बेरंग चित्र
बेरंग चित्र
तुला मिठीत घेताना
कधी वाटलं नव्हतं अता फक्त
तुझी मिठीच राहीन माझ्याजवळ,
खरं तर,
या मिठीत तू येताना किती अलगद आली होतीस
अगदी माझ्या स्पंदनांनाही कळले नव्हते
तेव्हा माझी स्पंदनं
तुझ्या श्वासारूपी बाहेर पडत होती
अन् माझ्या डोळ्यांच्या कॅनव्हासवर
मी अलवार कोरून ठेवत होतो
तुझे चित्र तुझ्या स्पंदनांसह.
तू म्हटली होतीस
हा क्षण सदैव राहीन माझ्या अन् तुझ्याजवळसुद्धा,
अता ते सारं खरं वाटतंय
कारण
अता फक्त ते चित्रच आहे माझ्या डोळ्यांच्या कॅनव्हासवर
परंतु त्यात रंग भरणारा कुंचला
तू कधीच घेऊन गेली आहेस
त्या तुझ्या माझ्या अस्तित्वापल्याड
अन् तेव्हापासून
ते चित्रही बेरंग दिसू लागलंय
तुझ्या 'अलवार विरणार्या स्पंदनांशिवाय' ...

