बाबा
बाबा
खरेच बाप होणे सोपे नसते.
अंकुरले बीज नऊ महिने
वाढले कलाकलाने ,
बाप माझा नावारूपाला
आला बाबा नावाने....
खरेच बाप होणे सोपे नसते.
नाही केला मुलामुलीत
भेदभाव त्याने ,
मुलगी झाली अंश वाढला
चिमुकल्या त्या पावलाने....
खरेच बाप होणे सोपे नसते.
झाले सुपाचे काळीज
गोडवे गायले कौतुकाने ,
तप्त उन्हातील वाऱ्याची झुळूक
बहरला आनंदाने......
खरेच बाप होणे सोपे नसते.
सोसले कष्ट आतडयास पिळ पाडूनी
भरवले चिऊकाउच्या घासाने,
अडखळले पाऊल जरी
बागडले त्याच्या सावरण्याने...
खरेच बाप होणे सोपे नसते.
पुरवले लाड माझे
जे जे दाखवले मी बोटाने ,
सुख असो वा दुःख ना कसली
उणीव सदा दरवळले सुगंधाने..
खरेच बाप होणे सोपे नसते.
दिली संस्काराची शिदोरी
जपली नाती प्रेमाच्या ओलाव्याने,
घडवले मायेने तर कधी
कठोर शब्दाच्या धारेने...
खरेच बाप होणे सोपे नसते.
दाखवली नाही कधीच
चेहऱ्यावर निराशा त्याने ,
कितीदा तरी रडला असेल
बाबा माझा मुक्याने...
खरेच बाप होणे सोपे नसते.
तळहाताच्या फोडापरी
अलवार जपले त्याने ,
करून कन्यादान मिरवला
जगी श्रीमंत दाता या रूपाने..
खरेच बाप होणे सोपे नसते.
सदा मिळावा देव माझा
बाबा तुझ्या रूपाने ,
तुझे ऋण फेडण्यास
पुन्हा जन्मा येईल मी आनंदाने..
खरेच बाप होणे सोपे नसते.
