तिची गोष्ट - भाग 5 (स्वप्नझुला)
तिची गोष्ट - भाग 5 (स्वप्नझुला)
होऊ लागताच सानुलीच्या आजोळी सटवाईच्या पूजेची मांडणी करण्यास सुरुवात झाली. आजी सांगेल त्याप्रमाणे राजामामा एकेक गोष्ट करत होता. आजोबा तिच्या बाबांबरोबर गप्पा मारत बसले होते. सानुलीला टोपडं घालता घालता आईने विचारलं, "हे सगळे विधी आमच्या बालपणी पण केले होते ना आई?"
"हो तर!" आजी समईत तेल घालत म्हणाली. "अगं तुझा जन्म कोकणातच झाल्यामुळे अगदी साग्रसंगीत सोहळा साजरा केला होता. रात्रभर भजन कीर्तन करत जागत बसले होते सगळे. तू मात्र त्या आवाजातही शांत झोपली होतीस. आणि मध्येच खुदकन हसत होतीस."
"आणि माझ्या वेळी?" मामाने आजीला विचारलं.
"तुझ्या वेळी सुद्धा इथे असंच सगळं मांडलं होतं." ती म्हणाली, "फक्त टेपरेकॉर्डर वर भजनं ऐकत घरातल्यांनी पत्ते खेळत रात्र जागवली होती."
"मग मी सुद्धा झोपेत खुदकन हसलो असणार ना..पण मला आठवत कसं नाही हे सगळं?" मामाने इतका निरागस चेहरा करून विचारलं की आजीचा धपाटाच मिळाला त्याला पाठीवर!
"तुझा जन्म झाला तेव्हा ही सुरुची पाच वर्षांची होती. तिला तुझ्या आजीने सांगितलं की वहितला एक कोरा कागद आणि पेन्सिल आणून ठेव बरं बाळाच्या उशीजवळ..तर विचारते कशी, कागदपेन्सिल कशाला? बाळाला कुठे लिहायला येतंय? मग हिला समजावलं की सटवाई देवी आज रात्री बाळासाठी छान छान गोष्टी लिहून जाणार आहे. तेव्हा मात्र लगेच आणून ठेवलं."
हे ऐकून सानुलीच्या आईची चेष्टा करण्याचं जणू सगळ्यांना निमित्तच मिळालं! पण अर्थातच हे सगळं सानुलीच्या कानांवर पडत असलं तरी तिला त्याचे अर्थ कुठे कळत होते? त्यामुळे ती आईच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागली की आता आई रुसलेली दिसत नाहीय. म्हणजे सगळं काही छान चाललंय!
आणि काही वेळातच ती निद्रादेवीच्या राज्यात पोहोचली. तिथे तिला कोणीतरी अलगद उचलून एका सुंदर उपवनात नेलं. तिथल्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या हिंदोळ्यावर बसवलं. त्या स्वर्गीय वातावरणात तिच्या मागे उभं राहून हळुवारपणे झोके देत असलेलं कोणीतरी बोलायला लागलं. मृदू, प्रेमळ आवाजातील काही शब्द तिला ऐकू येत होते. आणि गंमत म्हणजे त्या शब्दांचा अर्थ तिला आपसूकच कळू लागला होता.
"बाळा, आता तू या जीवसृष्टीचा एक भाग आहेस. इथल्या प्रत्येक सजीवात जे चैतन्य आहे, तेच तुझ्यातही आहे. आणि तेच तुला जगण्याची प्रेरणा देत राहील.
हा झोका जसा पुढेमागे झुलतो, तसे सुख आणि दुःख जीवनाचे सोबती आहेत. पण तुला तर इथे आनंद शोधायला आणि तो जपायला शिकायचंय!
"काळ आपल्या पाऊलखुणा उमटवून पुढे जात असतो. नवा जीवही आपल्या बरोबर घेऊन येतो पिढ्यानपिढ्यांचं संचित..त्याला त्याच्याच आधाराने आपलं भविष्य घडवत पुढे जायचं असतं. पण..."
अचानक झुला संथ होत होत स्थिरावत असताना सानुलीच्या मागची व्यक्ती तिच्या समोर येऊन उभी राहिली. ती एक विलक्षण स्त्री असून तिच्या तेजस्वी चेहऱ्यावरचे भाव क्षणोक्षणी बदलत होते. ती कधी प्रेमळ तर कधी करारी भासत होती. सानुलीचे इवलेसे डोळे विस्फारले गेले, जेव्हा त्या स्त्रीने तिच्या कपाळाला कोमलपणे स्पर्श केला. मात्र त्यावेळी तिला जराही भिती वाटली नाही.
"पण या विश्वात मनुष्याची कसोटी पाहणाऱ्या अनेक मोहमयी गोष्टी आहेत. त्या पावलोपावली भुरळ घालत तुझी सत्वपरीक्षा घेतील."
एवढे बोलून अतिशय सुवासिक अशा अमृताचे शिंपण सानुलीच्या अंगावर करत ती म्हणाली, "पण तू भिऊ नकोस. तुझ्या प्रत्येक कसोटीच्या क्षणी अधोगती रोखणारे एक प्रभावी वरदान कायम तुझ्या गाठीशी असेल. तो म्हणजे संयम! त्याचा योग्य वेळी वापर करून मानवजन्माच्या या दुर्मिळ संधीचा पुरेपूर आनंद घे आणि सदविवेकबुद्धीने आचरण कर.. करशील ना?"
सानुलीच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून ती हसून म्हणाली," मी प्रत्येक नवजात अर्भकाला अगदी हेच सांगत असते, बरं का!...पण या दुनियेचं रूपच इतकं मायावी आहे, की त्यात गुरफटून हळूहळू ते बालक ही महत्त्वाची गोष्ट विसरून जातं. निरागस बालमनावर सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव होत राहणंही साहजिकच आहे. तरीही....
*पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, कुण्डे कुण्डे नवं पय:*
प्रत्येक मनुष्याची बुद्धी आणि प्रत्येक कुंडातील पाणी वेगळे असते. आणि तरीही विविध प्रकारच्या सजीवांचे सहजीवन सफल होऊ शकते. संपूर्ण जीवसृष्टी निर्माण करणाऱ्या निसर्ग देवतेचीच किमया आहे. तिच्या प्रती कायम कृतज्ञता बाळग. तिचे संवर्धन कर.
तर आता मी माझं विहित कार्य केलेलं आहे आणि तुला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. जा बाळा, तुझा मनुष्यजन्म सार्थकी लागो!" म्हणत तिने पुन्हा एकदा सानुलीच्या कपाळावर हात फिरवत मोहक स्मित केलं. त्यावेळी सानुलीही खुदकन हसली. त्यानंतर ती अद्भुत स्त्री दूर दूर जात दिसेनाशी झाली. सानुली मात्र बराच वेळ मिटलेल्या डोळ्यांनी त्या स्वर्गीय उपवनातील आनंदतरंग अनुभवत होती. आणि आपल्या इवल्याशा बंद मुठींमध्ये जणू जन्म जन्मांतरीचं संचित ती घट्ट पकडून ठेवू पाहत होती.
