तिची गोष्ट - भाग 6 (आपुलकी)
तिची गोष्ट - भाग 6 (आपुलकी)
"ए सानुले, बघ तरी आज कोण आलंय ते तुला भेटायला!..." आठ दिवसांत आजीचा स्वर ओळखू लागलेली सानुली आणि तिची आई दोघींनीही एकाच वेळी डोळे उघडले. सानुलीने किलकिल्या डोळ्यांनी वर पाहिलं तर तिचा बाबा मिश्कीलपणे हसत तिच्याकडे पाहात होता. आणि त्याच्या बाजूला ही कोण बरं?
"ए प्रतीक, कसली गोडुली आहे रे तुमची लेक!..अगं सुरुची, तू कशाला उठून बसलीस? मी काय कोणी पाहुणी आहे का?..अगं, मिळतोय तोपर्यंत मस्त आराम करून घे!" म्हणत तिने काहीतरी काढून बाजूच्या टेबलावर ठेवलं. तेवढ्यात आजोबांनी एक खुर्ची ओढून सानुलीच्या बाबाला बसायला लावलं. तोपर्यंत आजी पाणी घेऊन आली आणि तिने एक ग्लास उचलून बाबांच्या तोंडाला लावला. त्यामुळे सानुलीला समजलं की अजूनही ते कशालाही हात लावू शकत नाहीत. आणि जेव्हा ती हसरी व्यक्ती उत्साहाने बोलायला लागली, तेव्हा सानुलीच्या कानांवर काही ऐकलेले, काही नवे शब्द पडू लागले. तिची उत्सुकता वाढली.
"काय गं जागृती, किती दिवसांनी आलीयेस आमच्या घरी?" आजीने विचारलं.
"मावशी, मी प्रतीकजवळ फोनवर चौकशी करत असते तुमची सर्वांची! पण येणं झालं नाही. खरंतर मी सध्या नाईट ड्युटी मागून घेतलीय ना, त्यामुळे आमची दोघांची भेटच होत नाही!" ती म्हणाली.
" नाईट ड्युटी? आता ती तुला कशाला पाहिजे?" आजीने काळजीच्या स्वरात विचारलं.
"अहो, आईबाबांनी माझं जे नाव ठेवलंय जागृती, त्याला अर्थ नको का द्यायला?" म्हणत ती हसायला लागली.
आता मात्र सानुलीच्या आईने आश्चर्याने तिच्याकडे बघून भुवया उंचावल्या. तेव्हा बाबांनी उत्तर दिलं,
"आमच्या फायर ब्रिगेड मधल्या या रणरागिणीने एक नवा उपक्रम सुरू केलाय. लोकांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या अग्नीवीरांच्या मुलाखती घेत आहे ती सध्या! जनजागृतीसाठी!"
" विशेष म्हणजे आता या माझ्या बेस्ट बॅचमेटने जी कामगिरी केलीय, त्यामुळे त्याची मुलाखत घेण्याची संधी मिळतेय मला!" म्हणत तिने कौतुकाने सानुलीच्या आईकडे पाहिलं.
यावर ती काहीच न बोलता सानुलीची नॅप्पी ओली झालीय का, ते बघायला लागली. सानुलीला अजून आपलं,परकं यातला फरक समजत नसला, तरी तिला या व्यक्तीला पाहिल्यावर तिच्याविषयी आपुलकी वाटायला लागली होती, इतकं खरं!
"अरे व्वा..खूपच चांगला उपक्रम आहे तुझा जागृती... आणि तुला अननसाचा शिरा आवडतो ना? तोच बनवत होते मी. आणते हं" म्हणत आजी लगबगीने किचनमध्ये गेली. मग आजोबांनी जागृतीच्या त्या उपक्रमाबद्दल उत्सुकतेने माहिती घेतली. तोपर्यंत इकडे सानुलीच्या आईबाबांचे बोलणे झाले.
