तिची गोष्ट - भाग 8 (कानटोचणी)
तिची गोष्ट - भाग 8 (कानटोचणी)
बघता सानुली अडिच महिन्यांची होत आली. आणि हो.. तिच्या बाबांचे हात सुद्धा आता बरे झाले होते.
त्यामुळे लवकरच घरातल्या घरातच तिचा छानसा नामकरण विधी करण्याचा निर्णय एकमताने संमत करण्यात आला. आणि मग सुरू झाली बारशाची तयारी!
"आधी कोणाकोणाला आमंत्रण द्यायचंय त्याची यादी करा बघू! म्हणजे मग आम्हाला इतर गोष्टी ठरवता येतील" आजीने आजोबांना सल्ला दिला.
मग दोन्ही घरचे अगदी जवळचे नातेवाईक आणि काही मोजकी मित्रमंडळी मिळून पन्नास एक जणांची नावं काढण्यात आली. सध्याच्या काळात अशा छोट्या कार्यक्रमांची प्रत्यक्ष भेटून आमंत्रणं करणं अवघडच! आणि आता कोणाला तसं अपेक्षितही नसतं. त्यामुळे इकडच्या नातेवाईकांना फोन करण्याची जबाबदारी आजीआजोबांनी घेतली. आणि मित्रमंडळींना मोबाईलवर स्वतः बनवलेलं invitation card पाठवण्याची कामगिरी राजामामाने आनंदाने घेतली.
त्या रात्री जेवताना राजाने हळूच सुरुचीला विचारलं.
"ताई, माझी ना.. एक मैत्रिण आहे..ती सध्या चाईल्ड सायकॉलॉजीचं शिक्षण घेतेय. तिला बोलवूया का बारशाला?"
"त्यात काय एवढं विचारायला हवंय राजस...बोलव की तिला!..पण काय रे, ही कुठली नवीन मैत्रिण तुझी?" ताईने विचारलं तशी त्याची कळी खुलली.
"अगं ही शाल्मली माझ्या ट्रेकवाल्या ग्रुपमध्ये जॉईन झाली आहे... अलिकडेच! ... " तो म्हणाला.
"अरे व्वा..छान.." ताईने म्हटलं. आणि बाबांना गालातल्या गालात हसताना पाहिलं, तशा तिच्या भुवया उंचावल्या. मग बाबाच मिश्कीलपणे म्हणाले,
" फक्त हौस म्हणून ट्रेक करता करता अभ्यासाचा ट्रॅक सुटणार नाही एवढं बघा, म्हणजे झालं!"
त्यावेळी आजीने सानुलीला घेतलं होतं. आणि तिला खांद्याजवळ उभं धरुन ती फिरत होती. कारण सगळे जेवण्याआधी तिने स्वतः जेवून घ्यायचं असा नियमच सानुलीच्या आगमनानंतर घरात करण्यात आला होता. ती उत्साहाने म्हणाली,
"राजा, तुला कोणी आवडत असेल तर आम्हाला मोकळेपणाने सांग बरं का... ताईने बघ कसा तिच्या पसंतीचा जोडीदार शोधलाय, तसं तुलाही..."
राजामामाने हे ऐकून नुसतेच खांदे उडवले. त्याला समजत नव्हतं विषय नेमका कुठून कुठे चाललाय ते.
मग आजी पुन्हा सानुलीला थोपटत फेऱ्या मारायला लागली आणि तिला मस्तपैकी ढेकर आला. तेव्हा आजी हसत म्हणाली, "बघ राजा, तुझ्या भाचीने सुद्धा ढेकर देऊन दुजोरा दिलाय हं"
त्यावर मात्र मामा डोक्याला हात लावत म्हणाला, "अरे यार! तुम्ही पण ना लगेच आमची जोडी जुळवायला लागलात! जाऊदे, मी नाही बोलवत शाल्मलीला!"
सुरुचीने वाटीतली खीर संपवता संपवता म्हटलं,
"अरे इतकं काय मनाला लावून घ्यायचं... आईबाबांना काळजी वाटते म्हणून त्यांनी आपलं मत मांडलं."
