सीतेचे स्वयंवर
सीतेचे स्वयंवर
जनक नृपती जनकपुरीत अपुल्या भव्य स्वयंवर मांडितो..
वरण्या त्या भूकन्येसी राजा सर्व राजांस निमंत्रितो...
मग येती अनेक भूपती त्या सीता स्वयंवरासाठी...
राजाने मांडला पण भयंकर प्रत्यंचा लावावी शिवधनूष्यासी...
आणि करावा विवाह नंतर भूमीकन्येसी...
ऐकूनी तो कठीण पण राजे मनी घाबरले...
परंतू पाहून सुकूमारी सुंदरी मन्मनी मोहीत झाले...
एक एक करीत राजे आले धनुष्य उचलायासी...
परंतू अशक्य त्यांसी शिवधनू ते साधे हलवायासी...
चिंताक्रांत जनक भूपती राजांसी तो बोलला...
कशी केली दैवाने थट्टा माझ्या नशिबाशी..
नाहीच उरला सुयोग्य वर आता या अवनीवरती..
राहील आता माझी सीता आजन्म अविवाहीत कुमारी...
जो तो घाली माना खाली नसे बोलायासी जागा...
त्यावेळी उठला लक्ष्मण जागचा क्रोधित होऊनी जरा..
म्हणे भूपती तुम्ही न जाणले एक सत्य यावेळी..
स्वये रघूत्तम सुर्यवंशीचे येथे उपस्थित असती...
श्री रामांसारखा नाही योद्धा या त्रिखंडातही..
एका क्षणी करतील धनूभंग ते माझे पूर्णप्रतापी स्वामी..
तत्क्षणी विश्वामित्र करीती आज्ञा उठ रघुकूलदिपका सत्वरी..
प्रत्यंचा लावून धनूला हो विजयी तू दाशरथी..
राम जोडूनी हात आपूले वंदन करीती गुरूंसी..
मग आले जवळी धनुच्या पाहती सीतेसी...
उत्कंठेने प्राण मुठीत ती घेऊनच बैसली...
मनी आठवी शिवपार्वती गणेश हे तिन्ही...
तिची अवस्था पाहून किंचीत राम मनी हसले...
मग वंदन करून त्या शिवधनूष्याला हळूच वर उचलिले...
नवलचित्र ते जन आश्चर्याने आ वासूनी पाहती..
राम झणी वाकवी शिवधनूष्य ते प्रत्यंचा लावती ..
क्षणात झाला नाद भयंकर शिवधनुष्य ते भंगले...
उठला लोळ सौदामीनीचा धनूचे दोन तुकडे जाहले..
हर्षित त्रैलोक्य सारे मोठ्या तुताऱ्या फुंकीती ...
जाहला आनंद सर्वच लोका देव सुमने वर्षती...
सीता हर्षली मनी म्हणे मी धन्य धन्य श्रीरामा...
जाहले पूर्ण मन्मनीचे स्वप्न या जीवनी रघूत्तमा..
सीतेस घेऊनी आले जनक रामचंद्रांपाशी..
आज अर्पितो कन्या माझी दशरथपूत्रासी..
सीता लाजली पाहूनी सावळी मूर्ती ती साजिरी..
राम दिसे प्रसन्न पाहूनी तिजला सामोरी..
वरमाला ती विजयमाला घालते सीता रामचंद्रांसी..
डंका नौबत नाद पोहोचवी साऱ्या लोकांसी..
प्रसन्न झाले सुरनर सुमंगल सोहळा तो पाहूनी..
सीतावल्लभ उभे सामोरी अवघ्या जनांसी तोषवी..
चालला सोहळा विवाहाचा अनेक मास भूवरी..
रामजानकी विवाह जाहला धन्य जन भूतली...
