अंताक्षरी आयुष्याची
अंताक्षरी आयुष्याची


आयुष्याच्या प्रश्नांची खेळताना अंताक्षरी
कळले नाही कधी गाठली मीही पंचाहत्तरी
पूर्वायुष्याचा चित्रपट आज दिसतो समोर सारा
टप्प्याटप्प्याने वाढत गेला हा नात्यांचा पसारा
चटका लावून गेले ते असमयी दोन बंधूंचे जाणे
हृदया घाता वेळी ऐकले मी त्या काळाचे गाणे
वाटचाल आयुष्याची करतांना होता सखीचा साथ
सुखदुःखात नाही सोडला आम्ही कधी कुणाचा हात
आयुष्याच्या प्रगतीचे रेखाटतांना चित्र
साथ देणारे भेटले मला माझे चांगले मित्र
मुलांची प्रगती बघून माझ्या मनी आनंद लोळतो
नातवंडांच्या संगे आज मी लहान होऊन खेळतो
ईश्वरचरणी हात जोडून मनी असतो एकच ध्यास
आनंदाने घडो आयुष्याचा उरलेला पुढील प्रवास