Prashant Subhashchandra Salunke

Comedy Romance Fantasy

3  

Prashant Subhashchandra Salunke

Comedy Romance Fantasy

तू थांब गं जरा थांब

तू थांब गं जरा थांब

5 mins
213


     ह्या बायकांना लहान लहान गोष्टीत माहेरी निघूनजाण्यांची आपल्या नवऱ्यांना धमकी द्याची घाणेरडी सवय असते.

     आज माझा ही माझ्या पत्नीशी- दीपाशी वाद झाला होता. तिने पण मला माहेरी निघून जाण्याची धमकी दिली. पण इथे असल्या धमक्यांना कोण घाबरत आहे! इथे बुवा कोणाला फरक पडत आहे. ज्या लोकांचे लग्न झाले नाही ते काय जगत नाही का? बायको दबवेल आणि मी दबल्याजाईन असल्या स्वभावाचा मी बिलकुल नाही. आजचाच प्रसंग पहा न! माझ्या बायकोने मला फळीवरून पोहे काढायला सांगितले. मला!!! मी स्पष्ट नाही सांगितले. अरे! भाऊ, हे काय आपल काम आहे का? आज पोह्याचा डब्बा काढायला सांगितला उद्या कांदेपोहे बनवायला सांगेल!

  ‘चल... चल... मी नाही काढून देणार.’

  माझे हे उत्तर एकून दीपा म्हणाली, ‘अहो, माझा हात फळीपर्यंत पोहचत नाही म्हणून तुम्हाला सांगितल!’

  अरे देवा! म्हणजे... म्हणजे माझा हात फळीपर्यंत पहोचतो असंच नं? वो तो कानून के हाथ लंबे होते है. बाबा माझे नाही. माझी वागणूक पाहून दीपा मला धमकी देत म्हणाली, ‘मी जेव्हा माहेरी जात राहीन तेव्हा तुम्हाला कळेल.’

  अरेच्या! जायचं तर जा... मी तर म्हणतो काल जाणार असशील तर आजच जा! असल्या धमक्यांना कोण घाबरत आहे! बघं भाऊ, मी स्वतंत्र होतो... स्वतंत्र आहे... आणि स्वतंत्र राहीन. गुलामीची सवय मला लहानपणापासून नाही. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर असे क्रांतिकारी माझे पूर्वीपासूनच आदर्श राहिले आहेत. आणि ही आली मोठी मला दबवाला. छे. परमेश्वराच नाव घेऊन मी पलंगावर आडवा पडलो आणि कधी माझा डोळा लागला ते मला कळालचं नाही.

  अचानक वाजलेल्या डॉरबेलच्या रिंगने माझे डोळे उघडले.

  घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेचे पाच वाजले होते!

  हे कोंबडे आता आरवायचं सोडून डॉरबेल वाजवायला शिकले की काय?

  मी चादर माझ्या तोंडावर ताणत म्हणालो, "कोण आहे?"

  बाहेरून मोठ्याने आवाज आला, "दूध..."

  मी कंटाळून माझ्या चादरीतून बाहेर निघालो आणि दार उघडले. बघतो तर काय? बाहेर दुधाचं कॅन घेऊन दुधवाला उभा होता.

  मी जरा रागानेच म्हणालो, "काय रे! सकाळच्यापारी लोकांची झोप मोडायला येतो की दुध द्यायला? दुध म्हणे... दुध.”

  जणू समोर जगाच आठव आश्चर्य असल्यासारखे दुधवाला माझ्याकडे पाहत होता.

  मी म्हणालो, “ए बावळटा. असं माझ तोंड काय बघत आहेस? चल आता दुध दे.”

  दुधवाला म्हणाला, “साहेब, दुध घेण्यासाठी आतून भांड आणा.”

