वर्गामधल्या झिम्माड गोष्टी
वर्गामधल्या झिम्माड गोष्टी
आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी अचानक आठवत जातात अगदी काल परवा घडल्यागत काही प्रसंग आठवलेकी मन विषण्ण होतं तर कधी मनाला उभारी देतं... अशा छोट्या छोट्या घटनांची अखंड मालिकाच काही क्षण डोळ्यासमोर तरळून जाते. पण कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही. शालेय जीवनापासून सुरुवात करणे योग्य ठरेल.
तर मित्रांनो ते दिवस होते मंतरलेले... थोडेसे हळवे, बावरलेले... थोडेसे उगाच भ्रमिष्टासारखे पण नंतर सावरलेले क्षण... त्याला कारणही तसंच होत. मुळात इच्छा नसतानाही मला रीऍडमिशन घ्यावी लागली होती दहावी इयत्तेत अन् तेही रेग्युलर करणेही आवश्यकच होत. त्यातल्या त्यात वर्गात एक नाही दोन नाही तब्बल अठरा वीस मुली होत्या. त्याकाळी मुलं मुली एकत्र वर्गात बसवले जायचे. मुलींच्या वेगळ्या तुकड्या नंतर अस्तित्वात आल्या. शाळेचा पहिला दिवस मी थोडा अवघडून गेलो होतो. मुलं हा कोणता प्राणी आपल्या कळपात आला याच दृष्टीने पाहत असल्याचे मला नाहक वाटून गेले. त्यातल्या त्यात मुली चोरून पाहत काही बाही कुजबुजत असल्याचे मला जाणवल्याने मी आणखीनच गांगरून गेलो होतो. काय करणार आलिया भोगासी असावे सादर समजून कसाबसा मागच्या बाकड्यावर बसून होतो. काही मुलांना चांभार चौकश्या करण्याची भारी सवयच असते. माझ्या दुर्दैवाने तशी मुलं मला भेटले नसती तर शाळा कसली ? मी मात्र तडक उठून धूम ठोकावी असे क्षणभर मनाला वाटून गेले. मुलांनी चिडवायला सुरुवात केली म्हणून मी त्याला एक दोन लगावल्या तर तो मुलगा हातातली स्केल घेऊन उगारु लागला. मी मागे न पाहता मागे सरकलो अन् अचानक ती मागून आली. माझा पाय तिच्या पायावर पडला. मी प्रचंड घाबरलो आता काही खरं नाही ती मूर्ख, नालायक ... काही बाही बडबडत वर्गाबाहेर गेली. मला मात्र धडकी भरली की आता सरांनाच सांगून आपली हकालपट्टी नक्कीच. एक एक क्षण मला युगाप्रमाणे भासत होता. काय होणार काही काही कळत नव्हतं... थोड्यावेळाने वर्गात मुलं आली. सरांची तासिकाही सुरु झाली. तसं मी सुटकेचा निःशस सोडला नि तिचे मनात आभारही मानले. पण बरेच दिवस मी जीव मुठीत घेऊन तसाच वेळ काढत राहिलो.
नंतर मात्र त्या वातावरणात रुळत गेलो. अभ्यासात हुशार असल्याने मी शिक्षक मंडळीचा आवडता विद्यार्थी नाही म्हणता येणार पण त्यांच्या सहानुभूतीस पात्र मात्र नक्कीच झालो. त्यात काही खत्रूड गुरुजींचा रोषही पत्करावा लागलाच म्हणा. मुलींशी विशिष्ट अंतर ठेवूनच होतो कारण अगोदरच विनंती करून ऍडमिशन मिळवली. शिकण्याची तीव्र इच्छा होती त्यावर पाणी फिरलं जाऊ नये म्हणून दक्षता घेणंही आवश्यकच होत. पण नंतर मात्र वर्गातल्या मुलींनाही बहुदा कळून चुकलं असावं बहुदा की मी सरळमार्गी साधा सरळ निरुपद्रवी नाकासमोर चालणार विद्यार्थी आहे म्हणून... नंतर वह्या देणे घेणे, गैरहजर असताना काय शिकवले ते एकमेकांना सांगणे, सर्वतोपरी मदत करणे निःसंकोचपणे - बिनदिक्कत चालू झाले. कारण गावाकडचा आणि मुलांपैकी फारसा भाव न खाणारा मुलगा वाटत असावा म्हणून त्यांनी खेळीमेळीचे वातावरण वर्गामधल्या मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले व ते वर्षभर टिकून होते पण... त्याचे परिणाम वर्गातील हुशार व गुरुजींचे लाडके
