Shilpa Desai

Drama Thriller

3  

Shilpa Desai

Drama Thriller

तु दूर जाताना

तु दूर जाताना

25 mins
389


    माझी एम.ए ची परीक्षा संपली. आजच शेवटचा पेपर झाला होता. त्यामुळे आज डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे कमी झाले होते. अगदी मस्त! प्रफुल्लीत वाटत होते. जवळ जवळ दोन महिने नुसता अभ्यास एके अभ्यास चालला होता. स्टडीरुम हेच जणू विश्व झाले होते. इतर गोष्टीकडे लक्ष दयायला वेळच नव्हता.

परीक्षा संपली की प्रथम स्वंयपाक करायला शिकायचा. तसेच आईला वाटते म्हणून विणकाम, भरतकाम इ... शिकावे. असा एक मी मनात ढोबळ आराखडा आखत बसले होते. इतक्यात आईने गरमागरम चहा आणला. चहाचा कप हातात घेऊन मी गच्चीवर गेले. चहा पितानांच टेबलवरचे मॅगझीन चाळत बसले. वातावरणात मस्त धुंदी होती. दूरवर पक्षांचे थवे आपल्या घरटयाकडे जाताना दिसत होते. सुर्यराज लाल जांभळया रंगात पश्चिमेकडे मिरवत होता. कुंडीतल्या गुलबकावलीकडे माझी नजर गेली अन ती गोजरी फुले खुदकन हसली. कितीतरी दिवस मी त्यांना पाहिलच नव्हतं. बिचारी माझी आतुरतेने वाट पाहत असावीत. पटकन उठून कुंडीपाशी गेले आणि हळुवारपणे फुलांवर ओठ टेकवले. त्याक्षणी रस्त्याकडे लक्ष गेले. रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. त्या अनोळखी माणसात ओळखीचा आभास झाला. माझे डोळे ताटारले. पुन्हा एकदा खात्री केली. ‘होय ...तीच ती..’ मनाची खात्री झाली. आता मी धावतच रस्त्याच्या दिशेने सुटले. स्कुटर थांबवून कोणाशीतरी ती बोलत होती. मी बाहेर येईपर्यंत ती बरीच पुढे गेली होती.

रीक्षाने जाऊ का . .

‘‘रिक्षा ’’…sssssssssssssss

         ‘‘मॅडम कहॉ जाना है ’’

         ‘‘सिधा चलो. किसीका पिछा करना है ’’ ‘‘ भैया तेज से चलाओ ना. ......................थोडा और तेज से ’’ माझी सारखी भूणभूण चालू होती. तसा तो गुस्यातच बोलला, ‘‘ मॅडम और कितना तेज चलाऊ, अपघात करवाना चाहती हैं क्या.’’ पण मला त्याच्या बोलण्याची पर्वांच नव्हती.

आत्ताच तर दिसली. एवढया लवकर गेली कुठे. तीच होती का ‘ती’.... होय नक्कीच. तीच ती.

 माझ्या मनाने कौल दिला.

रुको.... रुको !

भुर्र .. भूर्र ... आवाज करत रिक्षा तिच्या बाजूला जाऊन थांबली. तशी ती बाई दचकून जोरात चालू लागली.

‘ ताई...’ मी मोठयाने हाक दिली. तसे तिने मागे वळून पाहिलं.

‘आपण मला विचारलंत का ?

‘ स्वारी पण तुम्ही मला माझ्या ताईसारख्या दिसलात म्हणून हाक मारली. सॅारी, काही नाही या आपण ’.

ती कोणीतरी अनोळखी बाई आहे, हे पाहून माझी खुपच निराशा झाली. पुन्हा हताशपणे माघारी फिरले.

        गच्चीवर जाऊन पुन्हा त्याच खुर्चीवर विसावले. काही वेळेपुर्वी हवेहवेसे वाटणारे वातावरण आता नकोसे वाटू लागले. पुन्हा एकदा विचारचक्र सुरु झाले. कालचक्राचे वर्तुळ दिवस‐महीने‐ वर्षे करीत अखंडपणे चालू असते. आपल्याही सुखदु:खाचे असेच असते, कालचक्राप्रमाणे ती भेटत राहतात. हा पाठशिवणीचा खेळ असाच असतो कोणालातरी सुखाची आशा देतो तर कोणी दु:खाचे राज्य घेऊन बसतो. आणि हे सगळे करतो तो परमेश्वर ! त्याच्यावर श्रद्धा जितकी जास्त तितका हा खेळ चांगला रंगतो. मग त्या दु:खाच्या राज्यातही सुखाची आशा माणसाला खेळण्याची ताकद देते.

        या सगळयाचा तिने कधी विचार केला असेल का ? या जगात परमेश्वर वैगेरे कोणी नाही. आणि तो जर असेल तर नक्कीच आंधळा किंवा बहिरा असावा. का छळतो तो असा मला. डोळयातील आसू लपवत ती बोलली होती.

        तिचे आणि माझे नेमके नाते कोणते हे सांगणे अशक्यच. आमचे नाते मायेचे होते. नाती काय फक्त रक्ताचीच असावी लागतात. माणूसकीची नाती किती लागेबंधे निर्माण करतात. असेच होते आमचे नाते कोणाला न उमगणारे पण मायेने भरलेले.

   काही वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा आम्ही आमच्या गावी म्हणजे सोनगावला राहत होतो. कारण माझे बाबा शिक्षक होते; आणि बाबांची बदली त्याच गावांतील स्कुलमध्ये झाली होती. अनासाये आम्हाला स्वत:च्या घरात आमच्या जॉईन्ट फॅमिलीमध्ये राहायला मिळत असल्याने दिवस मजेत जात होते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचे मंदीर. गावापासून देवूळ लांब नाही पण उंच घाटमाथ्यावर बांधलेले आहे. घाटाला बगल देऊन वाहणारी नदी आणि पैलतिरावर घनदाट जंगल. तसेच किना‐यावर केवडयाचे आणि वेळूचे दाट बन आहे. अगदी विलोभनीय देखावा. निसर्गाचा वरदहस्त आहे हया गावावर. कमनिय विलास! संध्याकाळचा तासनतास बसून निसर्गाचे मधुर संगीत ऐकण्यात खुप मजा वाटे. मला तर तो छंद जडला होता.

        त्या दिवशी सोमवार होता. सकाळचे नऊ वाजले होते. देवळात घंटानाद चालू होता. मलाही महादेवाच्या देवळात जायचे होते. मी पूजापात्र व फुलांनी भरलेली परडी घेऊन घाटाच्या पाय-या चढत होते. तेव्हाच मला समोरच्या कठडयावर एक जोडपं बसलेले दिसले. त्यातील पुरुष्याच्या हाताला जबर जखम झालेली दिसली. आणि ती बाई आपल्या रुमालाने त्याच्या हातावर पट्टी बांधत होती. तो एकसारखा कण्हत होता.

‘‘ मॅडम प्लीज मला थोडे पाणी मिळेल का’’,ती व्याकुळतेने मला म्हणाली.

‘‘हो, नक्कीच मिळेल. यांना खुपच लागलयं, तुम्ही थांबा इथे मी लगेच पाणी आणून देते.”

