मनावर वार
मनावर वार
लहान ती छकुली,भासे नाजूक बाहुली,
कोण्या निर्दयाने तिची अशी दशा केली.
डोळा आले पाणी पाहून तिचा अवतार,
मनावरचा वार जाई काळजापार....
आईने दिलेला खाऊचा डबा जवळी,
दप्तर अस्ताव्यस्त फुटली पाण्याची बाटली.
शाळेचा ड्रेस तिचा नको तितका वर,
मनावरचा वार जाई काळजापार....
रक्ताचा पाट सांगत होता निर्दयी कहाणी,
अंगावरील जखमा बोलल्या दीनवाणी.
ओठांजवळ काळा हिरवा रक्ताचा थर,
मनावरचा वार जाई काळजापार....
केला कोणी भल्याने पोलिसांना फोन,
पोलिसही थबकले थिजले त्यांचे मन.
आई बाबांचा आक्रोश ओरखडे आरपार,
मनावरचा वार जाई काळजापार.....
निपचित कलेवर गेला वासनेचा बळी,
कायमचे प्रश्नचिन्ह आई बाबांच्या भाळी.
वासनांध दुनियेपूढे मायबाप होती लाचार,
मनावरचा वार जाई काळजापार......