बंद कवाड
बंद कवाड
त्याचा फुलांचा व्यवसाय होता
तिचा पण त्याला हातभार होता
सुख-दु:खांचा सामना करुन मोठ्या कष्टांनी दोघांनीही संसार फुलवला होता
ती पाटलाच्या शेतात खुरपायला जात असे अन् फावल्या वेळात गोधडी शिवण्याचं काम करत असे
चार वाडित शोभेल असे घर दोघांनी उभे केले होते
एकुलत्या मुलाचं लक्ष शिक्षणात नव्हतं म्हणून त्याने शहरात मुलाला फुलांचा व्यवसाय सुरु करुन दिला होता
दुकान मुख्य मंदिरा समोर होतं
चार पैसे जास्त मिळू लागले होते
मुलगाही व्यवसायात प्रगती करु लागला होता
येणारा प्रत्येक दिवस यशस्वी जात होता
तो आपलं वाडितच दुकान चालवायचा
दिवस भरात थोडाफार धंदा व्हायचा,
नित्यनेमाने संध्याकाळी आवरुन घराकडे जायचा अन् मोठ्या आपुलकीने शहराच्या वाटेकडे पाहात विडी ओढत येरझ-या घालत मुलाची वाट पाहायचा
लांबूनच मुलगा दिसता की तो तिला आवाज द्यायचा
अगं ऐकते का जेवायला वाढ आलाय तो थकला असेल आवर लवकर
हे आपलं रोज चालायचं सर्व कसं आनंदानं होतं
तरी मुलाच्या मनात वेगळंच शिजत होतं
प्रगती होत असली तरी मुलाच्या डोक्यात वेगळंच खुळ भरलं होतं
याचं त्याचं ऐकून कामासाठी परप्रांतात जायचं होतं
पण याला आई-वडिल सहमत नव्हते
आई म्हणायची बाळा हातचं सोडून पळत्याच्या मागं धावू नगस तू
आम्हाला एकलाच हाय तुझ्या बाचा तू जीव हाय
आई त्याला समजून सांगायची
पण तो ऐकतच नव्हता रोज याच गोष्टीवर भांडणं चालायची
त्याचं खुळ जाण्यासाठी बापानं त्याचं लग्न करुन दिलं
गडी दोन महिने निटनेटकं राहिला अन् परत पहिले पाढे पंच्चावन
आता त्याला समजावून पण फायदा नव्हता
स्व:हट्टावर तो ठाम होता
कुणी समजावलं की तो भांडणाला उतरायचा
अन् क्षुल्लक गोष्टीसाठी त्यानं एक दिवस आईबापाचा विचार न करता आपलं बिराड घेउन परप्रांतात मार्गस्थ झाला
बराच काळ लोटला त्याचा काही पत्ता लागला नव्हता
इथ जणू उतरत्या वयात आईबापाच्या जीवनाला दुःखाचे ग्रहण लागलं होतं
आता बाप सतत मुलाच्या विचारात आजारी पडू लागला आईची पण गत बापासारखी झाली होती
एकमेकांना आधार देत ते सावरत होते
पण एक दिवस मुलाची वाट पाहाण्यातच बापाचा मृत्यृ झाला होता
शेवटल्या क्षणापर्यत त्याचा लाडका आलाच नव्हता
अप्तेजन ही तसे लांबचेच होते तेही असून नसल्या सारखे आखेरला वाडितील लोकांनीच त्याचा अंतिमसंस्कार केला
माझी कुस वांझ राहिली असती तर बरं झालं असतं
ते दु:ख मी शेवटल्या क्षणापर्यंत सहन केलं असतं
कसा हा दैवाचा भोग कसलं मातृत्व लाभलं
माझंच सौभाग्य पुसलं
त्याची चिता जळताना ती धायमोकलुन रडत होती अन् स्वमातृत्वाला दोष देत होती
तिचं सारं विश्व संपलं होतं
ती वेडावली जगण्याची मनिषा तिनं सोडली होती
शेवटी त्याच्या दहाव्यालाच तिला गावकरऱ्यांनी वृध्दाश्रमात दाखल केली आता ती मरणाच्या प्रतिक्षेत आहे...
अन् तिथं त्यांनी उभारलेल्या घराचं कवाड कायमचं बंद झालं होतं... बंद कवाड....