मी लगभगीने देवळामागच्या तळीतील पाणी त्यांना आणून दिले. तीने पहिल्यांदा त्याला पाणी पाजले. मग तहानेने व्याकुळ झालेली ती स्वत: घटाघटा पाणी प्यायली. ते पिताना तिच्या अंगावर सांडत होते याची जाणीव तीला नव्हती.

आता तीला थोडसं सावध वाटलं. तशी ती म्हणाली ‘थॅकू मॅडम, आणखी एक विचारु का ?’

‘विचारा की ’ मी.

‘ गावात एकादी भाडयाने खोली मिळेल का.’ किलकील्या डोळयांनी पाहत अपेक्षेने तिने मला विचारल. ‘तसं काही निश्चित सांगता येणार नाही पण चौकशी करावी लागेल. पण तुम्ही कोठून आला आहात व यांना हा अपघात कसा काय झाला.’ माझे प्रश्न चालूच होते. पण व्याकुळ होऊन ती मला पुन्हा म्हणाली ‘आम्हाला कुठेतरी राहायची सोय सांगा ना प्लीज............’ तीच्या त्या प्लीज मध्ये आर्तता होती. मला तीची खुपच दया आली.

 ‘‘ताई, तुम्ही थोडा वेळ त्या झाडाखाली बसा मी देवळात जाते व तुमच्या मदतीसाठी कोणालातरी विचारणा करते. कारण तुमच्या मिस्टरांना खुप त्रास होत आहे त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे नेले पाहिजे.’ असे सांगून घाईनेच मी देवळात प्रवेश केला पिंडीवर डोकं ठेवलं आणि मनातलं देवाला सांगितलं, देवा त्या अनोळखी माणसांना मार्ग मिळू दे. देवाचा प्रसाद घेऊन पुन्हा त्या दोघांजवळ आले.

 ‘ हा घ्या प्रसाद.’ तिच्या हातावर प्रसाद ठेवत मी म्हणाले. तिने तो प्रसाद अगाशासारखा तोंडात टाकला. नंतर त्या बाप्याला भरविला. पुन्हा एकदा ते पाणी प्यायले. आता त्या दोघांना बरं वाटत होत. बरं, इथल्या सदानंदाला मी सांगितलेले आहे तो आत्ताच बाजार लाईनला जाणार आहे. तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही प्राथमिक आरोग्यकेंद्रातील डॉक्टरकडे जा; म्हणजे तुम्हाला तिथे उपचार होतील. हा, आणि एक इथे वाहतुकीची साधने जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहेत त्यामुळे सदा बरोबर सायकलने जा. तो नेईल तुम्हाला.

इतक्यात सदा तिथे आलाच आणि रोजच्याप्रमाणे हीsss हीईssss करत विचारलं, ‘मंजीरीबाय कोणला इजा झाली हाय. हयांना व्हय. तुम्ही काळजी करु नका माझ्या या सायकलनं मी तुम्हास चटदिशी डाक्टरकडं नेतो’. बोलल्याप्रमाणे सदाने सायकलच्या मागे बसवून त्यांना हॉस्पिटल मध्ये नेले. नाहीतरी सोनगावचे लोक एकमेएकमेकांना मदत करण्यास पुढे असतात. आपल्या जीवाची पर्वा न‐करता अडलेल्याला मदत करणे हा त्यांचा धर्म. आता तिचे डोळे पाण्याने भरले. कासाविस होत ती बाई म्हणाली, मी कविता आणि हे माझे पती श्रीकांत गवाणेकर. मी एका कंपनीत नोकरी करते. आणि श्रीकांत इंजिनिअर आहेत. आणि आमच्या दोघांचे कालच लग्न झाले आहे. असे म्हणून ती ओक्साबोक्सी रडू लागली. तिला मी कसेबसे सावरले.

चला आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया. मी येते तुमच्याबरोबर. असं मी बोलताच तीचा चेहरा खुलला. आम्ही पायीच चालू लागलो. ती पुढे बोलू लागली. ‘माझ हे दुसरं लग्न. पहिला नवरा अपघाती वारला. आणि श्रीकांतनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्याहीपेक्षा असे म्हणेन घटस्फोट प्रोसेच चालू आहे. काल आमचं लग्न अंबाबाईच्या देवळात झालं. त्यानंतर आम्ही श्रीकांतच्या घरी गेलो. श्रीकांतने दरवाजाचे लॉक ओपन केले आणि आम्ही घरात प्रवेश केला. आजुबाजूला अगोदरच दगा देऊन बसलेली चारपांच आडदांड माणसे काठया कोयते घेऊन दरवाज्यात उभी होती. एकाने तर जोराचा एक दांडा श्रीकांतच्या डोक्यात घातला. लगेच दुसरा, तिसरा पुढे सरसावले. काय करावे हेच कळत नव्हते. पण तशाही अवस्थेत श्रीने ढकलत एकाला बाहेर काढलं अंधारामुळे दुसरा माणूसही बाहेर खेचला गेला त्या संधीचा फायदा घेऊन श्रीने दरवाजा आतून बंद केला. मी खूप घाबरले होते. दरवाजा बाहेरुन मोठमोठयाने ठोठावला जात होता. ती माणसं आम्हाला ठार मारण्याची धमकी देत होती. अश्लील शिव्यांचा मारा चालूच होता. जीव मुठीत घेऊन मी व श्री बाथरुमध्ये जाऊन बसलो. मला हे सगळेच नविन होते. काहीच कल्पना येत नव्हती. ते लोक दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही त्याचवेळी खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो. उंबरठयावरचे माप ओलांडून नवरी घरात प्रवेश करते तोच उंबरठा सोडून जीव वाचविण्यासाठी पळून दूर जायचे होते.

   कसलाही आवाज न करता श्रीकांतने बाथस्टूल व बकेटचा आधार घेत बाथरुमच्या भिंतीवर चढून मागच्या बाजूच्या छप्पराची चार कौले काढली. नंतर भितीवर चढून मागच्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून जवळ जवळ कसेबसे आम्ही बाहेर पडलो. श्रीकांतच्या हातावर मानेवर रक्ताचे ओघळ वाहत होते. हाताला जखम झाली. आवाज न करता लपत लपत पळत सुटलो. पुन्हा मागे वळून पाहण्याचा धीर होत नव्हता. त्यांच्या बोलण्याचा आवाज मात्र येत होता. एकामोठया खडकाच्या मागे जाऊन बसलो. तर परत त्यांच्या आकृत्या मागावर असलेल्या दिसल्या. माझ्या पायात आता चालण्याचेही त्राण उरले नव्ह्ते. समोर काळोखाचे साम्राज्य पसरले होते आणि आमच्या डोळयासमोर काजवे चमकत होते. पुन्हा तिकडून पळण्याचा प्रयत्न केला असतानाच श्रीकांतचा पाय खडकाला अडकला व तो सरळ चार पाच फूट खोल खड्डयात कोसळला. आता माझ्या छातीचा ठोका चुकला होता. मागून त्या मारेकऱ्यांचा आवाज येत होता. म्हणजे ते अजूनही आमचा पाठलाग करीत होते. आता मी क्षणाचाही विचार न करता श्री कोसळला त्या खडयात अक्षरक्ष: उडी घेतली. सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही. श्रीकांत निपचीत पडला होता. आता मरण समोर दिसू लागले. त्याही अवस्थेत मी देवाचा धावा करीत होते. आणि माझ्या लक्षांत आले की श्री जिथे पडला होता त्या खडकाच्या खाली खोलवर कपारीत वन्य प्राण्यांनी खड्डा केला आहे. मी श्रीकांतला उठविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उठताच येत नव्हते. मग मी त्यांना जवळ जवळ ओढतच त्या कपारीत नेले.कसेबसे त्या खड्‌डयात जाऊन आम्ही बसलो. बाजूलाच असलेल्या झुडूपामुळे आम्ही दोघेही कुणालाच दिसलो नाही. पंधरा मिनीटांनी त्यातला बाब्या नावाचा माणूस झुडूपापर्यंत येऊन पोहचला. तो काही वेळ तिथे उभा होता. तोपर्यंत श्वास रोखून मी झुडपातून त्याच्याकडे पाहत होते. आजूबाजूला सगळीकडे त्याने नजर टाकली, पण त्याला काहीच दिसले नाही तसा तो निघून गेला. आता आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर पहाटे तिन वाजेपर्यंत आम्ही तिथेच बसून राहिलो. श्रीकांतला फार दुखत होते. त्याला वेदना होत होत्या. तो सारखा कण्हत होता. सहा वाजेपर्यंत आपल्याला पोलिस स्टेशन गाठायचे असा मी विचार करत होते. श्रीला चालता येत नव्हते. पण कोणत्याही परीस्थितीत तिकडून निसटायचे होते. आणि आम्ही कसेबसे वाट मिळेल तिकडे चालू लागलो. रोडवर आल्यावर एखादे वाहन मिळेल या आशेने चालत राहिलो पण ते मिळालेच नाही. अखेर इथे येऊन पोहचलो. समोर शंकराचे मंदिर बघून धीर आला. आणि तुम्ही भेटलात.

