मराठी माझी
मराठी माझी


मराठी माझी मायबोली गं नववधू सजली
अहिराणी,कोकणी,मालवणी,वऱ्हाडी बनल्या गं करवली
काना,वेलांटी,मात्रांनी गं नववधू नटली
राग,मत्सर भावनांनी गं थोडीशी ती रुसली
वेगवेगळ्या अक्षरांची वस्त्रे तिने गं नेसली
अलंकार ते व्याकरणाचे तिच्यावरती शोभली
वेणी गं जोडाक्षरांची शब्दांत कशी गुंफली
अनुस्वाराची बिंदी गं शब्दांना शोभली
स्वर स्वरादी व्यंजनांची पाठीराखण झाली
महाराष्ट्री गं तिची आई मराठी उदयाला आली
कथा,कविता,कादंबरीची शाल तिने पांघरली
विनोद आणि नाटकांतून हास्याची राणी बनली
पायी तिच्या ग पैंजण बनून चारोळी गं गाजली
पहाटेच्या जात्यावरती ओवी कशी गुणगुणली
अभंग,भजन,कीर्तनाची महती तुझ्याचमुळे गं झाली
लोकगीतांची गं बाई तू कशी महाराणी बनली
साधू-संतांचेही गं आशीर्वाद तुझ्या या माथी
गरीब भाबड्या लोकांची गं तु बनली काठी
एकमेकांना व्यक्त होण्या तू सखी गं बनली
हिंदी इंग्रजी सवत बनून तुझ्या दारी गं आली
झटली तू ज्या लोकांसाठी ही त्यांचीच गं करणी
पण हे माते गं मी तुझ्याचपाशी वंदन तुझ्या चरणी