अस्तित्व
अस्तित्व
हा खचवितोच तुजला नेहमी जमाव वेडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
या धावत्या जगासह, धावू बरोबरीने
अन् जिद्द ही पणाला, लावू परोपरीने
सद्भावना सदा ही संकल्प हाच सोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
जरी हे समानतेचे, युग स्त्री मनास भावे
अजुनी न समजणारी, असती कित्येक गावे
जनजागृती करावी, की बंधनेही तोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
सोबत तुझीच तुजला, मदतीस ना पुकारी
हो ढाल तू स्वतःची, लढ घेऊनी तलवारी
कर सामना जगाचा, अबला हे नाम खोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
जागा कुणी न देती, कर मानसी तयारी
कोणी दयाही करती, कुणी मारती कट्यारी
हिंमतीस दाद मिळते, सारे रिवाज तोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा
बेधुंद होऊनी गा, वार्यासहित गाणी
मनी भाव हेलकावे, घेतील ग फुलराणी
हा गंध अंतरंगी, नाते तयासी जोडा
अस्तित्व टिकविण्याचा कर तू प्रयास थोडा.
