ते तर स्वप्न होते
ते तर स्वप्न होते


'मनी वसे ते स्वप्नी दिसे' म्हणतात ते खरेच असावे अशा काही घटना अवती भवती घडतांना दिसतात. भूत, पिशाच्च, हडळ, चकवा इ. आहेत की नाहीत? यावर आज बरीच चर्चा होतांना आपण पाहतो. शिक्षणामुळे आज त्यावर कुणी विश्वासही ठेवत नाही. परंतु ज्यांच्या आयुष्यात अशा घटना घडतात. ते मात्र या गोष्टींवर नक्कीच विश्वास ठेवायला लागतात.
अशीच एक सत्य परंतु अतिशय जुनी घटना आठवली. ३५ वर्षांपूर्वी आम्ही औरंगाबादला सिडकोच्या एन-६ भागात रहात होतो. घराला लागून घरे असल्यामुळे भीतीचं काही कारण नव्हतं. रात्री बेरात्री कामावर जावे लागायचे त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस रात्रीच्या वेळी रस्त्याने जातांना येतांना भीती वाटायचीही. परंतु ती काही दिवसांच्या सरावाने निघूनही गेली होती. मात्र पत्नीला मुलाला घेऊन रात्री घरात झोपतांना बरीच भीती वाटायची. भीती वाटली की रामनामाचा जप करायचा हा एकमेव मार्ग तिने कुठून तरी शिकून घेतला होता. कधी मी घरात असतांनाही बाहेर थोडासा आवाज आला तरी ती घाबरायची अन् मलाही घाबरवून सोडायची. त्याला कारणही तसेच होते. दिवसभर घरातले काम आटोपले की, चारपाच जणी एकत्र बसायच्या अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा करत. कधी गावाकडच्या, तर कधी कुठल्या तरी ऐकीव सांगीवांगीच्या, कधी कधी भुतांच्याही. भुताची गोष्ट ऐकायला आवडायची पण रात्री भीती वाटायची.
आमच्या पाठीमागच्या खोलीत एक नवीन कुटुंब राहायला आले. पती पत्नी दोघेच होते. दोघेही मोल मजुरी करूनच उपजीविका भागवायचे. पत्नी धुणी भांडी करायची तर पती एका हॉटेलमध्ये भट्टीवर काम करायचा. हॉटेल दुपारच्या वेळी बंद असायचे. मग तो सुद्धा असाच गप्पा मारत, ऐकत बसायचा. खोली खूपच छोटी होती. आपापसातील बोलणेही इकडचे तिकडे ऐकायला यायचे.
एकदा रात्री उशिरा म्हणजे साडेबारा वाजता कामावरून घरी आलो. भूक लागलेली होती. जेवण करूनच झोपलो. गाढ झोप लागली होती. तेव्हा साधारण सकाळचे साडे चार पाच वाजत आले होते. अचानक मागच्या खोलीतून रामसे बंधूंच्या रहस्यपटातील आवाजा सारखा आवाज आला. मला वाटले मलाच भास झाला असावा. पण पत्नीही जागी झाली होती. ती बाळासहित माझ्या अंथरुणात शिरली. बाळाला घेऊन मला बिलगली. मी आवाजाचा कानोसा घेतला तर तो मागच्या रूम मधून येत होता. मी उठायचा प्रयत्न केला. पत्नी उठू देत नव्हती. तो आवाज वाढत गेला. आता त्या आवाजाबरोबर त्याच्या पत्नीचाही रडण्याचा आवाज येऊ लागला होता. मी ताडकन उठून तसाच तिकडे गेलो. बघतो तर शेजारी पाजारी जमा झालेले होते. बाजूच्या गल्लीतून त्याचे भाऊ आणि आई आलेली होती. सगळे जण दार वाजवत होते, दार उघडायला सांगत होते. परंतु आतून काहीच प्रतिसाद नव्हता. तिच्या रडण्याचा तेवढा आवाज येत होता. सगळे घाबरले होते. आम्ही दोघा तिघांनी दार जोरात ढकलले तसे दार धाडकन उघडले गेले. जमेल तेवढे जण आत घुसले. आतले दृश्य पाहू लागले.
तो झोपलेला होता आणि ती त्याच्या छातीवर डोके ठेऊन रडत होती. बाजूलाच फोटोची एक फ्रेम पडलेली होती. सर्वजण एकदम आत आल्यामुळे ती भानावर आली. स्वतःला सावरून बसली. त्याच्या आईने आधी मुलाच्या अंगावरून हात फिरवला. आणि सुनेला विचारू लागली,..
"अगं! काय झालं एवढं वरडायला? आमी कव्हा धरनं आवाज देऊन राह्यलो तं दार बी उघडना."
"वहिनी, नेमकं काय झालं? का रडायल्यात तुम्ही? जरा सविस्तर सांगाल का?" त्याच्या भावाने विचारले.
"भाऊजी, मला काहीच समजलं नाही. अचानक तुमचे भाऊ कसेच्या कसेच आवाज काढू लागले. एकदम भुतासारखा आवाज ऐकून मी खूपच घाबरले. त्यांना उठवायला गेले तर ते आणखी जोरजोराने किंचाळू लागले. मला काही सुचेना. म्हणून मीही रडायला लागले." तिने खुलासा केला.
भावाने त्याला डोक्याखाली हात घालून उठवले. त्याला एवढया थंडीतही घाम आलेला होता. त्याचा घाम पुसला त्याला जरा व्यवस्थित बसवलं आणि मग विचारलं. तो ही जरासा शांत झाला आणि त्याला जे स्वप्न पडत होते ते सांगू लागला.
"मी रात्री हॉटेलवरून काम करून येत होतो. रस्त्यात एक भयंकर कुत्रा मला आडवा झाला होता. त्याचे ते अक्राळविक्राळ रूप बघून मी खूपच घाबरलो होतो. जवळपास अर्धा पाऊण तास त्याने मला एकाच जागी उभे केले. मी पाऊल उचलले की तो भुंकायला लागायचा, मी थांबलो की तो ही थांबायचा. बराच वेळ आमचा हा खेळ सुरू होता. मी खूपच घाबरलो होतो. कुणी तरी येण्याची वाट बघत होतो. कुणीच आले नाही म्हणून मी पुन्हा चालायला लागलो. तो पुन्हा भुंकायला लागला. मी जोरात त्याच्या जबड्यावर एक लाथ मारली. तो किंचाळत लांबवर मागे पळाला. त्याचा तो विचित्र आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. मला वाटते तो कुत्रा नसून भूतच असले पाहिजे. ते माझ्या पाठीमागेच घरी आले असावे. कारण मी झोपल्यावर माझ्या छातीवर बसून कुणी तरी जोरजोरात दाबत असल्याचा मला भास झाला. मरण यातना होऊन मी ओरडलो.नंतरचे मला काहीच कळले नाही. मात्र मला आता कळतंय की, ते स्वप्न होतं." त्याने स्वप्न कथन केले.
"वहिनी, हे फोटोफ्रेम कुठून आले?"
"अहो ते वर भिंतीवर टांगलेले होते. उंदीर पळाल्यामुळे ते खाली पडले. अन् त्याचवेळी हे रडायला लागले. म्हणून मी ते बाजूला केले." तिने खुलासा केला.
"बरोबर आहे. ह्याला स्वप्न पडत होते. कुणीतरी छाती दाबत आहे, असे वाटले अन् नेमके त्याचवेळी फोटोफ्रेम छातीवर पडले. त्यामुळे हा जास्त घाबरला आहे." भावाने हसत हसत खुलासा केला आणि सर्वजण हसायला लागले.