विद्यार्थी माझ्या विरोधात जाणे स्वाभाविक अन् साहजिकच होते ... त्यांची मुलींमधील प्रतिमा माझ्यामुळे कमी होत असल्याचे त्यांना जाणवत होते. कारण साधारणतः हुशार मुलांचे लक्षण म्हणजे पुढच्या बाकड्यावर बसणे. इतर सर्वसाधारण मुलांना कमी लेखणे. मुलांसमोर नाहक भाव खाणे. त्यांच्याकडून वही पेन , पेन्सिल उकळून त्यांना परीक्षेत मदत करण्याचे खोटे अमिष दाखवणे अना मुलींसमोर फुशारक्या मारून वह्यांची देवाण घेवाण फक्त आपणच करावी असा गोड गैरसमज त्याचा होता. पण मी ते सर्व रिवाज मोडीत काढले होते. एकतर मी मागील बाकड्यावर बसत होतो. सर्वसाधारण मला सन्मानाची वागणूक दिल्याने व हुशार विद्यार्थ्यांची मिरासदारी मोडीत काढल्याने काहींना हायसे वाटतं होते तर काहींना वाईट वाटत होते. मग काय प्रत्येक गोष्टीमागे चांगल्या वाईट परिणाम होतात तसे मलाही काहींचा रोष पत्करावा लागला. पण मी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यात सफल झालो असलो तरी काही मुलींचा रोष तर काही मुलांची सहानुभूती मिळाली काहींची चक्क मैत्री झाली ती कायमचीच...
त्यात एकीशी सूर जुळत गेले आणि मी खऱ्या अर्थाने कळत नकळत तिच्या प्रेमात कधी पडलो ते कळलेदेखील नाही. ती माझ्याशी बोलण्यास नेहमीच आतुर असायची. ती अभ्यासात हुशार असल्याने वर्गात मार्कस जास्त कोणाला पडतात याची खुन्नस असायची. मुलांना मुलींपेक्षा कमी मार्क्स मिळाले की गुरुजी बांगड्या भर असं हिणवायचे. मुली हरकून जायच्या आणि मुलं हिरमुसून जायची. सर्व परीक्षेच्या वेळी तिला हिंदी विषयात चांगले व सर्वात जास्त मार्क्स पडले म्हणून तिचं कौतुक झालं पण माझी हिंदी विषयाची उत्तरपत्रिका सरांनी जाणूनबुजून दाखवली नाही. मुलांनी गोंगाट केला तेव्हा सगळ्यांना गप्प बसवलं. मी मात्र शांत बसून होतो पण सर्वाना माहित होत मला नक्की जास्त मार्क्स असतील. मुलांनी सरांकडे माझी उत्तरपत्रिका दाखवण्याचा आग्रह धरला पण सरांनी रिपीटरची कसली स्पर्धा तुमच्याशी म्हणून सर्वांना गप्प बसवलं. शाळा सुटल्यानंतर मला ऑफिसात बोलावून मला उत्त्तरपत्रिका दाखवून मार्क्स सांगण्यात आले.
मी बाहेर पडलो तेव्हा ती माझी वाट पाहत असल्याची मला शंका असण्याचं कारणच नव्हतं. बाकीच्या मुली निघून गेल्या होत्या. ती मात्र माझी वाट पाहत थांबलेली मुलांनी मला सांगितलं. पण मी त्याकडे लक्ष न देता झपाझप पावलं टाकत घराच्या दिशेने निघालो तेव्हा तिने मागून हाक मारत मला थांबवलं.. अन् तुला किती मार्क्स मिळाले हे विचारले. मी काहीही न बोलता पुढे चालत राहिलो तशी ती केविलवाणी होत सांग ना रे तुला किती मार्क्स पडले ? मी तुसडेपणाने म्हणालो तुला काय करायचे ? सरांचा राग मी नाहक तिच्यावर काढत होतो ती गुपचूप माझ्याबरोबर चालू लागली. अन् म्हणाली मला खात्री आहे तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेत म्हणून.. सरांन असं करायला नको होतं. जाऊ दे ... पण सांग ना तुला किती मार्क्स पडले ती सारखं म्हणत होती. मी मात्र तसंच पुढे चालत होतो काही क्षण मनात येत होत सांगून टाकावं तिला पण. तिला असं उगाच बोललो असंही वाटत होतं. सरांनी सांगितलेलं खरं होतं. रिपिटरची कसली स्पर्धा ? हेही पटत होतं.