भाऊच तर असतो
भाऊच तर असतो
आपल्यासोबत मस्ती करणारा
आपल्या हक्कासाठी भांडणारा
नेहमी आपल्याच बाजूने बोलणारा
प्रसंगी चुकल्यावर हक्काने रागावणारा
आपला भाऊच तर असतो
माझ्याआधी आपण ताईलाच घेऊया
तिची इच्छा म्हणून तिकडेच जाऊया
पाहिजे ती वस्तू लाडाने मागणारा
स्वतःचा खाऊ फक्त ताईलाच देणारा
आपला भाऊच तर असतो
हे घर तुझं नाही, जा तुझ्या घरी म्हणणारा
ताईच्या लग्नामध्ये मानाने मिरवणारा
सगळ्यांसमोर डोळ्यातलं पाणी लपवणारा
अन् मंडपाच्या कोपऱ्यात ढसाढसा रडणारा
आपला भाऊच तर असतो
ताई माहेरी आली म्हणून ताईच्या आवडीचं आणणारा
भाच्यांचे पाहिजे ते लाड पुरवणारा
ताईसाठी सुरेख पैठणी आणणारा
अन् जाताना गुपचूप दोन-चार नोटा हातात कोंबणारा
आपला भाऊच तर असतो
आई-वडीलांनंतरही सतत आपली काळजी करणारा
भाऊ या शब्दाला कायम जागलेला
तो नसल्यावर माहेरपणाचा ओढा संपलेला
आयुष्यभर आपल्या पाठीशी असलेला
फक्त आणि फक्त आपला भाऊच तर असतो