आई कधीच रिटायर होत नाही
आई कधीच रिटायर होत नाही
एक अल्लड मुलगी, लग्न होऊन सासरी आली,
म्हणता म्हणता त्या घरातलीच होऊन गेली.
पाहता पाहता लग्नाला दोन वर्ष सरली,
पाळणा हलला नाही म्हणून घरात कुजबूज सुरू झाली.
थांबा ना सारे, एवढी काय घाई,
सेटल तर होऊ दे आम्हाला, मग होईन मी आई.
नको मला बाळ आता, मला अजून थोडं जगायचंय,
माझं आयुष्य मला अजून थोडं जपायचंय.
एके दिवशी आईने, तिच्या गोडूलीची समजूत काढली,
मी पण असाच विचार केला असता तर? असं म्हणत रडली.
आईचे भाव लेकीला, समजत जरूर होते....
मन मारून का होईना, आईसाठी लेक गाली हसते.
एके सकाळी प्रेग्नंसी किटवर गुलाबी रेषा खुदकन हसल्या,
अल्लड मुलीच्या मनी आता बाळाचा वेध विसावला.
क्षण क्षण ती स्वत:ला खूप जपू लागली,
काय काय करू मी आता विचार करून सुखावली.
एरवी लोळत पडणारी ती, मॉर्निंग वॉक घेऊ लागली,
पालेभाजी नक्को म्हणणारी, सारं आवडीने खाऊ लागली.
फळं, ड्रायफ्रुट्स, नारळ पाणी, रोज हजेरी लावू लागलं,
बाळ माझं कसं निरोगी राहणार, मनी चक्र फिरू लागलं.
सारंच कसं आनंदी, मी तर होतेय सर्वांची लाडकी,
काय सासर काय माहेर सगळीचकडे अगत्य किती.
सातवा महिना लागला आता, डोहाळे जेवणाचा रंगलाय थाट,
नवरोबाच्या डोळ्यात दिसतेय टेन्शनयुक्त प्रेमाची लाट.
दिवस सरतायत तसे, बी.पी. चा वेग वाढतोय,
पायाची सूज पाहून, नवरोबा मात्र चक्रावतोय.
बाळाला पण आता वेध लागलेत, आईला पाहण्याचे,
दुडूदुडू खेळतंय पोटात, प्रयत्न करतंय येण्याचे.
नऊ मासाच्या प्रतीक्षेनंतर, अखेर सुवर्णक्षण तो आला,
गुटगुटीत निरोगी गोंडस बाळ, आईच्या कुशीत विसावला.
आता आईचा अनोळखी प्रवास, झाला आहे सुरू,
दूदू, शीशी, सू...... की दुपटं आधी बदलू?
रात्र रात्र जागणं, झालं आता नेहमीचं,
बापडी विचार करू लागली, बाळाचं टाईमटेबल कधी सेट व्हायचं.
आईने समजावले, म्हणाली, होईल नीट सारे,
तीन सहा महिन्याचेच तर हे सारे सोवळे.
सहा महिन्याचं बाळ, हळूहळू रांगू लागलं,
नऊ महिन्याचं होताच दुमखुरं चालू लागलं.
म्हणता म्हणता बाळ एक वर्षाचं झालं,
बाललीला त्याच्या करत आता घरभर पळू लागलं.
दोन मिनिटांची उसंतं नाही मिळत आता बापडीला,
कामंच कामं आहेत घरात, कुणी नाही जोडीला.
जो तो फोन करतो, करतो बाळाचीच चौकशी,
दमछाक माझी होतेय फार, कुणा सांगू माझी स्थिती.
तीन वर्षाचं माझं बाळ,जाऊ लागलं शाळेत,
म्हंटलं जरा छंद जपेन, मिळणार्या मोकळ्या वेळेत.
टाईम मॅनेजमेंट काय ते, सारेच शिकवू लागले,
कसा काढावा वेळ, याचे मोफत सल्ले मिळू लागले.
स्कूल बस मधे बाळाला बसवून, ती स्वयंपाक घरात गेली,
लगबगीने स्वयंपाक करून, ती ऑफिसच्या कामात व्यस्त झाली.
मिटिंग फोन कॉल्स ऑफिस एक्टीविटिज,दिवस सारा सरला,
निरागस त्या बाळासाठी कितीसा वेळ उरला?
लाडाकोडात, रागे भरून बाळ मोठे होऊ लागले,
अभ्यासाचे त्याचे चक्र जोरात फिरू लागले.
दहावी झाली, बारावी झाली, ग्रॅज्युएशन ही पूर्ण झाले,
नोकरीसाठी बाळ आता परगावी पंख पसरू लागले.
बाळ मोठे झाले तरी, आई काही मोठी झाली नाही,
नीट असेल ना बाळ माझं, ही तिची चिंता काही सरली नाही.
पंचविशी उलटली बाळाची, दोनाचे चार हात झाले,
नोकरीची वर्षे सरली हीची, रिटायर्ड लाईफ सुरू झाले.
स्वत: नोकरी करताना, भोगली होती दगदग,
मिळू नये ती लेकाला, यासाठी तिची तगमग.
सेकंड इनींग आयुष्याची, सुरू झाली मग जोमाने,
आनंद तयाचा द्विगुणित झाला, नातवंडाच्या येण्याने.
पुन्हा एकदा,
दोन मिनिटांची उसंतं नाही मिळत आता बापडीला,
कामंच कामं आहेत घरात, कुणी नाही जोडीला.
जो तो फोन करतो, करतो बाळाचीच चौकशी,
दमछाक माझी होतेय फार, कुणा सांगू माझी स्थिती.
थकला भागला जीव तो, उत्साहाने नातवाला पाही,
स्वत:च समजावे स्वत:ला, वाचलं होतं ना कुठेसं......
आई रिटायर होत नाही
