अडला हरी
अडला हरी
1 min
396
नाही निर्मळ मन
त्यास काय करील साबण.?
पूर्वग्रहदूषित चिखलाने
बरबटलेले अंतःकरण..!!
बळी तो कान पिळी
सामर्थ्य हे अफूचे व्यसन..
झिंगून नशेत बेभान नाचते
जाती पातीतले अज्ञान..!!
हात कांकणास आरसा कशाला
दिसे नेत्रपटलावर दुराभिमान..
शिव्या झाल्या ओव्या केव्हाच
अन तृप्त झाले हो कान..!!
झाले गेले गंगेला मिळाले
केवळ बोलघेवडे हे कोंदण..
सामावूनही सकलांना
लाभते गटार गंगेचे दूषण..!!
अडला हरी गाढवाचे पाय धरी
ही अगतिकतेची करुण वाणी..
पिळवणूकीचा शाप मनास
सांगा कोण आहे समाधानी..??