STORYMIRROR

Chhayaa Subhash

Inspirational

3  

Chhayaa Subhash

Inspirational

तिची गोष्ट भाग 3 सटवाई

तिची गोष्ट भाग 3 सटवाई

3 mins
159

 आज पाचव्या दिवशी नर्सिंग होम मधून सानुली आपल्या घरी जाणार होती. अर्थात याची तिला कल्पना नसली, तरी सकाळपासून अवतीभवती सुरू असलेल्या लगबगीमुळे तिला आज काहीतरी वेगळं घडणार आहे असं वाटतं होतं. रात्रीची ड्युटी संपवून घरी निघालेल्या एका 'सिस्टर'ने ..हो ..दोन दिवसांत हा शब्द अनेकदा ऐकून तिच्या कानांना गोड वाटायला लागला होता. तिने सानुलीच्या आईला शुभेच्छा दिल्या..कालपासूनच ती सानुलीला मायेने समजावत होती की घरी गेल्यावर आईला त्रास द्यायचा नाही, बरं का?... आता 'त्रास' ही काहीतरी दुसऱ्याला द्यायची गोष्ट असते, हे तर तिला समजलं. मात्र त्रास देणं योग्य की अयोग्य हे तिच्या लक्षात यायला अजून वेळ होता . तर असो!

   त्यानंतर सानुलीच्या आजीने नर्सिंग होम मध्ये सेवा देणाऱ्या सगळ्यांच्या हातावर काहीतरी ठेवलं. तेव्हा तिने पाहिलं की ती गोष्ट खाताना त्यांचे चेहरे आनंदीत होत आहेत. आता आपल्यालाही तो सोनपिवळा पदार्थ भरविला जाईल या आशेने ती जिभल्या चाटू लागली. पण कसलं काय? तिच्या तोंडात फक्त दोन कडवट औषधाचे थेंब टाकून तिची बोळवण केली गेली. तिने तोंड वेडंवाकडं करुन ते थेंब गिळले आणि सध्यातरी आपल्याला रडल्यानंतर सुद्धा फक्त दूधच मिळणार आहे याची खूणगाठ मनाशी बांधली. 

    आणि अचानक एक माणूस घाईघाईत त्या खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप उत्सुकता दिसून येत होती. तिला नव्या दुपट्यात गुंडाळत असलेल्या आईने ज्या क्षणी मान वर करून त्या माणसाला पाहिलं, त्या क्षणी सानुलीला जाणवलं की ही आपल्या आईच्या दृष्टीने खूपच जवळची व्यक्ती असणार! त्यामुळे ती श्वास रोखून त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहात होती. तो माणूस त्यांच्यापाशी आला. दोघांच्याही नजरा एकाच वेळी तिच्याकडे वळल्या. त्या क्षणी तिला जी आत्मीयता त्या दोघांच्या डोळ्यांमध्ये दिसली, ती तिच्या अवघ्या अस्तित्वात आनंदलहरी पसरवत गेली. 

    पण हे काय? या माणसाचे दोन्ही हात असे सफेद जाळीदार कपड्याने का झाकलेले आहेत? त्या हातांकडे पाहून आपल्या आईच्या डोळ्यांतून इतकी आसवं का वाहत आहेत? आणि हा माणूस तिला काय समजावत आहे? तिला वाटलं की आपण हात पुढे करून आईचे लाड करावेत, जसे ती आपले करते. पण तिचे हात तर दुपट्यात गुंडाळलेले होते ना!

   शेवटी आईने आपले डोळे पुसले आणि सानुलीला वर उचलून त्या माणसाच्या जवळ नेलं. त्या क्षणी त्याचेही डोळे भरुन आलेले तिला दिसले. त्याने हळूवारपणे आपल्या गालांनी तिच्या कानाला हलकासा स्पर्श केला आणि तो काहीतरी पुटपुटला जे फक्त त्या तिघांना ऐकू आलं.

    पुढच्याच क्षणी चष्मावाले, शांत बसून राहणारे आजोबा त्या माणसाच्या पाठीवर हात ठेवून त्याला घेऊन बाहेर गेले. मग काहीशा भांबावलेल्या सानुलीला आईकडून घेत आजी म्हणाली, "तुझ्या बाबांचे हात बरे झाले ना, की तुला घेतील हो ते उचलून... शहाणं बाळ ते! " त्यावेळी आजीचेही डोळे ओले झालेले बघून तिला वाटलं, काहीतरी वेगळं घडलंय. तरीही सगळेच आपल्याला इतकं जपताहेत. तर आपणही आता शहाण्या बाळा सारखं वागायला हवं! 

   सकाळीच आजी म्हणाली होती की आज मामाच्या घरी जायचंय! म्हणे, बाळाच्या जन्मानंतर बरोबर पाचव्या दिवशी मध्यरात्री कोणी "सटवाई" नावाची देवी येऊन त्याच्या इवल्याश्या कपाळावर प्राक्तन लिहून जाते! ती आईला सांगत होती काही परंपरागत पद्धती ज्या आजपर्यंत सगळेच श्रद्धेने मानत आले होते. आणि त्यांची तयारी करण्यासाठी आजीला लवकर घरी जायचं होतं. तेव्हा आजोबा आपल्या लेकीकडे बघून हसत म्हणाले, "बाळाच्या एवढ्याशा कपाळावर कितीशी जागा असते गं.. एवढ्याशा जागेत अख्ख्या जन्माचं भाकित कसं काय लिहीता येऊ शकेल?"

   त्यावर परंपरांना मानत असलेल्या आजीने उत्तर दिलं, " आपले वाडवडील जे करत होते ते सगळंच मोडीत काढायचं का? आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला अर्थ समजत नसला, म्हणून ती गोष्ट बिनबुडाची ठरवायची? आधीच माझ्या लेकीला काय कमी सहन करावं लागतंय का?"

    ते ऐकताच आजोबा एकदम गप्प झाले. तेव्हा सानुलीला तिची आई काहीतरी बोलेल असं वाटत होतं. पण ती शांतपणे आवराआवर करताना दिसत होती. मग तिनेही ठरवलं की आज रात्री प्रत्यक्ष अनुभव मिळणारच आहे ना 'सटवाई' देवीच्या भेटीचा! तोपर्यंत आपल्या या नवीन विश्वातल्या घडामोडी पाहण्यात आनंद आहेच की! आणि बघता बघता तिच्या डोळ्यांमध्ये इतकी झोप दाटून आली की नंतर ती जागी झाली तेव्हा एका नव्याच ठिकाणी होती! जे होतं तिच्या मामाचं घर!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational