अपेक्षा..
अपेक्षा..
आनंदाने मन उंच उडायला लागले होते..
आकाशाला कवेत घ्यायला निघाले होते...
मातीच्या सुगंधाने सर्व आसमंत दरवळून गेले होते..
जणू मी खुशीने निलंबरात खोलवर बुडून गेले होते..
जणू हिरवेगार रान मलाच पुकारून ओरडत होते...
एकटीनेच हसून गाल दुखायला लागले होते..
खळखळलेल्या हसण्याचे आवाज चहूकडे पसरत होते..
अगदी आनंदाचे उभारे येऊन फुटत होते..
जेव्हा 'तू आला आहेस' हे मला नकळत कळले होते..
सर्व आठवणी जाग्या होऊन मला गोंधळून सोडले होते..
उगाच मला त्याच त्या विचारात गुंतायला भाग पाडत होते..
का? कसे? 'तुझे येणे' मला परत आपलेसे वाटत होते..
कळतेय रे मला.. की मी, झाले सर्व नक्कीच विसरायला हवे होते..
पण दुर्दैवाने, तुझे बोल अजूनही कानात गुंजत होते..
पण, तू येथे आहेस म्हंटल्यावर, मन परत वितळू पाहत होते...
खरंच तू गेल्यावर मी, त्याच विचारांना कवटाळणार होते..
वेड्यागत, सर्व माझे-माझे करत खुशीने उंडारत होते..
आणि.. उगाच भांबावून गेले होते...
'तू आलाच आहेस' तर दोन शब्द बोलशील एवढीच अपेक्षा ठेऊन होते..
फक्त एकदा तुला मन भरून बघायचे होते...
नंतर मीच वर्तमानाला सहमत होणार होते..
अजूनही तसाच असशील, की वाऱ्याच्या ओघाने तुलाही बदलून टाकले होते..
काहीही आपले नसताना वेडी आस लावून बसले होते..
तुझी वाट बघून-बघून मन व्याकुळ झाले होते..
खरंच, तुला डोळे भरून बघावं, मनापासून वाटत होते..
कधी तुला एकदाच भेटते, म्हणून वेसेवर येऊन ठाकले होते..
एकटेच दूरवर बघत बसले होते..
कधीतरी कुणी येईल, बोलेल माझ्याशी, विचारेल मला, विश्वासाने वाटत होते..
कदाचित कुणी आलंय का?.. असे असंख्य भास होत होते..
वळून-वळून सारखे रस्ता बघत होते..
या गोंधळलेल्या अवस्थेत काहीही सुचेनासे झाले होते..
तेव्हाच... कुठून एक आवाज आला..
कदाचित भास? नसेल.. असेल का?
आजवर अश्या अनेक भासांना मी सामोरे गेले होते..
पण.. आज हवेचे अंदाज मला कळेनासे झाले होते...
आतुरलेले मन पाठ फिरवून उभे होते..
आणि,...
कुणी तरी जोरात हाक मारून जागे करत होते..
भानावर येऊन स्वतःशीच वाद घालत होते..
कदाचित तुझे विचार माझ्या श्वासाश्वासात भिनले होते..
जे अजूनही, तू माझा असण्याचे मला सांगत होते..
अ.. का रे?
प्रत्यक्षात नाही, निदान स्वप्नात तरी भेटायला हवे होते..
- फाल्गुनी