बोलत असतांना आम्ही हॉस्पिटलला कधी येऊन पोहचलो कळलेच नाही. श्रीकांतला एक वेदनाशामक इंजेक्शन दिले होते. हाताला मलमपट्टी केली होती. आम्ही तिथे गेल्यावर त्यांना सलाईन लावण्यात आला दोन दिवसासाठी ॲडमिट करण्यास सांगितले. डोक्याला काही प्रमाणात मुका मार लागला असल्याचे डॉक्टरने सांगितले. कविता सारखी विनंती करत होती, ताई आम्हाला तु खुप मदत केली हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता मला आणखी एक मदत कर. आम्हाला भाडयाने रुम बघून दे. मी काहीच बोलत नाही हे बघून ती गयावया करु लागली. ‘कुठेतरी भाडयाने जागा मिळाली म्हणजे टेन्शन नाही.’ ती स्वत:शी पुटपुटली.

आता मला रहावलं नाही मी नाईलाजास्तव तिला म्हणाले.‘बरं दोन दिवस तुम्ही आमच्या घरी रहा. मी माझ्या बाबांना सांगते. पण त्यानंतर तुम्हाला दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल.’

‘देव तुझे बरे करुदे !’ डोळयातील पाणी लपवत ती म्हनाली.

‘चला तर मग, ठिक आहे.’ मी हसून म्हणाले.

‘दुपारचा १वाजला. देवळात जाते म्हणून ही मुलगी सकाळी साडे आठ वाजता गेली. अजून कशी आली नाही. नायतर बसली असेल समाजसेवा करत. आईला कामात मदत करायची सोडून लोकांना मदती करत बसेल. जसं काय सगळया जगाचा भार हिलाच घ्यायचा. मी मंजीरी एवढी असताना माझं लग्न झालं होतं आणि मी दोन दोन पंगतीचं रोज जेवणावळी करायची. आता सारखे नव्हते हो...अहो मी तुमच्याशी बोलते म्हटलं. आपली तरुण मुलगी बाहेर जाऊन खुप वेळ घरी नाही, ती कुठे गेली ? याची हया माणसाला काळजी चिंता काही नाही. वेळ मिळाला की फक्त त्या पेपरात नाक खुपसून बसायचे ’स्वयंपाकघरात आईची बडबड चालू होती. शामराव मा़त्र शांतपणे आजच्या ताज्या बातम्या वाचण्यात गर्क होते. ‘या,हे आमचे घर. चला मी तुम्हाला बाबांची ओळख करुन देते.’

‘हं…. आणि प्लीज ‘तु मला फक्त ताई बोल. अहो वैगेरे नको बोलूस.’ ती अगदी गंभीर स्वरात बोलली.

ओ. के. मला आवडेल ताई म्हणायला.

आईची स्वयंपाक घरातून बडबड चालली होती. ‘काय गं मंजीरी, अजून काय करीत होतीस; हे काय वागणं झालं. कॉलेजला सुटटी म्हणून काय घरी आईला मदत करू नये असं तुमच्या प्रोफेसरने सांगितले की काय, की आभाळ कोसळेल.’

मग मात्र मी आरोळी ठोकली. ‘‘अगं आई,बाहेर ये अगोदर मग ओरड मला,आपल्याकडे कोणीतरी पाहुणे आलेत?’’

तशी माझी आई पदराला हात पुसत बाहेर आली व मला म्हणाली, कोण ग हया ?

आई‐बाबा, ही कविता गवाणेकर. एका संकटात सापडली आहे. हीचे मिस्टर श्रीकांत इथल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या मागे मारेकरी लागलेत. त्यानंतर कविताताईने सगळी कहाणी बाबांना सांगितली. मग बाबांच म्हणाले आमच्या इथे रहा दोन दिवस.

तोपर्यत आईने जेवण वाढलं. गरमागरम स्वयंपाक जेवून तिला समाधान मिळालं होत. आणि बाबांनी कविताताईला आमच्या घरी राहण्याची परवानगी दिल्याने मला समाधान वाटत होत. दुस‐या दिवशी श्रीकांतला हॉस्पिटल मधून डिसचार्ज मिळाला. कविता त्यांना घेऊन आमच्याच घरी आली. जेवण झाल्यावर श्रीकांत बाबांना म्हणाला, आम्हाला तुमच्या गावात भाडेतत्वावर कुठे राहाला जागा मिळेल का आमचा कुठचाही त्रास होणार नाही. वाटल्यास ॲडवॉंन्स म्हणून काही रक्कम देईन मी.

हे बघा तुम्हाला भाडयाने इतर ठिकाणी घर बघण्याची काहीच गरज नाही. आमच्या घराच्या मागच्या बाजूला दोन रुम रिकामेच आहेत. अगोदर त्या ठिकाणी जोशी गुरुजी भाडयाने राहायचे. सध्या ते रीकामे आहेत. त्यात तुमचे बि‐हाड मांडा. आणि भाडे जमेल तसे दया हो. बाबांच्या बोलण्यामुळे श्रीकांतच्या डोक्यावरचा बराच भार कमी झाल्यासारखे वाटले. त्यानंतर साधारणत: सहा महिने आपला संसार त्यांनी त्या रुम मध्ये आनंदाने केला. कविताताई व माझी आता खुपच घटट मैत्री झाली. प्रत्येक कामात मला तिची मदत व्हायची. ती खुप ॲक्टीव होती. आईला घरकामात देखील मदत करायची. अनेक चांगले चांगले पदार्थ करायला तिने मला शिकविले. रोज संध्याकाळी फिरायला जाणे हा तर आमचा आवडता छंद. श्रीकांतसुध्दा आमच्यासोबत केव्हा केव्हा फिरायला येत असत. कॉलेजजीवनापासून लग्नापर्यंतचा सगळा जीवनप्रवास ती जेव्हा सांगायची तेव्हा तिची कहाणी ऐकून वाईट वाटायचे.