  झोप अजून माझ्या डोळ्यांवरून गेली नव्हती. मी जांभया देत देत आत स्वंयपाकघरात गेलो आणि भांड घेऊन आलो. दूधवाल्याने त्यात दूध ओतले. मी दुधाने भरलेलं ते भांडे आत स्वयंपाकघरात जाऊन ओट्यावर ठेवले आणि तसाच झोपायला गेलो. सकाळी अचानक मला जाग आली. मला ऑफिसमध्ये आज लवकर जायच आहे ते लक्षात येताच माझ्या डोळ्यांवरची झोप उडाली. मला भूक देखील पुष्कळ लागली होती. पोटात कावळे कोकायला लागले. समोर टेबलावर पाहिले पण त्याच्यावर चहा किंव्हा नास्ता कांहीही ठेवलेले नव्हते. अच्छा लक्षात आले. दीपा रागाने माहेरी निघून गेल्या मुळे माझा नास्ता मलाच बनवायला लागणार होता. असो जे होईल ते बघता येईल असा विचारकरून चादरीला एकबाजूला फेकून मी तसाच उभा झालो. आज मी नास्ता बनवणार होतो. ते पण माझ्या आवडीचा! पण स्वयंपाकघरात जाऊन पहातो तर काय? दुधाच्या भांड्यात एक पाल पडली होती. पण कशी काय? अरे हो! त्यावर झाकण ठेवायचं मी विसरून गेलो होतो. दुधा शिवाय आता चहा कसा बनवणार? सोडा तो चहा. असा ही मला कुठे आवडतो! पण आता बनवायचं तरी काय? मला कुठले पदार्थ बनवता येतात ते मी आठवू लागलो. पहिल्यादा माझ्या लक्षात आलं की चहा व्यतिरिक्त मला दुसर काही बनवता येत नाही. कदाचित दुधात पाल पडली नसती तर माझा हा भ्रम देखील तुटला असता! असो, नास्ता करण्याचा विचारकरून मी फ्रीज उघडलं आणि त्यात खाण्यापिण्याच्या वस्तू शोधायला लागलो. पण रात्री काय बनवून ठेवल असेल तर फ्रीजमध्ये दिसेल नं! दोन फळं सापडली. जशी सापडली तशीच पोटात गेली. जठराग्नी थोडासा शांत झाला. पण अजून बरेचशे काम बाकी होते. मी अजून आंघोळ केली नव्हती पण हा टॉवेल कुठे आहे? माझे कपडे पण जागेवर नव्हते! रोज तर इथेच टेबलावर ठेवलेले असयाचे! मग आजच नेमके कुठे गेले! मी तातडीने कपाटात टॉवेल आणि माझे कपडे शोधू लागलो. सुमारे अर्ध्या तासानंतर मला टॉवेल सापडला. त्याच्या पंधरा मिनिटांनंतर कपडे सांपडले. म्हणजे ते शोधण्यांसाठी मला एकूण पंचेचाळीस मिनिटं लागली होती आणि दुसरी वीस मिनिटं ते शोधण्यासाठी कपाटातून काढलेल्या वस्तूंना कपाटात परत ठेवण्यासाठी. जाऊ द्या तो विषय. असं तर चालतच राहत. आज घड्याळांचा कांटा वेगाने धावत होता. कदाचित नवीन सेल टाकण्याचा तो परिणाम असावा! टेन्शनमुळे मला भलतेच विचार येत होते. माझी अजूनही आंघोळ झाली नव्हती. आंघोळीनंतर कपडे पण मलाच धुवायचे होते! नंतर जेवण!!! अरे! हो, ते पण मलाच बनवायचं होतं म्हणजे भांडीकुंडी पण मलाच घासावी लागणार! जर हे सर्व मी केलं तर ऑफिसला कधी जाणार? ठीक आहे, आज दुपारचं जेवण मी हॉटेलमध्ये करीन. आता अनलिमिटेड थाल देणाऱ्या होटल जागोजागी आहेत. हो हेच बरोबर आहे. अश्याने मला भांडी घासण्यांपासून तर सुटका मिळेल. संध्याकाळी घरी आलो की मग मी कपडे धुवीन. पण ते वाळतील कधी? आणि ऑफिसमधून आल्यानंतर जर मी कपडे धुवत बसीन तर रात्रीचं जेवण कोण बनवणारं? सोड तो वैताग. रात्रीचं जेवण पण हॉटेलमध्येच करीन. हा विचार येताच मी आनंदित झालो परंतु दुसऱ्या क्षणीच मनांत विचारं आला की दोनवेळी हॉटेलमध्ये जेवीन तर हॉटेलचं बिल किती होईल? माझा एका दिवसाचा संपूर्ण पगार तर हॉटेलमध्येच वापरला जाईल!!! सोड, घरीच काहीतरी बनवून खाईन. पण मग भांडीकुंडी घासावी लागतील त्याच काय! कपडे धुण्यांची डोकेदु:खी तर अजून तशीच आहे... आणि हो केरकचरा तर विसरलोच! “हे देवा! वाचव रे मला” असं कींचाळत मी जागा झालो.

