शेतावरची पहाट
शेतावरची पहाट
सूर्य उगवला अंधार पळाला झाली नवी पहाट
शेता मधल्या विहिरी वरती फिरू लागले रहाट
पक्षी अपुल्या मधुर स्वरांनी गाती सुंदर गाणी
कोकीळ पक्षी पिलांस सांगे एक नवी कहाणी
कणिसावरूनी पक्षी अपुल्या चोचीत दाणे घेती
वृक्षावर घरट्यात जाऊनी पिलास ते भरविती
रातराणीचा मंद सुगंध अजूनी हवेत कसा दरवळतो
गुलाब कळीतुनी बाहेर येण्या आत मधेच वळवळतो
पाटा वरचे पाणी बघा कसे कलकल करती
पक्ष्यांच्या गाण्याला जणू ते मधुर संगीत देती
पिकातूनी पळतांना दिसला पांढराशुभ्र ससा
त्यास बघुनी रात्रीचा थकवा निघून गेला कसा
प्रसन्न मनाने जाण्याकरिता मी धरली घरची वाट
आयुष्यात प्रथमच अनुभवली ही शेतावरची पहाट
