ती ..
ती ..
ती नेहमीच यायची..
कधीच नाही चुकायची..
आणि आल्या पाऊली परत जायची..
हसायची नाही.. बोलायची नाही.. आवाजही करायची नाही..
वेळ नसल्यास थांबायची नाही..
पण ती दररोज न चुकता यायची..
सर्वांच्या नजरा चुकवून घरात शिरायची..
कधी दारातून, तर कधी खिडकीही चढून यायची..
कुणी बघत तर नसेल, याकडे लक्षच ठेऊन असायची..
आणि मलाच सारखं शोधत राहायची..
रोज येऊन मला उठवायची.. मी जागा होईपर्यंत तशीच बसायची..
'ये उठ ना रे..' म्हणत वैतागून जायची..
'वेळेत का भेटत नसतोस?' म्हणून सारखा वाद घालायची..
कधी तर अक्षरशः चिडून जायची..
'उद्या मी येणारच नाही..' म्हणून भीती दाखवायची..
पण तरीही ती माझ्यासाठी, दररोज न चुकता यायची..
कधी फार लवकर यायची, कधी थोडा उशीर करायची..
सर्व काही शहाण्यासारखं, निमूटपणे बघत राहायची..
जीवनात, असंख्य रंग उधळायची..
जगण्याची स्फूर्ती द्यायची..
नवीन आकांक्षेला वाचा फोडायची..
अस्तित्वाची कायम जाणीव करून द्यायची..
सगळीकडे आनंद पसरवायची..
काही क्षणातच, आपलंस करून घ्यायची..
कदाचित माझ्यावर मनापासून प्रेम करायची..
आणि त्या बदल्यात माझ्याकडून, कधीच, काहीच नाही मागायची..
कधी चिडलेच तर शांतपणे ऐकून घ्यायची..
पण तरीही ती, दररोज न चुकता यायची..
सारखं-सारखं प्रश्नांची यादी घेऊन बसायची..
पण रोज फक्त एकच प्रश्न विचारायची..
माझ्या येण्याने तुला का एवढा फरक पडतो? असे विचारायची..
झोपला असशील तर उठून बसतोस..
बसला असशील तर चालायला लागतोस..
सर्व कामे नीट करतोस..
मी येताच एवढा खुलून उठतोस..
माझ्यावरती का एवढा अवलंबून राहतोस..?
आणि तरीही मला फक्त काही वेळापुरतंच का लक्षात ठेवतोस?
तिच्या प्रश्नाचे उत्तर खरंच माझ्याकडे नसायचं..
तीचे येणे, मनाला स्पर्शून जाणे, मलाही वेगळं वाटायच..
तीच, नवीन स्वप्नांची चाहूल देणे, कधीच नाही बदलायचं..
आता तिच्याशिवाय खरंच मलाही नाही करमायचं..
जशी आयुष्यात ती नेहमी साठी, हवीहवीशी वाटत होती..
आता तिची मलाही, फार सवय होऊन गेली होती..
जणू सर्व काही तिच्यावर सुरु होऊन, तिच्या साठीच संपायच..
आणि खरंच..
त्या निरागस 'पहाटेच' दररोज न चुकता येण, मला फार आवडायच..
~फाल्गुनी
