भेटू आपण
भेटू आपण
आज हा पाऊस चिंब बरसतो आहे
पडूदे त्याला
येऊदे खाली
अन् फुलू दे धरतीचा कणन् कण
तो पडून गेल्यावर
आसमंतात सुगंध दरवळेल
त्या मातीचा
सायंकाळ गुलाबी थंडीत न्हालेली असेल
सूर्यही घनाची रजा घेत असेल
तांबडा रंग आभाळात भिरकावून तोही जाईल
चांदण्या येतील पहायला
पानांवरून ओघळणारे दवबिंदू,
पाखरंही आसुसली असतील घरट्यात परतायला
चिमणी पिलं वाट बघत असतील
जशी मी वाट पाहतो तुझी
अन् अशाच एका सायंकाळी
आपण भेटू कधीतरी
जेव्हा सोबतीला असेल
वाफाळलेला चहा,
मी,
अन् तुझ्या रूपात जिवंत होणारी
माझी एखादी कविता
जी तुलाच मिठीत घेण्यास
आतूर झालेली असेल
अशावेळी भेटू आपण...