गेले सहा महिने ते दोघे जवळ असलेल्या पैश्यावर उदरनिर्वाह करत होते. दोघेही बिनपगारी सुटटीवर होते. त्यामुळे असलेली नोकरी किती टिकून आहे की नाही ते ही माहित नव्हते. त्यामुळे पैसा संपत आला होता. श्रीकांत इंजिनिअर असून परिस्थितीमुळे घरात बसला होता.पण आता नोकरी करणं भाग होते. काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा गोव्यात जाण्याचा निर्णय बाबांना बोलून दाखविला आणि ते योग्य असल्याचे बाबांनी शिक्कामोर्तब केले.

दुस‐याच दिवशी दोघेही आमचा निरोप घेऊन मडगांवला राहायला गेले. मला त्या दिवशी अगदीच सुनंसूनं वाटायला लागले. मागचे सहा महिने कविताताईची आम्हाला इतकी सवय झाली होती की तिची सारखी आठवण यायची. मध्यतरी तिची भरपूर पत्रे यायची. श्रीकांतला एका कंपनीत नोकरी मिळाल्याने आता त्यांचा प्रपंच मार्गी लागत होता.

कविताताईला मुलगी झाली तेव्हा तिने अगदी चार पानी पत्र मला लिहीलं होतं. सगळयांना छकुलीच्या बारशाचे निमंत्रण होते. तिच्या आग्रहामुळे आम्ही मडगावला तिच्याकडे गेलो तेव्हा आमचा तिने आनंदाने खुप चांगला पाहुणचार केला होता. आमच्याबद्दल तिच्या मनात आपुलकीचे बंध होते.

आज त्या सगळया आठवणीनी मनात काहूर माजलं. कुठे गेली असेल ती ? काय झालं असेल तिचे? आणि मुळात नातं मानून ते रेशमी बंधात जोपासणारी ती अशी कशी सगळया गोष्टी विसरते. माझं मन पुन्हा एकदा अस्वस्थतेच्या चक्रात सापडले. भुतकाळात डोकावून पाहावं असं वाटू लागलं. गणेशचतुर्थीचे दिवस होते. वातावरण मंगलमय गणेशात धुंद झाले होते. मी अंगणात रांगोळी रेखाटत बसले होते. इतक्यात गेटपाशी ऑटो थांबलेली दिसली. ऑटोतून एक बाई उतरत होती. तिच्यासोबत भली मोठी बॅग होती. रमाकाकुंचा राजू ‘ताई आली, कविताताई आली’ म्हणून ओरडला.माझ्या मनात उगाच पाल चुकचुकली ‘हिचं काही बिनसलं की काय’तिचा चेहरा अगदीच उतरलेला होता. डोळयाच्याबाजूने काळी वर्तुळे दिसत होती. सोबत छकुलीपण नव्हती.

मी आश्चर्याने तिला विचारले, ‘काय गं ताई अशी अचानक कशी काय आलीस.’तशी ती घोग‐या आवाजात म्हणाली; ‘का,माझ्या माहेरी येण्याची परवानगी लागते का?’

‘ये ताई स्वॉरी गैरसमज करुन घेऊ नकोस गं. मी अगदी सहज विचारले.’ माझ्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिल्या नाही. डोळयात फक्त ओलावा होता. काही तरी गंभीर कारण होतं. ती नेहमीप्रमाणे बोलत नव्हती. तिच्या खोल गेलेल्या डोळयात दु:खाची झालर दाटली होती. कविताला कुणापाशी तरी मन मोकळं करायचं होत. पण कस करावं हे कळत नव्ह्त. मागच्या साली नव‐याबरोबर तान्हया मुलीला घेऊन आमच्याकडे आली होती. मुलगी फार गोजिरवाणी, अगदी तिच्यासारखीच. आपल्या छकुलीचं किती कौतुकाने बोलत होती. नवरोबाचं तर फारच कौतुक सांगत होती. तिच्या बोलण्यावरुन तेव्हा सगळं आलबेल होत. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. अर्थात हे सगळं त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसत होतं. हेवा करावा इतका सुखी संसार होता. हे लग्न म्हणजे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. दोघंनीही दु:खाचे चटके सहन केले होते. आणि प्रेमाच्या ओलावा त्यांना जगण्याची उमेद देत होता. मग कविताताई अशी आगतिक होऊन का आली हे मला उमगत नव्हतं. रात्रीचे साडेअकरा वाजले तरी ती गॅलरीत बसून होती. समोर रस्त्याच्या कडेला लावलेले दिवे लुकलुकत होते. दूर कुठूनतरी भजनाचे सात्विक स्वर ऐकू येत होते. रस्त्यावरुन जाणा‐या गाडयांचा आवाज मात्र त्या वातावरणाला बेसूर करत होता.

दिव्यांचा तिरपा प्रकाश तिच्या तोंडावर पडला आणि ती एकदम दचकली. मी मायेने तिच्या पाठीवर हात ठेवला. माझा स्पर्श होताच ती भानावर आली. आता मात्र तिचा हुंदका फुटला. कितीतरी दिवस साठवलेल्या दु:खाचे सर ती ओतत होती. दूरवरची माडाची झाडे सापासारखी फणा काढून डंक मारण्याच्या बेतात असल्यासारखी भासत होती. त्याचवेळी आकाशातील ढग चंद्राला काळे आवरण घालू पाहत होते. आणि ती आपली कर्मकहाणी आम्हाला सांगू लागली. आम्ही चार भावंडे. त्यात माझा चौथा नंबर. मोठी बहीण सासरी सुखात आहे. भावांचं पण लग्न झालं. वडील निवृत्त आहेत. पापा नोकरीला असताना आम्ही सगळे पणजीला राहायचो. मी सगळयात लहान पण माझे घरात फारसे कोणी लाड करत नसत कारण माझा जन्म झाला आणि आई बाळंतपणात आम्हाला पोरकं करुन गेली. सगळं घर दु:खाच्या छायेत आलं. काही दिवसानी दु:खातून सावरण्याचा प्रयत्न केला तोच माझा तिन नंबरचा भाऊ खेळताना अपघाती वारला. चार वर्ष वय होते त्याचे मी अपशकुनी ठरले. मला खुप शिकायचे होते. पण बी.एस.सी. ची परीक्षा दिली आणि पापानी माझे लग्न ठरवले. मुलगा दिसायला चांगला होता. बिझनेस करायचा. रामपूरला घर होते जमिनजुमला होता. काही दिवसातच माझ लग्न झालं. आणि मी सासरी आले. सगळी नवलाई. नविन नाती निर्माण झाली. अनोळखी माणसे आपली झाली. नवलाईचा पहिला दिवस संपला. दुस‐या दिवसापासून मला त्या घराचे घरातील माणसांचे नवरंग दिसू लागले. मी ज्या राजपिंडाशी लग्न केले आहे त्याला घरात काडीचिही किंमत नाही. दिवसभर काजुची फॅक्टरी सांभाळायची आणि रात्रीची घरगडयासारखी घरातील कामे उरकायची. लग्नाच्या दुस‐याच दिवशी हा विहीरीवरुन पाणी आणण्यापासून गोटयातील गुरांचे शेण भरुन टाकण्यापर्यंत एकटाच राबत असताना मला दिसला. सतत थोरल्या वहिनीच्या सरबराईत अडकलेला वाटला. महाराणीसारखी बसून वहिनी सतत त्याला काम सांगत होत्या आणि हा गडी वॉर्डर पाळत होता.

दुस‐या दिवशी रात्री तर माझा माझ्या डोळयावर विश्वासच बसत नव्हता. रात्र बरीच झाली होती. विशाल अजूनही झोपायला बेडरुममध्ये आला नव्हता. मी त्याची वाट पाहत बसले होते. घडयाळाचा काटा टीक‐टीक करुन वेळ झाला आहे याची आठवण करून देत होता. विशाल कुठे गेले असावेत म्हणून मी प्रत्येक रुममध्ये जाऊन डोकावून पाहू लागले. सहज वहिनीच्या रुमकडे लक्ष गेले ते आत येणा‐या कुजबूजीमुळे. दरवाजा बंद होता. मी तो थोडासा ढकलून पाहिला तर आतून कडी लावली नव्हती. दरवाजाच्या फटीतून मी आतमध्ये पाहिले. ‘शी ...! हा काय करतो.’माझ्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले. विशाल वहिनीच्या कंबरेला बाम चोळत बसला होता. अरे हिचा नवरा घरी असताना ही बाई विशालला का सांगते. आल्या पावली मी माझ्या बेडरुममध्ये परतली. बराचवेळ मी विशालची वाट पाहत बसली होती.

जेव्हा विशाल बेडरुममध्ये आला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. आतमध्ये येताचक्षणी त्याने लगबगीने दरवाजाला कडीकोंयडा लावला. आणि दबकत येऊन माझ्याजवळ बसला. भेदरलेल्या नजरेने मला पाहू लागला. मी घडयाळाकडे पाहिले दोन वाजले होते. मी लाईट बंद करायला गेले तर लाईट बंद करू नको म्हणाला. तो पूर्णपणे घामाने भिजला होता. अर्धा तास दोघेही शांत बसून होतो. अचानक बसल्याजागेवरच माझा डोळा लागला. काही क्षणानंतर अंगावर वीज कोसळावी तसा विशाल उठून माझ्याजवळ आला. चटकन माझा हात पकडला. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने मी फारच गोंधळुन गेले होते. काय घडत आहे हे मला समजायच्या आतच त्याने माझा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला कविता तु माझी पत्नी आहेस आता माझे सुखदु:ख तुझे आहे. त्या अगोदर मला तुझा चांगला मित्र व्हायचे आहे. तु होशिल ना माझी मैत्रिण. मला तुला काही सांगायचे आहे जे दु:ख मी भोगतो आहे. कदाचित तुला त्या उघडया डोळयांनी पहावे लागणार. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. घडणा‐या गोष्टीची तु कुठेही वाच्याता करणार नाही. आज तु तशी शपथ घे. विशाल कुठच्यातरी दडपणाखाली आहे हे मी ओळखले. त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हणाले की. तु जसं सांगशिल तसेच मी वागेन. आणि कोणत्याच प्रकाराची कुठेही वाच्याता करणार नाही. तु आता शांत झोप आणि विश्रांती घे म्हणजे तुला रिलाक्स वाटेल. माझ्याबोलण्यामुळे त्याला खरेच बरे वाटलेले दिसत होते. कारण काही वेळातच तो झोपी गेला. मी मात्र पश्चातापाच्या आगीत होरपळली गेले. विशालला असे कोणते कारण असेल की तो सतत दडपणाखाली असतो. असं का वागतो हे मला समजत नव्हते. हे मला सगळे शोधून काढायचे होते.

त्या दिवशी सकाळी मी पोळया करत होते. चुलीवर चहा उकळत होता. आणि बाहेर जोराचा पाऊस पडत होता. रात्रीपासून पाऊस कोसळत होता तो अजूनही थांबला नव्हता. घराजवळ असलेली नदी तुडूंब भरुन वाहत होती. तीच्या पाण्याचा घों घो आवाज कानावर बसत होता. नदीचे बरेचशे पाणी शेतात शिरले होते. विशालची घालमेल होत होती. आपल्या हाताने केलेले कष्ट तो पाण्यात वाहून जाताना बघू शकत नव्हता. पेरलेल्या भातशेतीचे नुकसान होत होते. माझ्याकडे पाहत विशाल म्हणाला, शेतात भरपूर पाणी शिरले आहे. बांध फोडून बाहेर काढायला हवे. तेव्हा मी बघून येतो. हातातील काम मध्येच सोडून मी म्हटले, ‘निदान भाकरी खाऊन जा ’

‘नको ग...नंतर खातो. अगोदर शेतात किती पाणी शिरले आहे ते बघून येतो.’

‘येतो मी. आणि ऐकलस का; बांध फोडला तर चढणीला आलेले मासे घेऊन येईन मी. रविवार आहे आज.’ बोलत बोलतच तो निघून गेला.

तासाभरात पाऊस थोडा कमी झाला. काही वेळात चारपाच पोरं ओरडत आली.विशालदादा पाण्यात बुडाला. नदीत बुडाला. हे शब्द पुसटशे माझा कानावर पडले आणि माझा शरीरातील रक्तच जणू गोठल्यासारखे झाले. तव्यातील पोळी तव्यातच करपून गेली. धावतच मी पडवीत आले. सगळी माणसे शेताकडे धावत होती. नदीचे पात्र भरुन सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. मी भिजतच नदीच्या दिशेने सुटले. माझा मागून आणखीन चारपाच बाया मला थांबविण्यासाठी धावत होत्या. अटटल पोहणा‐या चार दांड माणसांनी पूर्ण पूर्ण नदीपात्र पालथं घातलं. विशाल कुठेच सापडला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत शोध चालू होता. अखेर साडेदहाच्या सुमारास कांजरकोंडीजवळ विशालची बॉडी सापडली. हे पाहताच माझ्या पायाखलची जमिन सरकली. डोळयासमोर काळोख आला. मला चक्कर आल्याने मी खाली कोसळले. कितीतरी वेळ मी बेशुद्ध अवस्थेत होते. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा कोणीतरी एक पोक्त बाई कुजबूजत होती, पांढ‐या पायाची मेली लग्नाला चार दिवस झाले नाही तर नव‐याला मारलं. आमचं पोरगं या सटवीमुळे आम्हाला कायमचा सोडून गेला.

सगळी माणसं आक्रोश करत होती. मला मात्र रडू येत नव्हते. कारण मी मृतवत झाले होते. माझ्या समोर विशालचे प्रेत होते. त्याला पांढ‐या कापडात गुंडाळला होता. त्याचवेळी कोणीतर येऊन माझ्या हातातल्या हिरव्या बांगडया फोडत होत्या तर कोणी कुंकू पुसण्यात व्यस्त होते. हिरव्या चुडयाच्या काचा जमिनीवर पसरल्या होत्या. काच लागून माझ्या हातातून रक्त ओघळत होते पण कोणलाही त्याची पर्वा नव्हती.

विशालची दशक्रिया विधी आटोपल्या नाही तोच काही जाणत्या माणसानी प्रस्ताव मांडला की कविताने आता आपल्या लहानग्या दिराबरोबर लग्न करावे. म्हणजे तिचे संरक्षण होईल.

