ती रात्र अमावस्येची
ती रात्र अमावस्येची


सुरेश सासुरवाडी हून बैलजोडी घेऊन पायी निघाला होता. त्याचे गाव फार काही दूर नव्हते. फक्त पाच किलोमीटर जायचे होते. शेतकाम करण्यासाठी बैल पाहिजे होते म्हणून तो आठ दिवसापासून सासुर वाडीला आला होता. सासऱ्याचे संपूर्ण काम करून दिले. त्या दिवशीही दिवसभर सासऱ्याच्या शेतातले काम पूर्ण केले अन् बैल जोडी घेऊन तो परत निघाला होता. जास्तीत जास्त अर्धा पाऊण तासाचा रस्ता होता म्हणून तो संध्याकाळचे जेवण करून निघाला होता.
सासुरवाडीहून निघून एक तास झाला तरी अजून त्याचे गाव आले नव्हते. 'आज असे कसे झाले?' तो स्वतःच्याच मनाला विचारु लागला. तेवढ्यात अचानक एक गुबगुबीत ससा समोर दिसला. सुरेश थोडा थांबला तसा ससाही थांबला. त्याच्या कडे ससा लुकूलुकू डोळ्याने पाहू लागला. बैल झाडाला बांधून तो त्या सशाला धरायला धावला तसा ससा पुढे पळायला लागला. ससा पुढे तो मागे जणू शर्यत लागली.
साधारण अर्धा तास त्यांची शर्यत सुरू होती. बैल जोडी झाडाला बांधलेली आहे हे ही तो विसरून गेला होता. एका झाडाखाली जाऊन ससा अचानक गायब झाला. सुरेश गोंधळला. इकडे तिकडे पाहू लागला. त्याला बैलाची आठवण आली तो घाबरून तिथून पळायला लागला.
अमावस्येचा काळाकुट्ट अंधार, पुढे काहीच दिसत नव्हते. शेतात ढेकळं. त्या मुळे त्याला पळता येत नव्हते. पळतांना ढेकळात पडत होता. तो पडला, उठून पुन्हा पळू लागणार तेवढ्यात समोर एक काळीकभिन्न आकृती उभी दिसली. उंचच उंच आकृती पाहून सुरेश पुरता घाबरला होता. उठून मागे पळायला लागला. मागे एक विचित्र प्राणी त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात होता. प्राणी फारच विचित्र होता. हत्तीसारखा धिप्पाड, चेहरा सिंहा सारखा, दात सुळे, डोळे आगीचे लोळ ओकताहेत. त्याने मार्ग बदलून पाहिला तर तिकडे वाघा सारखे तोंड वासून एक अजस्त्र रानटी कुत्रा उभा. दुसऱ्या बाजूला वळून बघितले, तिकडे एक भयानक दहा तोंडाचा नाग फणा काढून जिभल्या चाटत उभा. आता मात्र सुरेशला थंडीचे दिवस असूनही दरदरून घाम फुटला. तो मटकन खाली बसला, डोळे मिटून देवाचा धावा करू लागला.
बराच वेळ सुरेश डोळे मिटून बसून होता, कुणीच काही हालचाल करत नाही असे पाहून त्याने डोळे उघडून बघितले. समोर फक्त ससा, टुकूमुकू नजरेनं त्याच्या कडे पहात बसलेला दिसला. नजरा नजर झाली तेव्हा ससा ओळखीचं हसल्याचा त्याला भास झाला. ससा हळूहळू मोठा होत गेला. एवढा मोठा झाला की, त्याच्या उंची कडे सुरेशची नजर पुरत नव्हती. हे सारं काय चालू आहे हे त्याला आकलन होईना. भीतीने त्याची दातखिळी बसली. तो तसाच बसून होता. समोर सशाचे लहान मोठे होणे सुरूच होते.
एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो उठला. तू उठून उभा राहिला तसे अगोदरचे सारेच प्राणी त्याला घेरून उभे असलेले दिसले.पुन्हा खाली बसला तर फक्त ससा. विचार करून करून त्याचे डोके फुटायची वेळ आली. तो जिवाच्या आकांताने ओरडला.
सुरेशच्या ओरडण्याने सासू सासरे, मेहुणे सारेच घाबरून उठले. आजूबाजूचे लोकही जमा झाले. सर्वजण 'काय झाले? काय झाले?' विचारू लागले. तो मात्र निर्विकार चेहऱ्याने या साऱ्यांकडे बघत होता. घामाने ओला झाला होता. हे सारे स्वप्न होते तर!
काम संपल्यावर सुरेश बैल घेऊन घरी जाणार होता. परंतु अमावस्या असल्यामुळे त्याच्या सासूने त्याला निघू दिले नव्हते. सकाळी लवकर उठून जावे, असे ठरवून तो तिथेच झोपला होता. म्हणतात ना! 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' या उक्ती प्रमाणे तो स्वप्नात ओरडला होता. आपण स्वप्नात घाबरलो आणि ओरडलो हे समजल्याने तो ओशाळला, खजील झाला.