तिची गोष्ट भाग 4 पायगुण
तिची गोष्ट भाग 4 पायगुण
घरात येण्यापूर्वी आजीने उंबरठ्यावर औक्षण केलं आणि तिच्या आईबरोबर तिच्याही अंगावरून काहीतरी फिरवून बाहेर टाकून दिलं. तेवढ्यात एक तरतरीत चेहरा तिच्याकडे बघून हसताना दिसला. मग त्या दोघींना घरात नेताना आजी त्याला म्हणाली, "आतापर्यंत या घरातला सर्वात लहान म्हणून तुझे भरपूर लाड झाले हं राजा! आजपासून मात्र त्या सगळ्या कोडकौतुकावर या सानुलीचा हक्क असणार..समजलं का?"
त्यावर सगळे हसले. पण मामा डोळे मिचकावत म्हणाला, "ते सगळे हक्क मीच स्वखुषीने, अगदी या क्षणापासून हिच्या नावावर केले असं समजा...व्वाव.. काय क्यूट आहे गं ही!..ताईसारखेच मोठे डोळे आणि जीजूंसारखं नाकपण भारीच!"
"झालं का तुझं विश्लेषण सुरू?" सानुलीच्या आईने लाजत धाकट्या भावाला दटावलं. "आधी मला सांग, तुझे पेपर्स कसे गेले?"
" मस्तच! खूप लकी आहे ही माझ्यासाठी! प्रत्येक पेपर असा सोडवलाय ना मी! काल तर शेवटचा पेपर झाल्यावर वाटलं होतं की तडक नर्सिंग होम मध्ये येऊन हिला पहावं. पण आईने आधीच इतकी कामं दिली होती की निमूटपणे घरी आलो. सगळं घर कसं चकाचक केलंय बघ तायडे!"
" थॅन्क्स माय डियर ब्रदर!" सानुलीची आई म्हणाली.
"ओह्.. इट्स माय प्लेझर...आणि काय गं चिमू?..ओळखलंस का मामाला?
मामाने दिलेलं हे छोटंसं नाव ऐकून सानुलीला गंमत वाटली आणि तिने स्मित करत दुजोरा दिला.
"काय चाललंय मामाभाचीचं?" बाहेरुन हाक ऐकू आली तसे सानुलीने लगेच कान टवकारले. हा मायेने ओथंबलेला स्वर तिने फक्त एकदाच ऐकला होता. तरी देखील तो कायमचा तिच्या आठवणीत राहिला होता. स्वप्नातल्या परीराज्यात विहार करत असताना तिला अधूनमधून एक चेहरा आठवत राही. आणि तिच्या कानात गुंजत ते दोनच शब्द! 'माझी लाडकी!'...तोच हा आवाज!
क्षणार्धात घरातल्या मंडळींची धांदल उडाली.
"अरे व्वा..बाळाचे बाबा पण आले. या, या"..म्हणत आजोबांनी त्यांना सानुलीच्या बेडजवळ बसण्यासाठी खुर्ची काय दिली, मामाने स्वतःच्या हातांनी थोडं थोडं पाणी काय पाजलं. आणि मग आजीने पुढे येऊन त्यांची विचारपूस केली. तेव्हा कुठे सानुलीच्या लक्षात आलं की त्यांचे हात अजूनही त्या जाळीदार कपड्याने झाकलेले आहेत. ती त्यांच्याकडे टक लावून पहात होती. ते बघून मामा म्हणाला.
"बाबा आल्यावर आता मामाला कोण विचारतंय!" आणि सगळे हसले. तिलाही गुदगुल्या झाल्यासारखं छान वाटलं. अरेच्चा, मघाशी खूश दिसणारी आई मात्र आता थोडी रुसल्यासारखी दिसत होती!
मग बाबांनी त्यांना विशेष कामगिरीबद्दल अग्निशमन दलाचे सेवा पदक मिळणार असल्याचं सांगितलं.
ते ऐकून सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. पण आई मात्र बाबांजवळ तक्रार केल्यासारखे काहीतरी बोलू लागली. तेव्हा आजोबांनी तिला समजावलं. सानुलीला जरी ते काय सांगत होते ते कळलं नव्हतं, तरी तिच्या कानांवर दोन शब्द वारंवार पडत होते.
" बाळाचा पायगुण"
तिला कुठे ठाऊक होतं की आपल्या कर्तव्यनिष्ठ बाबांचे हात एका लहान मुलाला आगीपासून वाचवताना भाजले होते. आणि त्या घटनेचा संबंध लावला जात होता तो तिच्या जन्मवेळेशी!
शेवटी आजी पुढे येऊन मायेने म्हणाली, "झालं गेलं गंगेला मिळालं! आता यापुढे सगळं छानच होईल..चला, आपण आता सटवाई देवीच्या स्वागताची तयारी करुया. तिची पूजा मांडून तिला प्रसाद अर्पण करायचाय. तिच्या कृपेने आपल्या बाळीच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान नांदो, अशी मनोभावे प्रार्थना करायचीय." त्याबरोबर सगळे पुन्हा उत्साही दिसू लागले. आजीने आईकडे बशीतून काहीतरी आणून दिलं. ती तो खाऊ
बाबांना चमच्याने भरवू लागली. तेव्हा बाबा म्हणाले, "इतकी सरबराई होणार असेल तर असली साहसं करण्यासाठी मी नेहमीच सज्ज असेन!" तेव्हा मात्र आईने त्यांच्यावर चांगलेच डोळे वटारले.
त्यानंतर मात्र सगळी कामं हसतखेळत पार पडली.
पण खरंच त्या रात्री सटवाई देवी आली होती का? आली असेल तर तिने सानुलीच्या कपाळावर काय लिहीलं असेल? आणि जे काही लिहिलं ते सगळं तसंच्या तसं घडेल का? की सानुली तिला मिळालेल्या काही जन्मजात गुणांच्या आधारे आपल्यातील कमतरतांवर मात करून पुढे जाईल? जगताना पावलोपावली कोडी घालणाऱ्या नाहीतर कोंडी करणाऱ्या या दुनियेत आपलं स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी त्या तान्हुलीला कोणत्या कसोट्या पार कराव्या लागतील ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सटवाई माऊलीलाच ठाऊक!
