अता मी तुझी नाही
अता मी तुझी नाही


काल कविता केली तिच्यावर
तिकडून आवाज आला
अता मी तुझी नाही.
पहिला शब्द जेव्हा रेखाटला होता
तू प्राजक्तासम
तेव्हाच का नाही रोखले मला
तुझा सुगंध घेण्यापासून
फक्त हसलीस
'बकुळीच्या फुलासारखी'
अता कविता पुरी झाली
अन् तिला आठवलं
अता ती माझी नाही..,
पण अता
ती कविता कशी खोडू बरं
काळजावरच गोंदली गेली
ती कायमची
बकुळीच्या फुलासह
अता नवी कविता रेखायची म्हटलं
की तिचं बोलणं आठवतं
अन् सारा रंग उडून जातो क्षणभरात
कारण अता जुनेच रंग,
जुनेच शब्द दिसतात मला
प्राजक्ताच्या फुलामध्ये.
तरीही करतो प्रयत्न
नवीन कविता रेखायचा
पण भीती मात्र कायम आहे
कविताच म्हणेल की काय याची
'अता मी तुझी नाही'...
.