सुगंधाचे भूत
सुगंधाचे भूत


लहानपणी मी नेहमी आजीसोबत शेतात जायचे. तेव्हा मी ४ वर्षाची असेल त्यामुळे शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता. शेतात कापूस निंदायला काही बायका पण यायच्या. त्यातील एका बाईसोबत तिची ५ वर्षाची लेक येत. दिसायला अगदी नाजूक, रेखीव बोलके डोळे. सगळ्या काम करायच्या तेव्हा मी आणि ती शेतात भटकायचो, काकडी, चिंचा पाडून खायचो. ती नेहमी काही ना काही माझ्यासाठी आणायची. कधी आवळे, कधी फुले. मला ती खूप आवडे. ती माझ्यासाठी नेहमी काही आणायची पण कधीच मी काही तिला देत नाही म्हणून रूसायची नाही.
आम्ही दोघी खूप मजा मस्ती करायचो. तिने मला झाडावर चढायला शिकविले. मला म्हणायची की शेतात कधी कोणते जनावर येईल सांगता येत नाही. त्यामुळे जनावर दिसले की झाडावर चढून बसायचे म्हणजे जीव वाचेल. आपल्या आयांना शेतात काम करत असल्यावर सतत आपल्याकडे लक्ष द्यायला नाही जमत मग आपणच आपले रक्षण कसे करावे ते शिकून घ्यायचे. एकदा असाच एक वाघ एका मुलीला घेऊन गेला. त्या डोंगराच्या पायथ्याशी वाघाने तिला खाल्ले. तिला झाडावर चढता येत असते तर जवळच्या झाडावर चढून तिने स्वतःला वाचवले असते. त्यावेळी शेतात वाघाचा संचार असे.
असेच एकदा भटकता भटकता आम्ही बाजूच्या शेतात गेलो. तिकडे दंगामस्ती करताना पाठीमागून गुरगुरण्याचा आवाज आला. बघतो कर काय एक वाघ काही अंतरावर थांबून आम्हाला पाहत गुरगुरत होता. त्याला पाहून माझा जीवच गळून पडला. हातपाय गार पडले. पहिल्यांदा मी वाघ माझ्या समोर पाहत होते. आतापर्यंत फक्त ऐकलेले की वाघ कसा असतो. आता हा मला फाडून खाणार हे आठवून मी रडायला लागले. पळायचे पण मला सुचले नाही. तेवढ्यात ती माझा हात खेचून मला झाडावर चढवू लागली.
मी तिला म्हणाले की, आधी तू चढ तर ती म्हणाली वाघ मला काही करणार नाही, तू चढ पटकन. मी चढून झाडावर बसले, ती तर माझ्या मागे सरकन चढून आली. वाघ झाडाखाली येऊन आम्ही हातात लागायची वाट पाहू लागला. मी तिच्याकडे पाहिले तर ती अगदी निश्चितं दिसत होती, अजिबात घाबरलेली दिसत नव्हती. पण तिला विचारायचे बळ तेव्हा मला नव्हते. कसेही करून वाघाला घालवायचे हा विचार मी करत होते. मी आवाज देत होते वाचवा आम्हाला इथे वाघ आहे.
थोड्यावेळाने मी दिसत नाही म्हणून आजी इकडे तिकडे पाहू लागली. मला आवाज देत देत ती पुढे आली. तिला माझा हलकासा आवाज येऊ लागला. वाघ ऐकून ती घाबरली. लगोलग सगळ्या बायकांना बोलावून आवाजाच्या दिशेने येऊ लागली. तिला एका झाडावर मी आणि खाली वाघ दिसला. बायका पळत ओरडत येऊ लागल्या. एवढा जमाव येताना पाहून वाघाने दुसऱ्या दिशेला धूम ठोकली. वाघ गेल्यावर आम्ही खाली उतरलो. मी आजीला मिठी मारत रडू लागली. आजी पण हुंदके देऊ लागली. आजीला वाटले बिना आई-बापाची पोर आज काही झाले असते हिला तर.
आजूबाजूच्या बायका म्हणे, अगं रडतेस काय? मोठी धीराची तू पोर, झाडावर चढून जीव वाचवलास. मी म्हटले मला तर सुचलेच नव्हते, ते तर सुगंधाने घाई करून मला झाडावर चढवले म्हणून आम्ही वाचलो. त्यावर आजी म्हणे, कोण सुगंधा? मी मागे वळून महणाले ही काय, पण सुगंधा तिथे नव्हती. मी म्हटले ही कुठे गेली आता? आजी म्हणे, अगं कोण सुगंधा, कोणाची पोर? मी म्हणाले अगं शांता काकूंची. ते ऐकून आजीने आणि बायकांनी डोळे मोठे केले, एकमेकांकडे पाहू लागल्या. आजी म्हणाली, अगं ती कशी येणार? मी म्हटले कशी काय, रोज तर येते शांता काकू सोबत. आम्ही रोज एकत्र खेळतो, तिनेच मला झाडावर चढायला शिकविले. आज माझा जीव तिनेच वाचवला.
तिथपर्यंत शांता काकू पुढे आली. मला म्हणाली की, २ वर्ष झाले तेव्हाची गोष्ट आहे. मी आणि सुगंधा एकदा शेतावर आलेलो. सुगंधाला बांधावर बसवून मी कापूस वेचत होते. तेवढ्यात तिचा ओरडायचा आवाज आला. पाहते तर एक वाघ तिला तोंडात पकडून घेऊन चाललेला. मी खूप पळाले पण माझ्या हातात लागला तो तिच्या अंगावरील कपड्याचा तुकडा. वाघाने तिला खाल्ले, तिच्या अंगाचे काही तुकडे त्या डोंगराच्या पायथ्याशी भेटले. तिला मी नेहमी सांगायची इथे वाघ फिरतात, झाडावर चढायला शिकून घे. पण ती ऐकायची नाही. किती यातना सहन केल्या असतील माझ्या पोरीने मरताना आणि आज मेल्यानंतर पण तिने तुझा जीव वाचविला. असे म्हणून ती हमसून हमसून रडू लागली.
आम्ही सगळेच ते ऐकून रडू लागलो. मला तर काही सुचेना. म्हणजे रोज मी सुगंधाच्या भुतासोबत खेळायचे हा विचार करून माझ्या अंगावर शहारा आला. पण तिने मला कधी त्रास दिला नव्हता. उलट माझा जीव वाचवलेला. आता मला कळलेले की तिने मला का झाडावर चढायला शिकवले. ती मला का म्हणालेली की वाघ मला काही करणार नाही. त्यानंतर मला सुगंधा कधीच दिसली नाही. मला वाटत होते ती एकदातरी समोर यावी म्हणजे मी तिचे आभार तरी मानेल.