तिची गोष्ट - भाग 7 (ऋणानुबंध)
तिची गोष्ट - भाग 7 (ऋणानुबंध)
नमस्कार मंडळी,
तिची गोष्ट या कथेचा ओघ आज पहिल्यांदाच सानुलीला मधोमध ठेवून घरातली सगळी जणं तिच्या अवतीभवती बसली होती. नुकताच आत्याबाई होण्याचा मान मिळवलेली जागृती समोर बसून तिच्याकडे कुतुहलाने बघत होती. तेवढ्यात आजोबांनी चहाचा कप बाजूला ठेवत तिला विचारलं,
"जागृती, तुझ्या अर्णवची गोष्ट तशी थोडीफार माहीत आहे, पण ती तुझ्या तोंडून ऐकायची होती. तुझी हरकत नसेल तर सांग..."
तसे सगळे आजोबांकडे आश्चर्याने पहायला लागले. पण जागृती मात्र मनमोकळेपणाने म्हणाली, "काका, मला ती गोष्ट जगजाहीर करावी असं वाटत नाही..पण तुमच्या सारख्या जिव्हाळ्याच्या माणसांबरोबर शेयर करायला काहीच हरकत नाही"
"खरं आहे जागृती...ऐकणाऱ्या माणसांचा अर्णवकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे", म्हणत प्रतीकने दुजोरा दिला. तेव्हा आपल्या बाबांच्या आवाजाचा वेध घेत सानुलीने अंदाज केला की काहीतरी गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे.
मग तिच्याकडे बघत जागृती बोलायला लागली.
"तीन वर्षांपूर्वी लोकवस्ती पासून दूर असलेल्या एका छोट्या इंडस्ट्रीयल इस्टेटला लागलेली आग विझवायला आमची टीम गेली होती. मध्यरात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट होऊन ती आग लागली होती. एक निनावी फोन आल्यावर आम्ही तिथे पोचलो तेव्हा लक्षात आलं की तिथला रखवालदार आग विझवायला गेला तो परत आलाच नाही... म्हणून त्याची बायको त्याला शोधायला गेली तेव्हा आगीचा भडका उडाला असावा आणि.... आणि त्यांचा सहाएक महिन्यांचा मुलगा गेटजवळच्या झाडाला टांगलेल्या झोळीत रडत होता.."
ती बोलायची थांबली तेव्हा सगळेच स्तब्ध झाले होते.
काही क्षणातच स्वतःला सावरत जागृती बोलायला लागली. "तोपर्यंत दूरवरच्या झोपडपट्टीतील माणसे तिथे गोळा झाली होती आणि जवळच्या विहिरीतून पाणी उपसून आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे आग गेटपर्यंत पसरली नव्हती. आणि ते बाळ अगदी सुखरूप होतं...आम्ही त्याला आमच्या बरोबर घेऊन आलो. तोपर्यंत सकाळ झाली होती. भेदरलेल्या आणि रडून थकलेल्या त्या बाळाला शांत झोप लागली होती. मग त्याच्यासाठी दूधाची बाटली, कपडे वगैरेची व्यवस्था करण्याची जबाबदारी मी घेतली.
नंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण झोपडीत कसलेही ओळखपत्र नव्हते की मालकाकडे त्या जोडप्याबद्दलची ठोस माहिती!.. शेवटी मालकाला सुरक्षितता नियमांचे पालन न केल्याने बेजबाबदार ठरवून अटक झाली. त्या निष्पाप जीवाची जबाबदारी घेणारं कोणीच सापडलं नाही, तेव्हा त्याला एखाद्या अनाथाश्रमात ठेवण्यावाचून पोलीसांकडेही काही पर्याय नव्हता."
जागृतीने एक निःश्वास सोडला, तशी सानुली तिच्याकडे एकटक पाहू लागली. पण जागृतीची नजर जरी सानुलीवर असली, तरी तिची दृष्टी जणू तो प्रसंग परत पहात होती. ती पुढे बोलू लागली
"त्या वेळी माझं लग्न झालेलं होतं. परंतु खरं तर मला आणि तुषारला मुलाची घाई नव्हती. कारण मी माझ्या या करियरचा गांभीर्याने विचार करत होते. आणि आमच्या घरच्यांचाही मुलाबाबत आग्रह नव्हता. पण जेव्हा वरिष्ठांनी त्या तान्हुल्याला पोलिसांच्या स्वाधीन करायला सांगितलं तेव्हा तो केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होता. जणू ती नजर माझ्यातील माणूसकीला साद घालत होती. त्या क्षणीच आमचे ऋणानुबंध जुळले ते कायमचे!"
बोलता बोलता जागृतीचा कंठ दाटून आला. तिने डोळे मिटून घेतले. त्याबरोबर आजीने तिच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवत म्हटलं, "खूप चांगला निर्णय घेतलाय तुम्ही..फार मोठं मन आहे तुमचं...आम्हाला अभिमान वाटतो तुझ्या कुटुंबियांचा..."
"हो...आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत..आणि आता हा विषय आपल्यापुरताच राहील, बरं का रे पोरांनो..." असं आजोबांनी अधिकारवाणीने सांगताच सगळ्यांनी माना डोलावलेल्या सानुलीला दिसल्या.
सानुलीला उचलून घेताना तिच्या आईचे भरलेले डोळे बघताना तिलाही काहीतरी वेगळं वाटत होतं. हेच का ते ऋणानुबंध?
