आस
आस
हे सृजन कोंब ओले
नवागताची इवली पाऊले
तव भेटीस्तव मन आसुसले
केव्हा भेटेल मज तान्हुले ।।१।।
रक्तिमा कपोली हसू फुले
अमृत खळी हलकेच बोले
गुज युगांतरीचे उले
शैशव मनीचे राज खोले ।।२।।
आर्त कृष्णनेत्री पापणी सरे
कारूण्य मनीचे भाव गहीरे
अबोल बोलके मुके गोजीरे
स्वमनीचे गुज सांगुन मोहरे ।।३।।
केतकीधुम कांती खुले
कृष्ण कुंतल जावळ गहीरे
करकमळी नाजूक करांगुले
आरक्तवर्णी सोनपाऊले ।।४।।
बंद मुठीतून पियुष चाखे
चुटुचुटु रव करी तन भुके
कृष्णकान्हाच गं सखे
अधर ओष्ठी खोडील भाव वसे ।।५।।
मम इवलेसे तान्हुले
कंठी कधी घालशील करपाश सोनुले
आक्रंदते मन भावविभोर बोच सले
तव भेटीस्तव तनमनी आचवले ।।६।।
