आयुष्य
आयुष्य
अनुभवांच गाठोड पाठीवर घेऊन,
आयुष्याची वाटचाल करतं राहतो,
थोडं थांबत,थोडं धडपडत,
माणूस नावाचा प्राणी जगत राहतो.
बालपणी आईबापाच्या प्रेमाच्या वर्षावात ,
मनसोक्त न्हाऊन घेतो,
आसुसलेल्या डोळ्यांनी साऱ्या जगाला
मनात साठवत राहतो.
कधी लाड, तर कधी मार,कधी हट्ट तर कधी थोडासा शहाणपणा,
असे खट्टेमीठ्ठे अनुभव तो जगून घेतो,
माणूस नावाचा पतंग आयुष्याच्या आभाळात भरारी घेण्यास सज्ज होतो.
शिक्षणाचा टप्पा पूर्ण करतानाच पुढील आयुष्यासाठी धडपडतो,
ह्या अफाट विश्वात स्वतःला सिद्ध करायला
अवघं तरुणपण अर्पण करतो.
माणूस नावाचा प्राणी त्याचवेळी नव्या नात्यांची सुरवात करतो.
नव्या नात्यांची रूजूवात होता होता पुढील पिढीसाठीही झटतो,
आईबापाच्या भूमिकेत शिरता शिरता तो आपल्या आईबापाचे दुःख समजू लागतो.
माणूस आता घोड्यासारखा आयुष्याच्या शर्यतीत पळतो,
प्रत्येक डाव जिंकायचाच ह्या ईर्ष्येने अजून वेगाने पळत असतो,
धावता धावता अचानक लक्षात येतं,की आयुष्याच्या
शेवट आलाय,
पण पळता पळता आयुष्य तर जगायचंच राहीलयं.
त्या सांजवेळी, निवांतपणे तो अनुभवाचं पोतडं उघडून बसतो,
जगू न शकलेलं आयुष्य आता मुलाबांळामार्फत जगायचं म्हणतो,
तरीही खूप काही जगायचं राहूनच जातं,
अनुभवी माणूस हे जग सोडून फ्रेममध्ये सामावून जातं.
