आषाढ
आषाढ
यावे आषाढासारखे
भरू रिक्तसे खळगे
तुझ्या माझ्या आठवांना
सावळीशी झावळ गे !!
भिजू आषाढ सरीत
मळा आनंदी नाचरा
डोलताना तृण-पाती
वारा भणाणतो जरा !
ओल आषाढक्षणांची
ओढ पंढरी विठूची
जिवालागी लगबग
चंद्रभागा माऊलीची
असा आषाढ सुंदर
झरझरे नभातून
गीत मोहरून येई
धरतीचे पिकातून