सुगंधित सोहळा
सुगंधित सोहळा
गर्भारली भुई जरा
व्याकुळ झाली जनता
मृद् गंधित झाल्या दिशा
मिटली सारी चिंता
अमावस्येची सरली रात
पौर्णिमेची नवी पहाट
धरणीच्या नजरेने धरली
काळ्या आभाळाची वाट
उजाळले आयुष्य रे
सरली सुखाची प्रतीक्षा
फुटावा सृजनाचा अंकुर
रे मेघा हीच अता अपेक्षा
डोहाळे आनंदाचे लागता
झरझर श्रावणधारा
हरित तृणाच्या मखमालीने
चराचर सजतो सारा
टाकूनि कात दुःखाची
धरणी नव शालुने सजली
बरसातीच्या नवलाईने
मनगर्भातून भिजली
हरित तृणाच्या मखमालीचा
शालू पोपटी नटला
जरीकाठाच्या बुट्टयांनी
काठ नदीचा सजला
क्षितिजा वरचे ऊन कोवळे
नव आशेचा इशारा
थेंबाथेंबातून अंकुरला
हा सृजनाचा सोहळा
कल्पतरू हा निसर्ग भासे
जादुगरही कधीकधी
मृद् गंधित सोहळ्यासंगे
सृष्टी भासते आनंदी
पक्ष्यांच्या साक्षीने पडला
पार सृजनाचा सोहळा
पावसाळी मृद् गंधाचा
आनंद आगळावेगळा।
