बाप अभंग
बाप अभंग
घामाच्या थेंबात |जीवन जाळतो|
उन्हात तळतो|बाप माझा||
दुष्काळाच्या झळा| रानी पसरल्या|
जमिनी भंगल्या| सर्वीकडे||
नको जाऊ बाबा| आता फासावर|
अश्रु गालावर| किती येती||
जाशील सोडून| पोरके करून|
वंचित होईन| तुझ्यापाठी||
सगळं शिकेन| नांगर ओढीन|
मजुरी करीन| तुझ्यासाठी||
तुझ्या आसवांची| किंमत मोजीन|
पांग ते फेडीन| या जन्मात||
जातील दिवस| सुख ते येईल|
सरुन जाईल| दुष्काळ हा||
