अधुरी प्रेमकहाणी...
अधुरी प्रेमकहाणी...
धरणीमधुनी येऊन वेली
कशी वृक्षावर हळूच चढली
घेउनी आधार त्याचाच मग
उंच ठिकाणी ती पोहोचली
तिथून ती म्हणते कशी
वृक्ष तू आहेस आळशी
असून मी नाजूककशी
उंच बघ गेली कशी
गर्वाने मग तिने फुलोनी
नजर फिरवली चहू बाजुनी
लाल फुलांनी एक गुलमोहर
होता उभा नटुनीथटुनी
वठल्या वृक्षा ती विसरली
जाउनी गुलमोहोरा बिलगली
पाहुनी आकाशी वीज कडाडली
भान हरपले वृक्षावर पडली
वठला वृक्ष क्षणात पेटला
संगती घेउनी त्या वेलीला
गुलमोहराचा रंग उडाला
वीज मिळाली मातीला
झाला सर्वनाश हा भूवरी
जलदांनी केली गर्दी वरी
बरसल्या अश्रूंच्या सरी
प्रेमकहाणी ही अधुरी
