Rahul Maghade

Drama Romance Classics

4.5  

Rahul Maghade

Drama Romance Classics

तिच्यासोबतचे क्षण

तिच्यासोबतचे क्षण

4 mins
658


साधारण तीन वर्षांचं नातं होतं त्यांचं. तो फारच पजेसिव्ह, तिला बिनधास्त जगण्याची सवय, शांत. आई वडील दोघांनी ही कधी तिला बंधनात अडकवल नाही, काही हवं नको असेल तर लगेच हातामध्ये हजर. ती कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची भेट झाली होती, दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी तो गेटवर हजर. दोघेही लांब कुठेतरी फिरून यायचे,एकत्र मुव्ही पाहणं, फिरणं, छान हॉटेल मध्ये जेवण करणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, दिवसभर चॅटिंग करण हे जणू काय ह्यांचा जीवनक्रमच, ही त्याला प्रेमाने पिलुडी वगैरे म्हणायची.


कधीकाळी फेसबुक, व्हाट्सअप्पवर बोलणारा तो, रिलेशनशिपमध्ये पडल्यावर हाईकचा ब्रँड अम्बेसेडर झाला म्हणायला काही हरकत नाही. तर असं होतं ह्यांचं प्रेम पण प्रेमात जोपर्यंत कोणतं वाईट वळण येत नाही तोपर्यंत ते प्रेम अमर नाही होत किंवा श्रेष्ठ नाही होत. रिलेशनशिपला आता बरीच वर्षं लोटली होते, ती सतत त्याच्यामागे लागायची की, आपण आपल्या नात्याबद्दल घरी सांगू या आणि हा काहीही कारण देऊन वेळ मारून न्यायचा, लग्न ह्यालाही तिच्याशीच करायचं होतं पण ती वेळ योग्य नाही किंवा अजून वेळ आलेली नाही, असं त्याला नेहमी वाटायचं. शेवटी जे नाही झालं पाहिजे तेच झालं.


तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं. मुलगा वेल एज्युकेटेड, दिसायलादेखील सुंदर. ह्या दोघांनी एकमेकांच्या घरी प्रेमाबद्दल सांगून पाहिलं, खूप प्रयत्न केले पण घरचे तयार होत नव्हते. घरात रोज त्यावरून किरकिर, अस्वस्थता असायची. ह्यानेसुद्धा घरी खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण घरचे ऐकायच्या मनःस्थितीतच नव्हते, शेवटी फॅमिलीसाठी स्वतःच्या सुखाची राखरांगोळी केली. (आपल्या गोष्टीतला मुलगा स्वभावाने खूप हळवा आणि फॅमिलीला जास्त महत्त्व देणारा होता) शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण ती नात्यातून बाहेर पडायला तयार नव्हती. दररोज त्याला मेसेजेस करायची. कॉल करुन रडायची. तो त्याच्या परीने समजवायचा. हळूहळू त्याने रिप्लाय देणं कमी केलं.


त्या दिवशी ती कॉलवर जास्तच रडू लागल्यानंतर तो तिला भेटायला आला. दोघेही एका शांत ठिकाणी गेले. त्याने तिला जवळ घेतलं. डोक्यावरुन हात फिरवला आणि म्हणाला,"आपले आई वडील आयुष्यभर समाज, नातेवाईक यांना जोडून राहत आलेत. त्यात जी काही थोडी इज्जत कमावली आहे हिच त्यांच्या आयुष्याची कमाई. आपल्यासारखा विचार ते नाही करू शकत. विचारांमध्ये लवचिकता आणण्याचं त्यांचं वय गेलं आता. लहान मुलांसारखे हट्टी झालेत ते, म्हातारपणाकडे झुकलेत. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही तर मोठया मनाने त्याग करणंही असू शकतं गं. तरीही तुला लग्न करायचंच असेल तर करूयात.

तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. ती दोन पावले पुढे आली. त्याच्या कमरेभोवती हात टाकले. छातीवर डोकं टेकवलं. त्याला गच्च मिठी मारली... शेवटची..."