  शेजारी झोपलेली माझी बायको दीपा म्हणाली, “काय झालं? का ओरडताय? झोपू द्यान.”

  हाश! माझी बायको माझ्या बाजूलाच झोपली होती. माझी लाडकी माहेरी गेली नव्हती. मी तर अगोदरच म्हणालो होतो की ह्या बायकांना लहान लहान गोष्टीत माहेरी निघूनजाण्यांची आपल्या नवऱ्यांना धमकी द्याची घाणेरडी सवय असते.

 

  बाहेर दारावरून आवाज आला, “दुध...”

  दीपा उठतच होती की मी प्रेमाने म्हणालो, “प्रिये! तू झोप... आज दुध घ्यायला मी जातो.”

  दीपा म्हणाली, “दुध घ्यायला बाहेर जाल तेंव्हा जरा सूर्य पण बघा आज कुठल्यां दिशेने उगवला आहे ते.”

  दीपाची झोपमोड होणार नाही ह्याची काळजी घेत मी स्वयंपाकघरात भांड घेण्यासाठी गेलो. जेंव्हा दार उघडलं तेंव्हा दुधवाला माझ्या हातात दुधाच्या दोन पिशव्या ठेवत म्हणाला, “साहेब, भांड का घेऊन आलांत?”

  मी काही न बोलता चुपचाप दार बंध केलं आणि प्रेमाने पाहू लागलो मला आणि माझ्या ह्या घराला हसत खेळत संभाळून घेणाऱ्या माझ्या बायकोला.

  पण म्हणतात न कि कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच.

  सकाळी मी आराम खुर्चीमध्ये शांतीने वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. दीपा स्वयंपाकघरात सकाळचा नास्ता बनवण्याच्या घाईगडबडीत होती. अचानक तिने स्वयंपाकघरातून मला हाक मारली. “अहो, ऐकतात का?”

  “काय झालं आता?”

  “फळीवरून बेसनपीठाचा डब्बा जरा काढून द्या न.”

  “कशाला पाहिजे तो?”

  “आज नाश्त्यात गरमागरम कांदेभजी बनवण्याचा विचार आहे.”

  “अगं गरमागरम कांदेभजी खायला आता पावसाळा आहे का? राहून दे ती कांदेभजी! मी काही बेसनपीठाचा डब्बा काढून देणार नाही.”

  मला वाटल दीपा समोर काही म्हणेल. पण ती गप्प राहिली.

  ही वादळा अगोदरची शांतता तर नाही ना???

  रात्रीचं स्वप्न माझा डोळ्यासमोरून निघून गेल. दीपाच्या हातातील सुटकेस पाहून माझ्या अंगातून घामाच्या धारा फुटू लागल्या. माझ्या तोंडातून किंकाळी निघाली, “थांब ग...”

  स्वयंपाकघरातून दीपा म्हणाली, “काय झाल आता?”

  आराम खुर्चीतून तातडीने उठण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो, “मी बेसनपीठाचा डब्बा काढून देण्यासाठी आलो. तू थांब गं जरा थांब.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy