शुभ दिपावली
शुभ दिपावली
आली दिवाळी, दिवाळी
दीप चेतवा मनात
दुःख चिंतेचा पाचोळा
चला जाळू या तमात ||१||
आली दिवाळी, दिवाळी
तिला उधळू जनात
महालाच्या पायथ्याशी
जीर्ण झुकल्या कुटीत ||२||
आली दिवाळी, दिवाळी
तिला मिरवा बाजारी
क्षण थांबवू या तिला
कुठे उघड्या संसारी ||३||
अशी दिवाळी जाऊ द्या
थोडी अनाथालयात
तिला हसू द्या जराशी
भोळ्या उदास डोळ्यात ||४||
तिला विसावू द्या थोडे
याचकाच्या हथेलीत
त्याच्या आसवांचे मोती
हळू झेला ओंजळीत ||५||
तिची तेवणारी माळ
माळू कडेकपारीत
अर्ध नागड्या वस्तीत
आणि विझल्या चुलीत ||६||
अशी दिवाळी राजस
तिला गुंफून गाण्यात
स्वर घागरी ओतून
उभा भरू आसमंत ||७||