माझा बाबा..
माझा बाबा..
अंगाखांद्यावर खेळून आता, बराच काळ उलटला होता..
घोडा-घोडा खेळण्याचा, आवाजही विरला होता..
एकाच ताटत जेवण्याचा, हट्ट पण आता हरवला होता..
खेळ-भांड्यातील खाऊ खाऊन, 'खूप छान आहे' म्हणणारा, आवाज आता थांबला होता..
तिच्या सोबत वावरताना, उगाच स्वप्नात रंगला होता..
शाळेच्या पहिल्या दिवशी, तिला एकटीला सोडायला, तोही तयार होत नव्हता..
सायकलवरून पडले म्हणून, उगाच सायकलवर चिडला होता..
हॉस्टेलच्या दारापर्यंत, अगदीच, न चुकता सोबत करून होता..
तिला 'खुर्चीत' बघताना, गळा आवळून आला होता..
ती सासरी जाताना, धायमोकळून रडला होता..
जणू त्याच्या घरातील लक्ष्मी, दान करून देत होता..
थकलेल्या त्या पायावरती, काळपट पणा येत होता..
हातावरचा मऊपणा, केव्हाच निघून गेला होता..
सुरकुतलेला चेहरा देखील, प्रकर्षाने जाणवत होता..
ओठावरचा आवाज सुद्धा, थरथरल्यागत भासत होता..
तरीही त्याच्या वाट्याचा आनंद देऊन, तिचे दुःख घेऊ पाहत होता..
तिच्या मागे धावण्या इतका, वेळही आता उरला नव्हता..
रुसवा, फुगवा, रागवा तर, कधीचाच संपून गेला होता..
पापण्या खालील ओल आणि, चेहरा सुद्धा, सुकला होता..
आता येईल, मग येईल.. म्हणून दुरूनच रस्ता बघत होता..
जो यापूर्वी, नेहमीच अर्धा रस्ता पुढे येऊन थांबला होता..
अंगावरती ताप सुद्धा, परवानगी शिवाय येत होता..
कधी हसता-हसता, जीवघेणा ठसकाही येऊन जात होता..
'मला काही होत नाही' म्हणणारा, आता 'औषधाचं पुडकं' सोबत वागवत होता..
'ती आली हे' बघताना, थकवा तर, केव्हाच पळून गेला होता..
तिचा चेहरा डोळ्यात साठवत, खुशीने उंडारत होता..
आज परत एकदा तिच्या सहवासात,वेड्यागत रमून गेला होता..
आणि.. असाच.. नेहमीच...
तिला मोठी होताना बघता-बघता.. तोही मोठा झाला होता..
- फाल्गुनी
