्ग*

*निसर्ग*

1 min
473

वर अथांग आभाळ , त्याचे उजळले भाळ

पहाटेच्या मागे मागे, आली रांगत सकाळ ||धृ||


कंठ कोंबड्याला फुटे, फुटे फांदीला पालवी

मंद सुगंधित वारा, पाना फुलांना जोजवी

रंग केशरी सोनेरी, केला धरेला बहाल ||१||


कुठे झऱ्यातले गीत, कुठे नदीचा तराना

गाय हंबरे गोठ्यात, तिला आवरेना पान्हा

जाग पाखरांना आली, चाले पिलांचा कल्लोळ ||२||


चूल जागे निखाऱ्यांत, तिला घालता फुंकर

तवा तापला तापला, टाका लवकर भाकर

चरा चराला लागलं, राम प्रहराचं खूळ ||३||


नाद घुंगरांचा घुमे, बैल चालले रानांत

सुगी फुलते, डुलते, भूमी पुताच्या डोळ्यांत

पारिजातकाची पहा, चाले दवात आंघोळ ||४||


एकतारीवर गातो, कुणी अनामिक भाट

पैंजणांच्या चाहुलीला, पहा आसुसला घाट

भरे आनंदाचा डोह, त्याचा सापडेना तळ ||५||


इथे अवती भवती, अशी फुले बागशाही

चिंब सुगंधात न्हाल्या, झाल्या ओल्या दिशा दाही

अशी सकाळ साजरी, तिचं रुपडं वेल्हाळ ||६||


Rate this content
Log in