आई
आई
जाता वाटं माहेराच्या सय तुझी येते आई
अंगणात तुझी मूर्ती आणि दारी जाईजुई
मला पाहता चकाके हिरे थकल्या नयनी
धावे हरणीच्या गती अलाबला ती घेऊनी
किती नजर प्रेमाची माया भरे काठोकाठ
भिरभिर फिरतसे माय माझ्या पाठोपाठ
ऊनऊन मऊ भात वर लोणच्याची फोड
कोंदणाचा बोल एक तीला वाटतोय गोड
चिवचिवते लेक कौतुकाने पाहे ती माय
हळुवार थोपटून शिण घालवे गुमान
आज सय उरे दारी तुला शोधते नजर
धाय मोकलून रडे तुझा घेऊनी पदर
नाही लगबग दारी नसे आतूर ती भेट
अशी कशी दूर गेली तू करुनं ताटातूट
तुझी माया राहे मागे जाईजुई ही उदास
मोह घालतेय वाट कोणासाठी जाऊ खास
तुझा हात अंधारात वाटे हलतो दूरुनी
काय गुन्हा मी ग केला गेली आम्हासी सोडूनी
