रंगमयी जीवन
रंगमयी जीवन
इंद्रधनुच्या रंगांमधूनी सदा रंगवावे
जीवनाच्या पटलावर कुंचल्याने,
मनाच्या सुप्त भावनांना चितारण्या
सृष्टीतील मनमोहक रंगीत छटाने.
गुलाबी रंग लाडका सर्वांचा
प्रेमभावना हळूच कुरवाळतो,
गुलाब पाकळ्यांनी कागदावर
प्रेमीच्या मनाची कवाडे उघडतो.
प्रेमाची कबुली लाल रंगाने देता
नववधूच्या भांगेत शोभून दिसतो,
जातीभेदाची मिटवून खुळचट दरी
लांबूनच प्रत्येकाचे चित्त वेधतो.
प्रत्येक रंग सांगतो गुपित हळूच
मानवी विश्वातील विविधतेचे,
रंगाशिवाय उजाड अवघे जग
कोडे उलगडतात हे रंग जीवनाचे.
सूर्योदयाचे रंग आणती सृष्टीत
चैतन्याचे लक्ष संजीवन धुमारे,
भावनांचे रंग उकलती साऱ्या
मानवी जीवनातील गूढ कंगोरे.
मुक्त रंगात साऱऱ्या बेधुंद रंगुनीया
सदा हास्य फुलवू सुंदर चेहऱ्यावर ,
त्यासाठी रंगाची आरास सजवण्या
ओंजळभर रंग उधळू आयुष्यावर.