मला काहीही न विचारता ही माणसे माझ्या भावी जीवनाचे ठरवत होते. मला यातलं काहीच पटत नव्हतं. पण बोलून दाखविण्याची हिंमत होत नव्हती. काही दिवसातच मालमत्तासेदर्भात बोलणी झाली. गावातील पंचमंडळी जमली होती पंचांच्या समोर मला विचारण्यात आले, कविता, तु जर तुझ्या लहान दिराबरोबर लग्न केलस तर तुला नव‐याच्या मालमत्तेचा अधिकार व हक्क मिळेल. अन्यथा संपत्तीतील कवडीही मिळणार नाही. तसेच तुला जर इथे कायम स्वरुपी आसरा हवा असेल तर घरातील कुठचेही काम आनंदाने करावे लागेल.’

त्याक्षणी मी ठरवले की मला या घराशी काहीही संबध ठेवायला नको आहेत. इथल्या सगळयावर पाणी सोडायचे आणि येथून कायमचे दूर जायचे. त्यानुसार एका रात्री मी माझा गाशा गुंडाळून तेथून पळ काढला.

घरदार तर सुटलं मग आता जायचे कुठे हा यक्षप्रश्न माझासमोर होता. माहेरची वाट धरावी तर पापाना देखील असे वाटत होते की मी विशालच्या लहान भावाशी लग्न करावे. त्यांच्या डोक्यात मी अपशकूनी आहे हे होतेच आता फक्त त्याला शिक्कामोर्तंब झाले. आता माझं वागणं त्यांना मुळीच पटलेले नव्हते. पण मला सुरक्षेच्या दृष्टीने माहेरी जाणे योग्य वाटत होते. पापाना आवडत नसलं तरी मी त्यांच्याकडे राहत होते.

विशाल मला सोडून गेला त्याला दोन महिने झाले. मला आता स्वत:च्या पायावर उभ राहणं भाग होत. मी त्यासाठी नोकरीचे प्रयत्न करु लागले. अशीच एक दिवस नोकरीच्या इंटरव्हू साठी एका कंपनीत गेले. मला सारखी भिती वाटत होती की माझं सिलेक्शन होईल की नाही मला कुठचे प्रश्न विचारतील, माझं झालेले लग्न या नोकरीत अडथळा आणेल का वैगेरे. काही झालं तरी ही नोकरी सुटता कामा नये. रिसेप्शनीश्ट कडे मी चौकशी केली. तसा अकराचा टाईम दिला होता. पंधरा मिनीटं होती अजून बाकी म्हणून मी माझे डॉक्यूमेंट चाळू लागले. सगळे पेपर व्यवस्थितीत आहेत की नाही ते पाहिले. अचानक फॅनच्या हवेने माझा एक पेपर उडून गेला. मी तो उचलणार इतक्यात एक सावळा माणूस माझ्या समोरुन आला. त्याच्या बूटाचा पाय माझ्या पेपरवर पडला. पेपरवर त्याचा मातकट ठसा उमटला. त्याचा पाय पडू नये म्हणून मी जवळजवळ त्याला ढकललेच.

‘अहो मॅडम काय करता.’ तो रागाने ओरडला.

‘हॅलो,तुम्हाला लक्ष देऊन चालता येत नाही. वर मला विचारता काय करता म्हणून. माझे पेपर खराब केले तुम्ही. मला जर काही आजचा जॉब मिळाला नाही तर या गोष्टीला फक्त तुम्ही जबाबदार असणार आहात समजलं. मला हया नोकरीची खुप गरज होती. तुम्ही वाट लावून टाकली. असं म्हणून मी रडू लागले.

 ‘स्वारी मॅडम, पण तुमचे हे सर्टीफिकेट आता स्वच्छ झाले आहे.’ आपल्या रुमालाने पूसत तो म्हणाला.

 ‘आणि हे बघा तुम्ही खरच श्रम घेण्यास तयार असाल तर तुम्हाला ही नोकरी नक्कीच मिळेल. चिंता करु नका. हा शब्द आहे माझा. तुमचे हे सर्टीफिकेट मळलेले असले तरी त्यावरचे मार्क्स त्याची गुणवत्ता सिद्ध करते. पॉझिटिव्ह थिंकने पुढे जा.’

काही वेळाने मला इंटरव्हू साठी आत बोलावण्यात आले. मोठया केबीनमध्ये तीन माणसे बसली होती. त्यापैकी एकाला मी पाहिले चेहरा ओळखीचा वाटत होता. पुन्हा हळूच कटाक्ष टाकला तर थोडया वेळापूर्वी माझे डॉक्युमेंट ज्याने खराब केले होते तोच माणूस होता. मला आता अगदीच ओशाळल्यासारखे झाले. पण धिटाईने विचारल्याप्रश्नांची अचूक उत्तरे मी देत होते. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्यावरुन माझी खात्री होत होती की माझी निवड पक्की आहे.

चार दिवसातच मला कॉल लेटर मिळाले. मी कामावर रुजू झाले. हळूहळू सरांशी माझी मैत्री झाली. त्यांच्यामुळेच मला नोकरी पक्की झाली असे मला सारखे वाटे. त्यांच्याबददल मला आदर वाटायचा. काही दिवसातच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते विवाहित होते आणि मला हे माहित होते. तरी त्यांचा सहवास मला आवडायचा. त्यांच्या बायकोची चौकशी केली की ते विषय टाळायचे झालच तर ती कशी वाईट हेच सांगायचे. ती आपल्याला सतत त्रास देते असे म्हणायची. तीचा बॉयफ्रेंड आहे म्हणून आपण तिला घटस्प्फोट देत आहे वैगेरे सांगायचे त्यांच्या त्या बोलण्याने मलाही त्यांच्या पत्नीचे वागणेच चुकीचे आहे असे वाटे. आता आमच्यात प्रेमाची विण चांगलीच घट्ट होत होती. बॉस वरुन श्रीकांत असे एकेरी नाव मी घेऊ लागले. दोघांनाही सहवासाची गरज होती. त्यामुळे लग्न करणं हा आमच्यापुढे बेस्ट ऑप्शन होता. मी त्याला सतत सुचवत होते की त्याने त्याच्या बायकोला सोडचिठ्रठी दयावी. त्यावर त्याने सांगितले की, त्याची बायको त्याला सोडून गेली व ती सध्या आपल्या मित्राबरोबर राहते. त्याच्या हया सगळया बोलण्यावर विश्वास ठेऊन मी लग्नास तयार झाले.

अखेर एक चांगला मुहूर्त बघून आम्ही लग्न केले. आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी पळवापळवी झाली. त्या भयानक प्रकारानंतर आम्ही तुमचा आधार घेतला. तुमच्या प्रेमामुळे जीवन सुखकर झाले. तुमच्याकडून जेव्हा आम्ही मडगांवला राहायला गेलो तेव्हा छकुलीचा जन्म होईपर्यत दिवस मजेत होते. मग हळूहळू श्रीकांतचा खरा चेहरा दिसू लागला. त्याची संशयीवृत्ती डोकं वर काढू लागली. आमच्या शेजारी एक कॉलेज तरुण राहत होता. आमच्याकडे तो यायचा सिद्धीबरोबर खेळायचा. सिद्धीलाही त्याचा लळा लागला होता. मी त्याला लहानभाऊ मानायचे. मला तो ताई म्हणायचा. पण श्रीकांत त्याच्यावर संशय घ्यायचा. मला ओरडायचा. त्यालाही अश्लिल शिव्या दयायचा. माझ्यावर घाणेरडे आरोप करायचा मग त्या बिचा‐याने आमच्याकडे येणेच बंद केले. तरीदेखील घरांत रोज भांडणे व्हायला लागली.

