तिची गोष्ट - भाग 9 (नामकरण)
तिची गोष्ट - भाग 9 (नामकरण)
सानुलीच्या मामाचं घर काही वेगळंच दिसतंय. अहो, दिसणारच की! काल रात्री उशिरापर्यंत जागून मामाने आणि त्याच्या मित्रांनी दिवाणखान्यात किती सुंदर सजावट केलीय बघा. आणि हे काय झाकून ठेवलंय समोरच्या भिंतीवर?... अरेच्चा, वर लिहिलंय की!..."माझं नाव"... बरोब्बर! त्याखालीच तर लपलेलं आहे सानुलीचं नाव!..आणि ते शोधलंय जागृतीने..हो, हो..तीच ती छोट्या अर्णवची आई. तिने सुचवलेल्या काही नावांमधून सानुलीच्या आईबाबांना आणि घरच्यांना विशेष आवडलेलं हे नाव मोठ्या अक्षरांत सजवून भिंतीवर लावलेलं आहे.... आणि ते काय आहे ते आपल्याला लवकरच कळणार आहे, बरं का! तोपर्यंत थोडा वेळ धीर धरुया हं!
इकडे बघा, सानुलीच्या आईची कशी लगबग सुरू आहे. सुंदर साडी, छानशी हेयर स्टाईल आणि मोजकेच दागिने घालून स्वतःच तयार झालीय. मग तिने आईकडून सानुलीला घेतलं आणि तिला पटकन तयारी करण्यासाठी मोकळं केलं. कारण सानुली तर सर्वात आधी तयार झालीय नवे कपडे घालून.
आता राजामामा तिला घरभर फिरवत सगळी सजावट दाखवत आहे. तो तिला सांगतोय, "तुझ्यासाठी पाळणा बघ किती सुरेख सजवलाय ! मज्जा आहे बुवा आमच्या चिमूची!!"
आणि ती कुतुहलाने बघतेय या सगळ्याकडे!..तिला जणू कळलंय की आज काहीतरी खास आहे.. भिंतीवर हलणाऱ्या फुग्यांकडे आणि आपल्या इवल्याशा मनगटांवर चमकणाऱ्या चांदीच्या कड्यांकडे ती डोळे विस्फारून बघताना दिसतेय. आजीने हळूच तिच्या गालावर काळजाचं तीट लावत म्हटलं, "आज रात्री दृष्ट काढावी लागणार आहे गं बाई, न विसरता!" त्यावर सानुलीची आई काहीही बोलत नाहीय, कारण आता तिच्याकडे वेळच नाहीय!
हळूहळू बाहेर पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. जो तो आल्याआल्या "बाळ कुठे आहे ?" अशा शोधक नजरेने पाहताना दिसतोय. आणि आजची उत्सवमूर्ती तर आहे आतल्या खोलीत आपल्या कोकणातल्या आजीआजोबांजवळ! हो, केव्हाचेच आलेयत बरं का ते सानुलीच्या बाबांबरोबर! तिला डोळे भरुन पाहताना ती आजीआजोबांची जोडी खूप आनंदी दिसतेय.
पण काही वेळाने आजीच्या मांडीवर तिची चुळबूळ सुरू झालीय हे बाबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला उचलून घेतलं मात्र...इतकी गोड हसली ना ती! अहो, बाबांनी आज पहिल्यांदाच तिला उचलून घेतलंय नाए आणि त्यांच्या हातात तिला काय वाटतंय ते काय सांगायला पाहिजे!
इकडे दिवाणखान्यात बारशाला लागणाऱ्या साहित्याची मांडामांड करण्याची कामगिरी नात्यातल्या अनुभवी स्त्रियांनी घेतलीय. आधी पाळण्याभोवती सुबक रांगोळी घालून, मधोमध स्वस्तिक रेखाटून मग चार पायांजवळ पानसुपारीचे विडे ठेवण्यात आलेयत. आणि सानुलीच्या आईला बसण्यासाठी पाट मांडून तिच्यासमोर एका परातीत ओटीचे साहित्य ठेवण्यात आलेय. आधी माहेरची ओटी भरायची की सासरची ओटी यावर महिलांची हलक्या आवाजात चर्चा झाली. दोन्ही कडच्या मावशा-माम्यांनी आपले मत हिरीरीने मांडले आणि शेवटी माहेरची सरशी झालेली दिसतेय. तेवढीच गंमत!
अगदी वेळेवर बाळाच्या नवनिर्वाचित आत्याबाईंनी सहकुटुंब प्रवेश केला आणि छोट्या अर्णवची तर इतकी सगळी अनोळखी माणसं बघून भंबेरीच उडालीय! तो आपल्या आईचा पदर पकडून तुरुतुरु आत गेला आणि जेव्हा सानुलीच्या बाबांनी तिला त्याच्या समोर धरलं, तेव्हा खरी मजा आली! त्याला वाटलं की ही छोटीशी बाहुलीच आहे डोळ्यांची उघडझाप करणारी आणि सानुलीने तर आजपर्यंत मोठीच माणसं पाहिली होती. त्यामुळे दोघेही अचंबित होऊन एकमेकांना बघत राहिले.
तेवढ्यात इकडचे आजोबा आत आले आणि म्हणाले, "चला, चला भटजींनी सांगितलेल्या मुहूर्तावर बाळाला पाळण्यात घालायचंय ना..." त्याबरोबर पुन्हा सगळीकडे लगबग सुरू झाली आणि सानुलीचे आईबाबा बाहेर आले . आता सानुलीची रवानगी झाली होती जागृती आत्याकडे. ती पाळण्याच्या मागे तिला घेऊन सज्ज झाली. तेव्हा मात्र अर्णवला त्याच्या बाबांनी उचलून घेतलं होतं. कारण ताम्हणात निरांजन होतं, शिवाय ओटीचे साहित्य, दोन्ही घरचे बाळंतविडे आणि भेटवस्तू वगैरे तिथे मांडलेल्या होत्या.
मग सानुलीला पाळण्याच्या खालून आणि वरुन एकमेकींकडे देण्याचा सोहळा सुरू झाला, तेव्हा कोणीतरी म्हणालं, "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या"... त्याबरोबर जागृतीने सांगितलं की आपण मुलीला पाळण्यात घालताना गोविंद, गोपाळ म्हणण्यापेक्षा "लक्ष्मी घ्या, सरस्वती घ्या" असं म्हटलं पाहिजे. मग काय, लगेच सगळ्यांनी तसं म्हणायला सुरुवात केली. त्यावेळी सानुलीही आकाशपाळण्यात असल्यासारखी तो सोहळा एंजॉय करत होती. शेवटी जागृतीने तिला पाळण्यात ठेवलं आणि वाकून "फुर्र्ऽऽऽ करत तिच्या कानात तिचं नाव सांगितलं. त्याचवेळी भिंतीवर लावलेल्या नावाच्या वरचं आवरण उघडलं आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून तिच्या नावाला उत्स्फूर्त दाद दिली. आजपासून सानुलीचं नाव होतं, *"नक्षत्रा"*
