तिची गोष्ट भाग -1-जन्म बाईचा
तिची गोष्ट भाग -1-जन्म बाईचा
त्या नवजात शिशूने पहिल्यांदा आपल्या किलकिल्या डोळ्यांनी जे पाहिले ते काही शुभ्रसफेत म्हणजेच प्रेमळ नर्समावशीची टोपी!...आणि पहिल्यांदा आपल्या नाजूक कानांनी ऐकला तो होता डॉक्टर मॅडमचा मंजुळ आवाज.."अभिनंदन! मुलगी झाली!"...पण त्या आकारांचा, रंगांचा आणि स्वरांचा काहीच अर्थबोध त्या सानुल्या जीवाला होणे शक्यच नव्हते!... अहो, आपल्या मातेच्या गर्भाशयातील उबदार आणि सुरक्षित वातावरणात वाढलेल्या त्या गोजिरवाण्या बाळीसाठी या भौतिक जगात अचानकपणे अवतरल्या नंतरचा तो पहिलावहिलाच अनुभव नाही का! तो अनुभव इतका भीतीदायक होता, की तिने आपले इवलेसे अंग आकसून घेतले आणि जीवाच्या आकांताने "ट्यॅहा, ट्यॅहा" करत आपल्या अधांतरी अवस्थेतील अस्तित्वाचा जणू निषेधच केला! तिला कळलं असेल का हो,..की या विश्वात तिचे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तिला वारंवार असे लहानमोठे टाहो फोडायला लागणार आहेत!
This world is a big, booming n buzzing confusion for the newborn baby! या विश्वाच्या कोलाहलात तो कोवळा जीव सुरुवातीला भेदरलेल्या, भांबावलेल्या अवस्थेत शोधतो तो आपल्या मातेच्या आश्वासक स्पर्शाला...आणि ती माता, जिने आपल्या या अंशाला नऊ महिने उदरात वाढविलेले असते, ती त्या क्षणी झालेली असते गलितगात्र! तरीही तिच्या थकल्याभागल्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटते आणि ती जेव्हा त्या बालिकेला डोळे भरून बघते तेव्हा तिच्या अंत:करणात आपसूकच आईपण पाझरू लागते... मंडळी, आता पुढे काय होणार हे जाणून घ्यायचंय? तर मग रहा आमच्या संपर्कात आणि करा सबस्क्राईब रेनबो मास्क चॅनलला! लाईक आणि शेयर तर तुम्ही करालच!..तर पुन्हा भेटूया लवकरच! धन्यवाद