काही वर्षांनी 


कित्येक दिवसांनी तिचा कॉल आला. फोनवर बोलता बोलता जुन्या आठवणी ताज्या झाल्या, भेटायची इच्छा तर दोघांनाही झाली पण बोलणार कोण? कारण ती आता वेगळ्या नात्यांमध्ये अडकलेली होती. अखेर तिनेच पुढाकार घेत भेटायचं ठरवलं, क्षणाचाही विलंब न करता त्याने होकार दर्शवला. लग्नानंतर जवळजवळ 2 वर्षांनी ते दोघे एकमेकांच्या समोरासमोर येणार होते, भेटायचा दिवसही ठरला. सर्वकाही अगदी त्यांच्या मनासारखं, हल्ली त्याच्या घरी लग्नासाठी स्थळे पाहणं चाललेलं, तर तिचं 3 वर्षापूर्वीच लग्न झालेलं.

शेवटी तो दिवस उजाडला, दोन वर्षापासूनचा अपूर्ण संवाद संपेल अन् उरेल आता...


तिचं सकाळपर्यंत असं काहीच कन्फर्म नव्हतं, ह्याच्या मनात चलबिचल होत होती, बिचारा खूप अस्वस्थ, बेचैन झाला होता, मनात शंका उद्याची भेट कॅन्सल झाली तर... खूप साऱ्या जुन्या आठवणी, जुने मसेजेस, दोन वर्षांपासूनच राहिलेलं त्यांचं अपूर्ण बोलणं पूर्ण कस होणार... रात्रीच त्याने मुद्दामून मोबाईलवर चार अलार्म लावले. तसं त्याला लगेच जाग कधीच येत नाही. आज मात्र पहिल्याच आलार्मला सकाळी सहा वाजताच उठला आणि बरोबरच आहे ना, आज इतक्या दिवसानंतर भेटणार जे होते ते एकमेकांना.


सुरुवातीला दोघे अगदी अनोळखी असल्यासारखे वागू लागले. एकमेकांकडे नजर चोरून पाहत होते. त्याने अवघडल्यासारखं हाय केलं आणि तिनेही तसाच प्रतिसाद दिला. उशिरा का होईना त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली. सध्या काय चालू आहे इथपासून ते फ्युचर प्लान्स काय आहेत इथपर्यंत बऱ्याच विषयांवर दोघे बोलले. पर्सनल आयुष्यावर फार कमी आणि फॅमिलीवर जास्त गप्पा रंगल्या. हळूहळू दोघांमधील अवघडलेपण कमी होत गेलं.


रंगत चाललेल्या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की ती बदललीये, अगोदरसारखी मस्तीखोर, जास्त बडबड करणारी नव्हती ती. दोघांनादेखील जबाबदारीची जाणीव झालीये. पूर्वीच्या आठवणी, सोबत घालवलेला वेळ, एकमेकांबद्दल दोघेही अगदीच मॅच्युअर्डपणे बोलले. मन रिकामं झालं. हलकं हलकं वाटू लागलं.


त्याला तिला मिठीत घ्यावंसं वाटलं पण त्याने मुद्दामूनच टाळलं. कधीकाळी त्याची ती प्रेयसी आज दुसऱ्याची बायको झालेली होती. त्यामध्येही तो त्या मुलीला शोधत होता जी त्याच्यावर जीवपाड प्रेम करायची, तिच्यासाठी पहिल्यावहिल्या प्रायोरिटीज तोच असायचा. शेवटी हेच की, त्यांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, पण लग्न होऊ शकलं नाही, ह्याचा अर्थ हा नाही की प्रेम कुठे कमी पडलं, तर मुळीच नाही, कदाचित ती वेळ त्यांची नव्हती पण प्रेम... हा प्रेम नक्कीच त्या वेळेला सोबत घेऊन आजपर्यंत ते जपलं जात होतं दोघांकडून...


त्याला त्याच्या आयुष्यात तिच्याकडून कोणतीच अपेक्षा राहणार नाही, किंवा त्या दोघांना असं कधीच वाटणार नाही (अरे हे राहिलं, अरे ते राहिलं) कारण त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त आणि खूप गोड अशी एकमेकांची साथ लाभली होती, जी एका ठराविक वेळेपर्यंत गरज असते, प्रत्येकाच्या आयुष्यात...


Rate this content
Log in