बघ जमतंय का?
बघ जमतंय का?
माणुसकीला काळिमा फासत, आराजकतेच्या जाळ्यात गुरफटत
बांधुन घेतलंस स्वतःला
जात, धर्म , समाजाच्या बंधनात.......
टाक तोडून ते पाश आणि
बघ जमतंय का "माणूस" म्हणून जगायला.....
घेतलस स्वतःला बरबडून भगव्या, हिरव्या, निळ्या रंगात
दिसायला लागलाय लाल रंग रक्ताच्या थारोळ्यात.....
सुकून होतोय काळा दुसऱ्या दिवशी निषेधाच्या आरोळ्यात.....
टाक पुसून सगळे रंग आणि
बघ जमतंय का "माणूस" म्हणून जगायला.....
तुझं-माझं च्या नादात सगळंच गमावून बसलास....
सखे, शेजारी अन नजरेतला विश्वासही हरवून बसलास..…
ठेव हात हृदयावर, डोकाव अंतरंगात आणि
बघ जमतंय का " माणूस" म्हणून जगायला....
तू कोण ठरविणारा, किती चौकटी आखणार
बघ तो चष्मा उतरवून लख्ख दिसेल तुला....
हात, पाय, कान, डोळे असं वेगळं तरी काय.....
तुझ्यासारखा तोही वाढला नऊ महिने मातेच्या उदरात
काढून फेक पांघरलेलं वेड आणि
बघ जमतंय का "माणूस" म्हणून जगायला.....
नको होऊस कृष्ण, शिवाजी
नको कलाम, पैगंबरही
नको बुद्ध, आंबेडकरही.....
नाही जमणार तुला, एवढ महान व्हायला.. ...
नुसतं पुजून काय होणार, घे वसा आणि
बघ जमतंय का "माणूस" म्हणून जगायला.....