तिची गोष्ट भाग 2 - नातीगोती
तिची गोष्ट भाग 2 - नातीगोती
त्या गोड सानुलीचा जन्म ज्याक्षणी झाला, त्याक्षणी आपसूकच तिच्यासाठी अनेक नाती तयार झाली! जणू ती सगळी नाती तिची आतुरतेने वाट पहात थांबलेलीच होती. आजी, आजोबा, बाबा, आत्या, काका, मामा, मावशी ही मंडळी तर होतीच! पण इतरही अनेक उपनाती धारण केलेली मंडळी तिला कौतुकाने पहायला त्या नर्सिंग होममध्ये येऊ लागली होती.
मऊ मऊ दुपट्यात गुंडाळून पाळण्यात ठेवलेल्या त्या सानुलीला बघून त्यातल्या दोघीजणींमध्ये प्रेमळ वादसुद्धा झाला! तिला पाळण्याच्या उजवीकडून पाहणाऱ्या आत्याने दावा केला की ही अगदी माझ्या भावासारखीच, म्हणजे सानुलीच्या बाबासारखीच दिसतेय! तर मावशीने डावीकडून तिला न्याहाळले आणि ठामपणे सांगितले की ही छकुली माझ्या ताईसारखी, म्हणजे बाळाच्या आईसारखीच आहे!
त्यांचे ते संवाद ऐकून सानुलीने हलकीशी चुळबूळ सुरू केली. तिला काहीही अर्थबोध झालेला नसला..तरी दोन दिवसांत हळूहळू इतकं कळायला लागलं होतं की आपण कोणीतरी खास आहोत. तिची नजर अजूनही स्थिर झालेली नसली, तरी वेगवेगळ्या माणसांच्या, हातवारे करत बोलणाऱ्या आकृत्या पाहून तिला गंमत वाटू लागली होती.
पण आज एक मोठ्या आवाजात बोलणारे, पांढऱ्या मिशांवाले आजोबा आले. आणि तिला बघून "काय गं यमुना काकी, आलीस ना नातसूनेच्या पोटी!" असं डोळे मिचकावत म्हणाले. तेव्हा मात्र तिला त्यांच्या आवाजाची भीती वाटली. आणि सवयीने आता बऱ्यापैकी जमणारी एकमेव गोष्ट तिने केली. ती म्हणजे भोकाड पसरणे!
लगेच एक आजी तिच्याजवळ आली आणि आजोबांना शांत बसायला सांगून तिने पाळण्याला हलकासा झोका दिला. आणि त्या सानुलीला आपल्या रडण्याचा एक महत्वाचा उपयोग कळला! की जर आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर तोंडाचे बोळके उघडावे आणि मोठ्याने भोकाड पसरावे!
नाहीतरी बराच वेळ पाळण्यात राहून ती कंटाळलीच होती. आपल्याला जिच्या कुशीत निजल्यावर कसलीच भिती वाटत नाही, अशी आपली आवडती व्यक्ती कुठे आहे याचाही तिला काही अंदाज येत नव्हता. बाळाचं रडणं थांबत नाहीय, हे लक्षात येताच एका शुभ्रपरीने तिला हळुवारपणे उचलून जवळ घेतले आणि ती मिश्कीलपणे त्या मिशीवाल्या आजोबांना म्हणाली, "मलातरी वाटते की बहुतेक या तुमच्या यमुना काकी नसाव्यात. दुसऱ्याच कोणीतरी आलेल्या दिसतात." त्यावर आजोबा सुद्धा मनापासून हसताना तिला दिसले.
खरंतर सानुलीला एव्हाना आत्मप्रेरणेने काही छोट्या छोट्या गोष्टी जाणवायला लागल्या होत्या. ही परी जेव्हा आपण रडल्यावर उचलते, तेव्हा आपल्याला त्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या जवळ ठेवते. मग तिच्या हलक्याशा स्पर्शातून सुद्धा आपल्याला एक आश्वासक ऊब मिळते. आणि आपल्या सभोवताली असलेल्या या अनोळखी वातावरणात खूप सुरक्षित वाटते.
"भूक लागली वाटतं! चला आईकडे..." म्हणत तिने बाळाला तिच्या मातेच्या जवळ नेलं. दोन दिवसांत ते बाळ हेच आपलं सर्वस्व वाटायला लागलेली ती माता सावकाश उठून बसली. तिच्या ओटीत बाळाला ठेवल्यावर जेव्हा आईने तिला डोळे भरुन निरखून पाहिलं, तेव्हा ती परी म्हणाली, "दोन दिवसांत तुमच्या नातेवाईकांनी हिला गंगामावशी, यमुनाकाकी अशा कोणाकोणाच्या रुपात पाहिलं. शेवटी तेही त्यांचं प्रेमच म्हणायचं! पण तुम्ही मात्र हिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच वाढवा!"
ते ऐकून त्या मायलेकीच्या नात्यात हळूहळू स्थिरावत असलेल्या दोघींनी एकमेकींच्या नजरेत नजर मिळवली आणि सानुली गालातल्या गालात खुदकन हसली!