एक दिवस तर श्रीकांतने कहरचा केला, त्याच्या ऑफिसमधला एक क्लर्क मला रस्त्यात भेटला. ओळखीचा असल्याकारणाने साहजिकच पाच मिनीटं इकडचे तिकडचे बोलणे झाले. श्रीकांतने ते कुठूनतरी पाहिले त्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा हा पिसाळलेल्यासारखा वागू लागला. त्या वाघमोरे क्लर्कशी माझे संबध आहेत. तु वेशा आहेस आणि तुझे कैक पुरुष्याबरोबर संबध आहेत. मी ऑफिसला गेलो की तु या सगळया माणसांना बोलावून घेतेस. तु कुल्टा आहेस. तो न थांबता बोलत होता. मी मात्र सगळ सहन करत होते. दिवसेंदिवस त्याची संशयीवृत्ती वाढू लागली. वाण्याच्या दुकानात गेल्यावर सामान घेताना जे बोलणे व्हायचे तेवढया बोलण्यारुन देखील तो मला आरोप करायचा. एक दिवस तर वडीलांच्या वयाइतक्या दुकानदाराबरोबर माझे संबध आहेत असे म्हणून मला कमरपट्टयाने मारझोड केली. वडीलासमान माणसाशी आपल्या बायकोचे संबध आहेत असे म्हणताना याची जिभ कशी झडत नाही. असे मला वाटे.

आपल्या पहिल्या बायकोला कदाचित असेच वागवत होता म्हणून ती याला सोडून गेली असावी. आता तर मला तो मनोरुग्ण वाटू लागला. क्षणाच्या मोहामुळे मी फसले होते. की माझ्या नशिबातच दुर्दैव लिहीलं आहे. मला स्वत:चाही संताप आला. हे घर सोडून जाणे हाच एक मार्गमाझ्यासमोर होता. श्रीकांत ऑफिसला गेला हे पाहून मी माझी बॅग भरली. सिद्धीची तयारी केली आणि बाहेर पडणार इतक्यात श्रीकांत आला. सिद्धीला जवळ जवळ त्याने हिसकावून घेतले. आणि मला ढकलून बाहेर काढले. खुप वेळ मी बंद दरवाज्याबाहेर बसून त्याची विनंती केली. सिद्धीला दे म्हणून सांगितले तेव्हा तो बाहेर आला व मला लाथाबुक्कयाने मारायला लागला. तुझासारख्या रंडीबरोबर मी माझ्या मुलीला पाठवणार नाही असे म्हणाला. आता माझे अगदी अवसान गळाले होते. सिद्धी कावरी बावरी होऊन झाला प्रकार पहात होती. अखेरीस मी मन घट्ट केले. सिद्धीला तिथेच सोडून निघून आले. सिद्धीची खुपच आठवण येते. तिच्याशी बोलावे असे वाटते. सारखी तिची छबी डोळयासमोर येते. मायलेकीची अशी ताटातुट करून या माणसाला काही मिळणार नाही.

‘‘हे बघ ताई, तु अशी रडू नकोस. सगळ काही ठिक होईल. हे बघ आता बरीच रात्र झाली आहे. आपण झोपायला जाऊयात.’’ समजावणीच्या स्वरुपात मी तीला म्हटले.

‘हू.......’

ताई आमच्या घरी येऊन एक महिना झाला तरी तिच्या माहेरून कोणीही तिची विचारपूस केली नव्हती. अधूनमधून श्रीकांत मात्र वेगवेगळी माणसं पाठवून ताई कधी घराबाहेर पडली की कविताताईला धमकावत होता. आपणही आमची नजर चुकवून तिला मारण्याची धमकी देत होता. आमच्या घरी यायला मात्र घाबरायचा. आमच्या घराच्या आजूबाजूला फे‐या मारत राहायचा. त्याच्या अशा वागण्याला आम्ही देखील कंटाळलो होतो. पोलिसात तक्रार करायला ताई नकार देत असल्याने आम्ही तसेही करु शकत नव्हतो. माझ्या बाबांनी एकदा त्याला चांगल सुनावलं होते. ‘जोपर्यंत कविता आमच्या घरी आहे;तोपर्यंत कोणीही तिचे वाकडे करु शकत नाही. आणि तु जर का आमच्या घराच्या आजुबाजूला चोरासारखा भटकत राहिलास तर तुला मी पोलिसांच्या ताब्यात देईन.’ तेव्हा त्यांने गयावया करुन असं वागणार नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर आठ दिवस तो आला नव्हता. त्याची धमकावणी जवळपास बंद झाली. ताईही त्यामुळे निर्धास्त झाली. महाशिवरात्र असल्याकारणाने देवळात आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते. आम्ही सगळी मंडळी सकाळपासून देवळात हजेरी लावून होतो. दरवर्षी आम्ही महाप्रसाद करत होतो. आई व ताई घरी प्रसाद बनवत होत्या. साबुदाण्याची खिचडी, केळी व कोकम सरबताचा बेत होता. हे सगळे बनवून झाल्यावर ताई देवळाकडे येण्यास निघाली. नदीच्या उतारावर श्रीकांत व त्याची काही माणसे अगोदरच दबा धरुन बसली आहेत याची ताईला पुसटशी सुदधा कल्पना नव्हती. उतारावर येताच दोन माणसांनी तिच्या तोंडावर चादर टाकून तिला पकडले. श्रीकांतने तिला फरफटत ओढून झुडपात नेले चाकू दाखवून मारुन टाकण्याची धमकी दिली. पण ताईने गयावया करण्याचे नाटक केले. नंतर संधी मिळताच जमिनीवरून धूळ उचलून श्रीकांत व त्या दुस‐या माणसाच्या दिशेने भिरकावली. श्रीकांतच्या डोळयात माती गेल्याने तो डोळे चोळू लागला त्याचक्षणी ताई नदीच्या दिशेने पळाली व झुडूपात लपून बसली. काही वेळ ते लोक तिला शोधत राहिले पण ती त्यांना नाही सापडली. आपल्याला कोणीतरी पाहिलं तर या भितीने नंतर श्रीकांत व त्याचे साथिदार पळाले. त्यानंतर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ताई घरी पोहचली. आईला मिठी मारुन जोरजोरात रडू लागली. घडला प्रकार तिने आईला सांगितला. तिच्या हातपायाला काही प्रमाणात खरचटले होते. त्यातून रक्त वाहत होते. आइने तिला पाणी प्यायला दिले. मीही नंतर तिला खरचटलेल्या पायाला मलमपट्टी केली.

