आला श्रावण
आला श्रावण
ठुमकत मुरकत दरी खोर्यातून,
हासत खेळत नदी झऱ्यातून,
वार्यासंगे दंगा घालत,पिंगा घालत,
ऊन पाऊस खेळत खेळत,
आला श्रावण आला श्रावण. ......1
हिरवाईच्या विविध छटांवर
रानफुलांचा कशिदा सुंदर
भिरभिरणारे फुलपाखरू
हुंगत फिरते फुलात अत्तर
आला श्रावण आला श्रावण. .......2
हरखून गेली गुरे वासरे
हरखून गेली रानपाखरे
खुशीत डुलती शेत शिवारे
आनंदाने हसते कानन
आला श्रावण आला श्रावण. .......3
हिरवा श्रावण पिवळा श्रावण
श्याम सावळा मोहक श्रावण
रिमझिम रिमझिम ओला श्रावण
इंद्रधनू सतरंगी श्रावण
आला श्रावण आला श्रावण. .......4
