आल्या पाऊसधारा
आल्या पाऊसधारा


रिमझिम पावसाची झाली बरसात
सोबत खट्याळ वाऱ्याची मिळाली साथ
नभाने प्रीतिचा वर्षाव केला भरभरून
वसुंधरेच्या मनी तरल भावना आल्या दाटून
ओल्या मृत्तिकेचा कोवळा तो गंध
मनामनाला गंधित करून गेला तो सुगंध
चराचरीची भिजली मने हिरवी चिंब
नभभर पसरली जलधारांची रांग, बरसले थेंबच थेंब
कणाकणातून डोकावू लागले कोवळे अंकुर
रानोमाळ पसरला गालीचा हिरवळीचा सुंदर
मेघ दाटती नभी हळुवार जाणवला गारवा
हर्ष फुलला मनी जलधारांचा झाला तो स्पर्श नवा
बरसणाऱ्या धारांत कुणी शोधू लागले हरवलेले क्षण
कुणी पावसात आसवे गाळून हलके करू लागले मन
व्रात्य बालपण नाचू लागले मुसळधार पावसात
कागदी नावा सोडू लागले वाहत्या प्रवाहात
तरुणाई चिंब झाली बरसणार्या धारांत
हुरूप, रोमांच भरले त्यांच्या रोमारोमांत
उतारवय दुरूनच घेऊ लागले आनंद
गतकाळच्या स्मृतींनी हसू लागले मंदमंद
तरुवरांची काया झाली प्रफुल्लित
कणाकणांत पसरला मोद, मने झाली उल्हसित
बरसू लागल्या धुंद होऊन पाऊसधारा
भिजून चिंब चिंब झाला हा आसमंत सारा