"हे बघ सुरुची, कालच आमचे डॉक्टर म्हणाले की माझे हात काही दिवसांत पहिल्या सारखे होतील. मग आपण हिच्या बारशाची तयारी करू. आपण बारशाची तारीख कळवली की कोकणातून माझे आईबाबा येणार आहेत." बाबा आनंदाने सांगत होते. तशी तिच्या आईची कळी एकदम खुलली. तिने सानुलीला उचलून बाबांच्या जवळ ठेवलं. तशी ती हात बाहेर काढण्यासाठी चुळबूळ करू लागली. मग बाबा खाली वाकून तिच्याशी बोलू लागले, "मामाच्या चिमूला छान छान नाव पाहिजे ना?..आणि गावच्या आजीआजोबांना भेटायचंय की नाही?" ती त्यांच्याकडे एकटक पहात होती.
" पण आपण तर अजून हिचं नावसुद्धा नाही ठरवलंय!" आईने प्रेमळ तक्रार केली.
"आपण जागृतीलाच सांगू या की! ती सुचवेल छानसं नाव!.." बाबांनी लगेच तोडगा काढला, त्यावर आईने हसत मान डोलावली. सानुलीला इतकंच कळलं की आईबाबा तिच्याविषयी काहीतरी छान बोलत आहेत.
तोपर्यंत आजीने अननसाचा शिरा आणला आणि मग आईने एक चमचाभर शिरा बाबांना भरवत म्हटलं, "हिच्यासाठी छानसं नाव शोधशील ना जागृती..जसं तू तुझ्या लेकाचं ठेवलंस...अर्णव"
" खूपच सुंदर नाव आहे, अर्णव म्हणजे समुद्र ना.. " बाबा म्हणाले.
" हो..आपण अग्नीचे शमन करतो ते पाण्याने...त्यामुळे ते आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे!"
"व्वा..किती अर्थपूर्ण नाव निवडलंस तू!..अगं म्हणूनच तुझ्यावर ही कामगिरी सोपवलीय आम्ही! आणि हिची आत्याबाईच आहेस नाहीतरी तू!" असं आजीने म्हणताच ती खुश झाली. ते पाहून सानुलीने मनाशी खूणगाठ बांधली की 'नाव' ठेवणं म्हणजे नक्कीच महत्वाची गोष्ट असणार.
" दॅट्स ग्रेट! मला भाऊ नाही, आणि याला बहीण नाही.. त्यामुळे मला तरी भाचीचं नाव ठेवायला कधी मिळणार? आणि अर्णवला पण छोटी बहीण मिळाली !" म्हणत जागृतीने बारशासाठी सहकुटुंब येण्याचं आश्वासन दिलं. मग गप्पा छानच रंगत गेल्या..आणि तिच्या रात्रपाळीमुळे तीन वर्षांच्या अर्णवच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या नवऱ्याने कशी आनंदाने घेतली आहे, हे सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलून गेला.
मग बारशाची काय काय तयारी करावी लागेल याविषयीची चर्चा रंगत असताना तिचा राजामामाही घरी आला.
"हाssय चिमूss..."त्याच्या आगमनाची वर्दी देणारी ती हाक सानुलीच्या कानांवर आली. तिचे इवलेसे डोळे भिरभिरत मामाला शोधू लागले. तो पुढे येऊन तिच्याकडे बघत म्हणाला,
"एक चिमूताई, काल रात्री अंगाई गात झोपवलं ना मी तुला?"
ते ऐकून तिला आठवलं, काल रात्री आपण झोपेत दचकून रडत उठलो तेव्हा मामाच्या हातात किती निश्चिंत वाटलं होतं. आणि तो जे गुणगुणत होता, ते ऐकून कधी झोप लागली तेही कळलं नव्हतं. तिच्या कोवळ्या जीवाला आता हवीहवीशी वाटायला लागली होती, ती हीच सुखद भावना!..आपुलकी!!
