STORYMIRROR

Swati Damari-Masurkar

Others

2.5  

Swati Damari-Masurkar

Others

किन्नर - तुझाच रे मी अंश....

किन्नर - तुझाच रे मी अंश....

2 mins
1.3K




माझ्या येण्याची चाहूल,

तीच हुरहूर, तोच आनंद....

आई-बाबा होणार म्हणून

होतं आकाश ही ठेंगणं....


गर्भसोहळ्याचा उत्साह,

घेऊन नवीन स्वप्ने उरात...

आज येण्याचा दिन,

तू, मी अन सारेच आनंदात..


किंचाळीने माझ्या,

चेहऱ्यावर आनंदच पेव फुटलं....

चिमुकल्या जीवाचं आज

घरात आगमन झालं...


एकाच प्रश्न आनंदात

काय आहे पेढा की बर्फी...

शब्द झाले मूक,

फक्त चादर बाजूला ओढली...


काय चुकलं, कोणाचं चुकलं,

आनंदावर विरजण पडलं....

जन्मघरात अचानक

मृत्यूच्या अवकळेच सावट पडलं...


माझं माझं करणाऱ्यांचं

एक पाऊल मागे पडलं..

आपल्यांच्या नजरेत आज

अचानक परेकपण दिसलं....


नक्की काय चुकलं,

तान्हुलाल्या काहीच कळत नव्हतं....

जन्म देऊन कधी असं

आई-बाबापण हरवतं....


सहज वेगळं केलं,

तांदळातील खड्यासारखं

देऊन टाकलं असच,

वापरलेल्या वस्त्रासारखं.....


काहीच वाटलं नसेल का ?

का अस क्रूर वागणं?

पोटाच्या गोळ्याला टाकून,

आईनं आईपण जाळलं.....


परिपूर्ण म्हणतोस स्वतःस

तू आणि तुझा समाज

तुझाच रे अंश मी

मग का वाटावी तुला लाज......


ठेवायची थोडी चाड

जनाची सोड मनाची..

माझा जन्म झाला

तुझ्या प्रेम वासने पोटी....


स्त्री -पुरुष नादात,

माझं माणुस असणं नाकारलस..

लिंग काय हे काळण्याआधीच,

माझं बालपण कुस्करलस...


फेकून दिलंस नरकात,

जन्म दिल्याचं पांग फेडत...

सारे असून अनाथ मी

वर द्वेषाने धुतकारलस....


सतावत होते सारे प्रश्न,

अस्तित्त्वाचा ठाव घेणारे....

नर नारी का माणूस

यातच गोलगोल फिरणारे....


कोवळ्या वयाला तरी

काय काय कळणार होतं.....

पोटाची भूक नि मायेची ऊब,

भीक मागून मिळत का कुठं?...


एवढ्यावरच कुठे का

सारं थांबणार होतं...

सारं आयुष्य पुढ्यात

आ वासून उभं होतं...


वयात येता येता

सारंच गणित चुकलं होतं...

पुरुषाच्या देहात आता

बाईपण मिळत होतं...


शरीरा बरोबर मन सुद्धा,

साडीतच सजत होतं...

सैरभैर झालेलं काळीज,

त्याच्या स्पर्शासाठी झुरत होतं...


नाकारल माझं अस्तित्व,

घरा दारात, समाजात...

शरीराचा उपभोग चालतो

चार भिंतीच्या अंधारात...


नरकयातना माझ्या झोळीत,

टाळ्यात माझ्या दुवा मागणारा...

समाजाच्या नावाखाली

धर्माच्या चौकटीत राहणारा...


ठरवू दे ना मला माझं जीवन,

स्त्री की पुरुष देहात...

माणूस म्हणून जगायचंय,

तुझ्याबरोबर या जगात.....


Rate this content
Log in