बाबा संध्याकाळी जेव्हा घरी आले तेव्हा हा प्रकार त्यांना समजला. त्यांना याचा प्रचंड राग आला. कविताताईला घेऊन त्यांनी सरळ पोलिसस्टेशन गाठले. रीतसर पोलिसांत तक्रार केली. जेव्हा ताई पोलिसस्टेशनमध्ये जाऊन आली तेव्हापासून ती प्रचंड तणावाखाली होती. आम्ही तिची खुप समजूत घातली. पण ती खुप घाबरली होती. त्या रात्री तीचा ताण कमी व्हावा म्हणून मी तीच्यासोबत झोपायला गेले. आमच्या कॉलेजमधल्या गंमती जंमती तिला सांगत होते. मग मात्र खरच ती गप्पात रंगली. तसेही ती आमच्याकडे राहायला आल्यापासून रोज रात्री तिच्या आणि माझ्या गप्पा रंगायच्या विषय कुठचा याला बंधन नसायचे. ती आपल्या कॉलेजमधल्या गोष्टी सांगायची. मुलांचा धुडगूस, कोप‐यावरच्या जाडया सुलभाची प्रेमकहाणी. चश्मेबहाद्‌दर प्रोफेसरांचा हरवलेला चश्मा. या सगळया गप्पाचे जणू फड रंगायचे. आपल्या मुलीचे वेगवेगळे फोटो दाखवून तो संपूर्ण प्रसंग सांगतांना खुप हसायची. कधी कधी हसताहसता छकुलीच्या आठवणीने रडायची.

त्या रात्री दोघीही अशाच गप्पा मारत गच्चीत बसलो होतो. बाहेर मंद वारा सुटला होता. दुपारी झालेला प्रकार ती विसरली असावी असं वाटत होते. निदान ती तसे भासवत होती. काळोखाच्या छायेतही ती मला अस्वस्थ जाणवत होती. बोलता बोलता मध्येच ती गप्प झाली.

तीच्याकडे पहात मी तिला म्हणाले, जर तुला बरं वाटत नसेल तर आम्ही झोपायला जाऊया का.

‘नाही गं बाई, तु सांग तुझा कॉलेजमधल्या गोष्टी, त्या ऐकल्या ना की, मला माझं कॉलेजलाईफ आठवत. अशा रुक्ष जीवनात त्या आठवणीच जगण्याची उभारी देतात. आणखी आहेच काय माझ्या जीवनात आठवण्यासारखे.’

आता मात्र मला राहवलं नाही. माझेही डोळे पाण्याने भरले. मी तिच्या डोक्याला हात लावला. तिचे अंग गरम लागले. अंगात ताप होता. तिच्या हाताला धरुन तिला मी अंथरुणावर आणून झोपवले आणि तिला एक क्रोसीन टॅबलेट दिली. तिच्या अंगावर चादर पांघरायला घालून दिली. आता मीही तिच्या बाजूलाच झोपले. काही वेळातच ती शांत झोपी गेली. मग मीही झोपले. मध्यरात्री पुन्हा एकदा मी उठले व तीला ताप आहे की नाही ते पाहिला. आता तिचा ताप कमी झाला होता. त्यानंतर मला चांगली झोप लागली. ज्यावेळी जाग आली तेव्हा सकाळचे सात वाजले होते. मी बाजूला पाहीलं तर ताई नव्हती. मला वाटलं की उठून खाली गेली असेल. पण ती कुठेच नव्हती. आईबाबांनापण तीने काही सांगितले नव्हते. आम्ही सगळीकडे तिची शोधाशोध केली पण ती कुठेही सापडली नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली. पुन्हा मी बेडवर जाऊन पाहिलं तर बेडच्याखाली मला एक पत्र आढळलं. मी ती चिठठी उघडून पाहिली. माझ्यासाठी लिहीलेले ते पत्र होते. भरल्या डोळयांनी माझी अक्षरावरुन नजर फिरु लागली.

माझ्या मोगाच्या मंजिरीस,

    आमच्या गोव्यांत खुप जवळच्या प्रेमाच्या माणसाला लिहीताना मोगाच्या असं म्हणतात. आयुष्यात चांगलं असं काय मिळालं असेल तर ते म्हणजे तुमच्यासारखी माझी आपलेपणाने काळजी घेणारी मायेची माणसे. मला स्वत:ची नाती असून नसल्यासारखी आहेत. आजवर तुम्ही मला आधार दिलात त्याची किती किंमत आहे हे मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. तुम्हा सगळयामुळे मी पुन्हा एकदा संकटांना सामोरी जात होते. पण माझ्या नशिबात हे सुखसुद्धा नाही आहे. माझ्यासाठी तु किती करणार आणि कुठवर ? माझ्यामुळे उलट तुम्हाला सतत त्रासच होत आला. मला माफ कर. आता मी तुम्हाला त्रास देणार नाही. कारण जोपर्यंत मी इथे थांबेन तोपर्यंत श्रीकांत असच वागत राहील. आणी याचा तुम्हाला त्रास मला होऊ दयायचा नाही आहे.

तु माझी रक्ताच्या नात्यागोत्याची नाहीस पण त्याहून जास्त जवळची धाकटी बहीण आहेस पण सदैव थोरली होऊन मला धीर दिलास. भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहेस हे तु गंमतीने बोलायची खरे पण प्रत्यक्षात तसेच वागायचीस. तुझ प्रेम, आठवण हिच माझी संपत्ती. मला आधार तर तुम्ही दिलाच पण केव्हाच कुठल्याही प्रकारचा संशय घेतला नाही. यातच मला सगळं काही मिळालं. काल जो प्रकार श्रीकांतने घडवून आणला तो फार भयंकर होता. त्यागोष्टीमुळे बाबांना टेन्शन आले. तुम्ही मला श्रीकांतपासून वाचविण्यासाठी जो प्रयत्न करता त्याला तोड नाही. पण कधी ना कधी श्रीकांत मला मारणार. आणि याचा तुम्हाला त्रास सहन करावा लागणार. त्याने मला सगळया दृष्टीने नालायकच ठरविले आहे. त्याच्या हातून मरण येण्यापेक्ष्या मी अगोदरच जीवनप्रवास संपवणार आहे. मला माफ करा. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करु नका. मंजीरी, मला माझ्या मुलीपासून श्रीकांतने तोडलं, तो मला तिला कधीच भेटू देणार नाही. आई आपल्या लेकरावाचून नाही जगू शकत. असं रोज मरत जगण्यापेक्षा या तनामनाला कायमची विश्रांती देऊ इश्चिते.

                                                                    तुझी क्षमस्व,

                                                                     कविताताई

पत्र वाचताना मला रडू आवरत नव्हत. ताई का तु आम्हाला सोडून गेलीस. मला तुला खंबीरपणे उभं राहिलेलं पाहायचं आहे. तु कितीही दूर गेलीस तरी तुला मी शोधेन. माझं मन सांगते की तु जिथं कुठे असशील तिथे सुखांतच असशील. तु मला पुन्हा नक्कीच भेटशील.

जिथं जिथं शोधणं शक्य होते तिथे आम्ही तिला शोधले. दुर्दैवाने ती आम्हाला कुठेच सापडली नाही. पोलिसात ती हरवल्याची तक्रार केली, वर्तमानपत्रात छापलं पण ती अखेर नापताच राहिली. मला सतत वाटायचं की ती नक्कीच सापडेल. पण तसं काहीच झालं नाही.

आणि अचानक चार वर्षानंतर आज ती मला दिसली. की, तो आभास होता. समोरच्या रस्त्यावरुन गेलेल्या त्या पाठमो‐या आकृतिच्या दिशेने मी बराच वेळ खिन्न मनाने पाहत राहिले.

©️ Shilpa Desai- Naik



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama