माझे गुरुजी
माझे गुरुजी
काळ्या दगडावर मारली
पांढऱ्या दगडाची रेघोटी
गुरुजींनी रंगवली माझ्या
कोऱ्या आयुष्याची पाटी
आयुष्याला माझ्या
चौकट अज्ञानाची होती
खुली झाली फाटके
वाट गुरु ज्ञानाची होती
गुरुजींनी मला
बोलायला शिकवलं
खऱ्याखोट्याचं मापटं
तोलायला शिकवलं
वाचायला शिकवलं
लिहायला शिकवलं
जगाच्या पलीकडे
पहायला शिकवलं
गायला शिकवलं
नाचायला शिकवलं
ज्ञानाच्या सागरात
पोहायला शिकवलं
जे मला दिसत नव्हतं
ते गुरुजीनं दाखवलं
शिकवण्यापेक्षा शिकायचं कसं?
ते मला गुरूंनी शिकवलं
पुस्तक चाळायचे नाही
गाळायचे कसे शिकवलं
एकेक शब्दाचा मोती करून
माळायचे कसं शिकवलं
जात नाही ती
म्हणे 'जात' होय
कोणीच उतरवू शकत नाही
ती ज्ञानाची कात होय
कात काढून साप
जसा नवाकोरा होतो
ज्ञानाची कात चढून चढून
माणूस खराखुरा होतो
पणती आमची, वात आमची
उजेड मात्र तुमचा होता
बुद्धी आमची, कष्ट आमचे
मार्ग मात्र तुमचा होता
मी लोखंडाचा तुकडा
गुरुजी परीस बनून आले
ज्ञानाच्या स्पर्शानं
आयुष्याचं सोनं करून गेले
तुमच्यासारखाच मीही आता
आदर्श गुरुजी झालोय
पावलावर पाऊल ठेवून
ज्ञान वाटत चाललो