मग तोही खिरीचा आस्वाद घेत म्हणाला,
"मला वाटलं, तुला चिमूच्या उत्तम मानसिक वाढीसाठी शाल्मलीकडून काही शास्त्रीय माहिती घेता येईल..म्हणून मी म्हटलं, तिला बारशाला बोलवून तुझी ओळख करुन देईन .."
लगेच वातावरण हलकं करण्यासाठी सुरुचीने पुन्हा बारशाची तयारी या विषयावर चर्चा सुरू केली. तेव्हा सानुलीच्या कानांबद्दल काहीतरी बोलणं झालं. त्यावर पुन्हा राजामामा वैतागून म्हणाला, "बारशाला कान टोचलेच पाहिजेत का तिचे? किती नाजूक आहेत तिचे कान!"
आता मात्र आजीचा स्वर थोडा चढला. ती म्हणाली, "तुला काय वाटतं, मुलींचे कान काय फक्त दागिने घालून मिरवण्यासाठी टोचायचे असतात! असं असतं तर मग तेव्हा तुझे कान आम्ही कशाला टोचले असते!.."
राजामामा म्हणू लागला की त्याला ती कल्पना सहनच होत नाहीय! आणि काय फरक पडणार आहे, दोन वर्षं नाही टोचले तिचे कान तर!
मग ताईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. "अरे, मी थोडा रिसर्च केलाय याबाबत. तेव्हा कळलं की कानाच्या पाळीवर मध्यभागी टोचल्यामुळे ऍक्युप्रेशरचे काही कायमस्वरूपी फायदे होतात.."
तेव्हा तो तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिला. ती पुढे म्हणाली, "आणि समजा, या गोष्टींवर विश्वास नसेल बसत...तरी केव्हा ना केव्हा तिचे कान टोचायला तर लागणारच ना! मग ती जेवढी मोठी होईल तेवढं तिला कळायला लागल्यामुळे जास्त त्रास होणार! त्यापेक्षा आता एकदाच काय ते सहन करुदे..असं मी आणि प्रतीकने ठरवलंय.."
भाऊजींचं मत ऐकून राजाच्या मनातल्या शंका दूर झाल्या आणि तो हसत म्हणाला, "जिजाजीने बोला ना, तो फिर आपुनको कुछ प्रॉब्लेमच नही!..आणि त्यांची मुलगी एवढं तर सहन करुच शकते!"
त्यावर सगळेजण मनापासून हसले.
आणि हे सगळं जिच्याबद्दल सुरू होतं त्या सानुलीला त्यावेळी आजीच्या खांद्यावरून मागच्या भिंतीवर लावलेलं काहीतरी चमकताना दिसलं. तिने भिरभिरत्या नजरेने त्या गोष्टीकडे पाहिलं. मोठ्या फ्रेमच्या काचेमागे
दिसणारी ती गंमत पाहून तिचे डोळे विस्फारले. ही काय बरं जादू असावी? तिने नजर स्थिर करत पाहिलं तर काय!
तिच्या ओळखीची घरातली माणसं तिथे छान हसत एका ओळीत उभी असलेली तिला दिसत होती. अरे...यात तर आपल्या आईबरोबर बाबाही दिसतायत की मधोमध! मग तिने निरखून पाहिलं तर बाबांच्या बाजूला आणखी कोणीतरी आजीआजोबा दिसत होते. आणि त्यांना तर तिने कधीच पाहिलं नव्हतं!
दुसऱ्याच दिवशी दुपारी सोनारकाका आपली पेटी घेऊन घरी आले! मग सुरुचीने सानुलीच्या कानांच्या पाळीवर मधोमध पेनाने टिंब काढला. आणि सानुली झोपेत असतानाच एक कान टोचला. तेव्हा ती बिचारी किंचाळत उठली. मग तिला शांत करुन दुसराही कान टोचला, तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यातही पाणी आलं. पण जेव्हा सानुलीच्या नाजूक कानातले इवलेसे खडे छान चमकताना दिसले तेव्हा तिच्या डोळ्यातही चमक आली. आणि सानुलीचे कान टोचण्याचा कार्यक्रम एकदाचा पार पडला!
