STORYMIRROR

Sangita Nikam

Others

3  

Sangita Nikam

Others

प्रतारणा

प्रतारणा

1 min
262

उतरता संसाराच्या गूढ चक्रव्यूहात

अडकत जाऊन जबाबदारीच्या ओझ्यात

रूढी परंपरांच्या न पेलणाऱ्या जोखडात 

इतरांच्या सुखासाठी अहोरात्र कष्टण्यात

आवडी निवडींना मी पूर्णपणे विसरले

इतरांसाठी जगायचे हे मनाला पटवले

इच्छा आकांक्षाना कोपऱ्यात दडवले

अन् परत एकदा मी स्वतःला फसवले!


स्त्रीजन्माच्या होरपळणा-या अग्निपरीक्षेत 

उंबरठ्याने ओढलेल्या लक्ष्मणरेषेत 

समाजाच्या आखलेल्या भ्रामक चौकटीत 

स्वतःला गुंतवून आदर्शाच्या भानगडीत

स्वतःला संपवून नव्याने मी बसवले

चेहऱ्यावर समाधानाचे मुखवटे चढवले

परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकवले

अन् परत एकदा मी स्वतःला फसवले!


शब्दबाणांनी कर्तव्याच्या रणांगणात

घायाळ होऊन दुःख लपवले काळजात

न केलेल्या चुकांची माफी मागण्यात

विविध भूमिकांच्या अशा नात्यागोत्यात

असह्य आघातांनी खूपदा कळवळले

बळजबरी ओठांवर स्मित पसरवले

कडवे घोट निमूट अपमानाचे जिरवले

अन् परत एकदा मी स्वतःला फसवले!


खूपदा वाटले जिवाला, मनसोक्त हुंदडावे

स्वच्छंदी पंख लावून मुक्त बागडावे

जोरजोरात आवडीचे गाणे गुणगुणावे

मनाला वाटेल तसेच एकदा जीवन जगावे

पण....पुन्हा या भावनांना आवरले

जे जसे आहे ते मनाने हळूच स्वीकारले

आलेल्या हुंदक्यांना बेमालूम चिरडले

डोळ्यातले पाणी हसण्यात लपवले

अन् परत एकदा मी स्वतःला फसवले!


Rate this content
Log in