लॉकडाऊन ते लॉकडाऊन
लॉकडाऊन ते लॉकडाऊन
बऱ्याच गोड आणि कडू आठवणींची,
विविध रेलचेल बघायला मिळाली .
नात्यांमधील दरीही जाणवली आणि
काही नवीन नातीही निर्माण झालेली पहिली .
माणसा-माणसातील राक्षस ही पहिला
आणि तो देवाच्या रूपातही भेटला .
संवाद नको तेवढे वाढलेही आणि
त्याच पटीत कमीही झालेलेही अनुभवले .
धावपळीच्या युगात स्वतःच्या कुटुंबाला
वेळही देण्याचा योगायोग आला.
आणि अति वेळेप्रसंगी घराघरात वाद
वितंडवाद हि अनुभवायास मिळाले .
आर्थिक परिस्थितीतील बदल आणि
त्यामुळे बदलेली जीवनशैली ही अनुभवली.
भारतीय संस्कृतीत असणाऱ्या समारंभाचे
आणि मराठी सणवार रुसतानाही बघितले.
श्रीमंत आणि गरीब यातील अंतर मात्र
थोडेसे का होईना कमी होताना दिसले.
विविध कारणाने अर्धवट आयुष्य सोडणारे
याच वर्षात मनाला चटका लावून गेले.
अहंकार आणि तिरस्कार करणाऱ्याची
संख्या मात्र वाढताना नक्कीच दिसली.
हिशेब मांडला तर बेरीज का वजाबाकी
याचे गणित मात्र नाही उलगडले .
सार्वभौम व्यक्तिमत्व असणारी,
परंतु विविध रंगाच्या छटा दाखवणारी,
मानवातली पशु वृत्तीही दिसली .
अनपेक्षित अंधश्रद्धा असणारी,
आणि संधीचा फायदा घेणारी,
गरिबांना लुबाडणाऱ्यांची स्वार्थी जमातही दिसली .
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर विविधतेने नटलेली सृष्टी
मात्र यावेळी थोडी जरा वेगळीच वाटली.
निसर्गाचा तडका ही जाणवला आणि
मानवाच्या कर्मठ बुद्धीची कर्तबगारी ही दिसली.
चालता बोलता शेजारच्या आणि बरोबरीच्या
वाणीची गोड आणि कडू चवही बघितली.
बंद मंदिरात जाण्याचा आग्रह करणारी,
परंतु तीच मंदिरे उघडी असताना तिकडे पाठ फिरवणारी
देवाच्याच नावाखाली आपले पोट भरणारी
आणि देवाच्याच नावाखाली धर्मजातीची विषवल्ली पेरणारी
कधी सात्विकतेची भिख मागणारी
तर कधी दांभिकतेचा धिंडोरा बडवणारी
कोरोनाच्या महामारीत राजकारण करणारी
चेहऱ्यावर अज्ञानाचा बुरखा पांघरणारी मंडळीही दिसली.
ओसाड रस्त्यांचे निर्मनुष्य दृश्य ही नजरेने टिपले.
आणि मुक्तपणे रस्त्यावर फिरणारे प्राणी ही पाहिले.
छोटेमोठे उद्योगधंधे बंद होताना बेरोजगारी वाढताना दिसली
आणि मूठभर लोकांच्या हातात अर्थव्यवस्था एकवटलेली दिसली
स्मशानभूमीत प्रेतांना अखेरच्या विसाव्यासाठी रांगेत जावे लागतंय
तर सरणही थकल्याने त्याच प्रेताची विटंबनाही झालेली दिसतेय
भारतीय राजकारणाची नीतिहीनता आणि
सत्ता खरेदीविक्रीचे रौद्र रूप ही पहायला मिळाले.
भारतीय डिजिटल मीडियाचे विकलेले खरे
आणि खोटे रूपही फार जवळून अनुभवले.
जुमल्याचं राजकारण करतांना सामान्य जनता आशेवर जगताना पहिली
परंतु सत्तेचे केंद्रीकरण मूठभर लोकांच्या हातात विसवतानाही दिसले.
कोरोनाच्या नावाखाली पैसे उकळणारी,
निवडणुकीसाठी तेच पैसे उधळपट्टी करणारी
आरोग्यसेवेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारी
आणि याच व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी
सर्व सामान्यांचा जीव ओरबाडून घेणारी
आणि उजळ माथ्याने समाजात वावरणारी
अलगदपणे गेंड्याची कातडी पांघरणारी
भारतीय राजकारण्यांची गिधाड वृत्तीही पाहिली.
